Tuesday, August 27, 2019

पहिले पाऊल....


आनंदीबाईंचे अपत्य आजाराने काही काळातच मरते आणि आनंदीबाई निर्णय घेतात कि त्या आता डॉक्टर होणार.

गोपळरावांच्या पुढाकाराने त्यांना एका मिशनरी शाळेत प्रवेश देखील मिळतो. प्रवेश मिळवण्यासाठी आणि मिळवल्यानंतर ज्या हालअपेष्टा, सामाजिक निर्भर्त्सना, शाळेतील इंग्रजी विद्यार्थ्यांकडून सातत्याने केला गेलेला उपमर्द ई. प्रतिकूल गोष्टींशी त्या आणि गोपाळराव सामना करतात. तरीही अखेरीस त्यांना शाळा सोडावी लागते आणि पुढचे सर्व मार्ग बंद होतात!

पण तरीही जोशी दांपत्य धीर सोडत नाहीत. गोपाळराव अमेरिकेत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षण घेता यावे ह्यासाठी कुणाशीतरी पत्रव्यवहार करत राहतात आणि मिळालेल्या सल्ल्याप्रमाणे कलकत्याला जाऊन राहतात. तिथे आनंदीबाई शिक्षण चालू ठेवतात आणि उभयतांना अमेरिकेत जाता येण्यासाठी प्रयत्न करत राहतात. 

पलीकडून अजून प्रतिसाद येत नसतो. गोपाळरावांची नोकरी गेल्याने आर्थिक परिस्थिती देखील कठीण झालेली असते.तरीही कलकत्यामध्ये राहून पुढील शिक्षण घेत राहण्याचा आनंदीबाई प्रयत्न करत असतात. एक वेळ अशी येते कि आता पुढे शिक्षण घेत राहणे अशक्य होऊन गेल्यासारखे वाटू लागते. 

आनंदीबाईंच्या ह्या प्रयत्नांची माहिती अमेरिकेतील कुठल्याश्या मासिकात प्रसिद्ध होते. ती माहिती अमेरिकेतील एक सहृदय महिला वाचते आणि आनंदीबाईंना मदत करायचे ठरवते. त्यानुसार हि सहृदय महिला गोपाळरावांशी पत्राद्वारे संपर्क साधते आणि अखेरीस आनंदीबाईंना अमेरिकेतील विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घ्यायला प्रवेश मिळतो!

हा सर्व प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार येऊन गेला. प्रतिकूल परिस्थितीशी लढून आपले ध्येय प्राप्त करून घेणारी कित्येक उदाहरणे आपल्या भारताच्या इतिहासात देखील सापडतील. परंतु त्याहून महत्वाचे मला जे जाणवले कि अनुकूल किंवा प्रतिकूल, कुठल्याही परिस्थितीत माणसाने आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.

जर मनुष्य प्रयत्न करत राहिला तर नशीब त्याला साथ देते, नव्हे नव्हे "जिथे सर्व मार्ग बंद होत आहेत असे वाटते तिथे नशीब किंवा भाग्य किंवा भाग्यविधाता किंवा एक अनामिक शक्ती किंवा इतर काही म्हणा, प्रयत्नवादी माणसासाठी मार्ग आखू लागते"!

शाळेत असताना प्रा. शिवाजीराव भोसले "दीपस्तंभ" ह्या शीर्षकाखाली भारतातील महनीय व्यक्तिमत्वांची लेखमाला ‘सकाळ’ वृत्तपत्रात लिहीत असत. ती मी आवर्जून वाचत असे, त्याची कात्रणे कापून ठेवत असे, जी आजही माझ्याकडे आहेत. त्या लेखमालेत स्वामी विवेकानंदांवर प्राचार्यांनी लिहिलेल्या लेखात, स्वामीजी शिकागोला जाण्यापूर्वी भारतभ्रमण करत असतात आणि आता पुढे काय असा विचार त्यांच्या मनात असतो, तेव्हा अचानकपणे त्यांना शिकागोच्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण मिळते. त्यावर प्राचार्यांनी लिहिले होते कि 'त्याचवेळी इतिहास स्वामीजींचा पुढील मार्ग आखत होते'

माझे आजोबा नेहेमी म्हणत असत कि 'नशीब त्यालाच साथ देते जो प्रयत्न करतो. जर बी पेरलेच नाही तर पाऊस पडला कि न पडला काय फरक पडतो! पण बी पेरल्यावर चांगला पाऊस पडला कि पीक टरारुन येणार हे निश्चित!'

अगदी लहान होतो तेव्हा एक गाणे मला फार आवडत असे -

"जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे 
निराधार आभाळाचा तोच भार साहे"

वरकरणी काही जणांना हे कदाचित दैववादी किंवा देववादी गाणे वाटेल, परंतु ह्यातही पुन्हा तोच संदेश शोधता येऊ शकतो कि जिथे आधार नाही असे वाटते तिथे कुठला तरी आधार निर्माण होतोच होतो, फक्त आपण त्याच्याकडे बघायची आवश्यकता आहे. 

'प्रयत्नांती पारमेश्वर' वगैरे म्हटले जातेच. परवाच एक WhatsApp message होता ज्यात बंद दरवाजा दाखवला होता आणि खाली लिहिले होते (त्याचा आशय असा) 'दरवाजा बंद आहे, पण आतून कुलूप लावले आहे कि नाही ते ठाऊक नाही'. बंद दरवाज्याला धडक दिली तरच समजेल ना कि दरवाज्याला कुलूप घातले आहे कि नाही. सहसा ते घातलेले नसतेच, पण दरवाजा बंद आहे म्हणून त्यावर धडक मारलीच नाही तर ते नशिबाचे; भाग्याचे द्वार कसे  उघडणार!

आमच्या लहानपणीच्या छोट्याश्या घरात भिंतीवर एक वाघाचे चित्र टांगलेले होते आणि त्यावर लिहिले होते 'Find a way, or Make a way'. हा संदेश मनावर फार ठसलेला आहे! मार्ग एकतर शोधायचा किंवा सापडत नसेल तर मार्ग तयार करायचा, निर्माण करायचा!

थोडक्यात मार्ग हा असतोच असतो, तो कधी शोधावा लागतो, कधी बनवावा लागतो! इथून पुढे मार्ग नाही असे होतच नाही. जेव्हा मार्ग दिसत नाही असे वाटते तेव्हा मार्ग बनवायला सुरुवात करायची, पाऊल टाकले कि मार्ग तयार करायचा मार्ग दिसू लागतो, पण पहिले पाऊल हे आपणच टाकावे लागते!

जेव्हा अंधारून येते तेव्हा दिवा लावायला लागतो. मिणमिणता दिवा दोन पावलांपर्यंतचाच रास्ता दाखवतो. पुढे काय असेल ह्याने बिचकून जर आहे त्याचा जागेवर गोठून उभे राहिलो तर पुढे काय आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही. कदाचित थोडे पुढे गेल्यावर प्रकाशाची तिरीप दिसेल. 'every tunnel has an end'. एकदा दिवा हातात घेऊन पुढे पाऊल टाकले कि आणखी दोन पावले पुढचे दिसू लागते. मार्ग प्रकाशमान होऊ लागतो, भयंकर अंधाराने ग्रासलेल्या भुयाराचा अंत कदाचित जवळ येऊ लागतो. ओशो कि इतर कुणीतरी म्हटले आहे ना कि 'जब अंधेरा गहरा हो तो समझना सबेरा नजदिक है!'

बरेच जण हे पहिले पाऊल टाकायला कचरतात आणि त्या घट्ट अंधाराला घट्ट पकडून राहतात. Richard Bach च्या 'Illusions' मध्ये सांगितलेल्या गोष्टी सारखे आपण आपापला दगड दरीत कोसळण्याच्या भयाने घट्ट पकडून आहोत. पण तो दगड सोडला तरच आपल्या पंखांचा उपयोग आपल्याला कळेल, तरच आपण आपल्या पंखातील शक्तीचा वापर करून ह्या असीम आकाशात निर्भीडपणे मुक्त विहरू शकू!

थोडासा धीर, थोडासा यत्न्य, थोडासा स्व-विश्वास ह्यातून निराशेचे मळभ दूर सारून यश-आनंदाच्या निळ्या आकाशात झेपावता येईल! फक्त पहिले पाऊल टाकलेच पाहिजे!

- सारंग भणगे!

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...