देव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय? ह्या विषयावर अगदी college च्या दिवसांपासून चिंतन करत आलो आहे. विधी महाविद्यालयातील पहिल्या वर्षी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संपूर्ण वर्गासमोर आपल्या आवडत्या विषयावर एक भाषण द्यावयाचे असायचे. त्यावेळीही मी आपल्या परीने समजलेला 'देव म्हणजे काय?' असाच विषय निवडला होता. हा विषय असा आहे कि ज्यावर अखंड आयुष्य चिंतन करीत राहिले तरी कदाचित निश्चित उत्तर मिळणार नाही, किंवा उत्तर मिळून देखील समाधान होणार नाही, किंवा आज मिळालेले उत्तर उद्या वेगळ्या स्वरूपात समजेल; अधिक स्पष्ट होईल. त्यामुळेच ह्या प्रश्नाचे वेळोवेळी झालेले आकलन, आपले जमा झालेले चिंतन व्यक्त करत राहण्यातून हा शोध अधिक सुस्पष्ट होत जाईल असे वाटते.
दुसरा भाग म्हणजे, हा प्रश्न म्हटले तर इतका जटील आहे कि कदाचित प्रत्येकाला सापडलेले उत्तर हे निरनिराळे असू शकेल आणि ती सारीच उत्तरे आपापल्या जागी बरोबर असू शकतील - पूर्णतः वा अंशतः! किंवा कदाचित हा प्रश्नच नसेल किंवा ह्याला निश्चित असे उत्तरच नसेल. शक्यता अनेक आहेत, आणि अशा अनेक शक्यतेतील एक शक्यता माझ्या आकलनानुसार मांडायचा हा प्रयत्न! जिथे वेदोपनिषदांनीदेखील ह्या प्रश्नाचे उत्तर देताना केवळ नेsति नेsति एवढेच सांगितले, तिथे माझ्या ह्या आणखी एका प्रयत्नाला कुणी नेsति म्हणून नाकारले तरी त्याबद्दल मला खचितच खेद वाटणार नाही.
सनातन धर्मामध्ये ईश्वर हा चैतन्यस्वरूप मानला आहे. ईश्वराचे वर्णन करताना सतचित्तानंदस्वरूप असेही केले जाते, ह्यामधील सत् म्हणजे सनातन अर्थात चिरंतन किंवा शाश्वत, तर चित् म्हणजे विशुद्ध अशी चेतना अर्थात चैतन्य.
सनातन धर्मातील दुसरी एक धारणा म्हणजे ईश्वर जर मूर्तिमंत चैतन्य असेल तर सर्व प्राणिमात्र हे त्या चैतन्याचे अंश आहेत, म्हणजेच प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे, ईश्वरीय चेतनेचा अंश आहे, आणि म्हणूनच तत्वमसि म्हणजे 'तो (ईश्वर) तूच आहेस', अहं ब्रह्मास्मि म्हणजे मीच ते ब्रम्ह आहे अशा मान्यता आहेत. त्यामुळेच 'नर का नारायण' होऊ शकतो ही मान्यता आहे. अर्थात, ईश्वर हा सर्वाभूती समाविष्ट आहे, आणि तो चेतनेच्या स्वरूपात प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये, अगदी जड वस्तूंमध्येदेखील प्रकट झाला आहे, परावर्तित झाला आहे. ह्या विचाराचे एक स्पष्टीकरण विश्वनिर्मितीच्या वैदिक मान्यतेमध्ये निहित आहे. 'एकोऽहम् बहुस्याम्' ह्या सूत्रामधून वैदिक वाङ्मयात विश्वनिर्मिती सांगितली गेली आहे. ईश-तत्व हे एक होते आणि त्या तत्वाने बहू अर्थात अनेक होण्याचा 'संकल्प' केला. त्या संकल्पाची परिणती म्हणजे ते सघन एकमेवाद्वितीय चैतन्यस्वरूप ईशतत्व बहू झाले, आणि ते बहू होताना त्या अतिप्रचंड अतिसामर्थ्यशाली ईश्वरीय चेतनेतून त्या चेतनेची अनेकविध रूपे निर्माण झाली. Big bang theory मध्येही अगदी हेच सांगितले आहे कि संपूर्ण विश्व हे singularity स्वरूपात असताना प्रचंड महास्फोट होऊन विश्व, अंतराळ, ग्रह-तारे ई. तयार झाले. हि singularity म्हणजेच ते चैतन्यस्वरूप ईश तत्व, आणि त्या प्रचंड स्फोटातून निर्माण झालेली, बहुस्याम झालेली सृष्टी म्हणजेच त्या singularity चीच अनेक दृश्य रूपे. ह्या न्यायाने प्रत्येक अणुरेणूंमध्ये, मग भले तो जड वस्तूंमधील असो कि जड देहांमधील, सर्वत्र ते singularity नामक ईशतत्व समाविष्ट आहे. ह्याचाच अर्थ सृष्टीच्या प्रत्येक घटकामध्ये चेतना आहे. काही घटकांमध्ये ती अधिक जागृत आहे, तर काही घटकांमध्ये ती सुप्तावस्थेत आहे. चेतना जागृत असणारे सजीव आणि नसणारे निर्जीव. निर्जीव वस्तूंमध्ये चेतना नाही हा भ्रम आहे हे तर आजच्या शास्त्राने देखील सिद्ध झाले आहे. प्रत्येक वस्तूमध्येदेखील binding energy च्या स्वरूपात अतिप्रचंड अशी चेतना असते. आईन्स्टाईनच्या E = mc² ह्या formula मध्ये हेच सांगितले आहे कि प्रत्येक वस्तूमध्ये त्या वस्तूचे वस्तुमान आणि प्रकाशाच्या वेगाचा वर्ग ह्यांचा गुणाकार केला तर तेवढी चेतना अर्थात ऊर्जा त्या वस्तूमध्ये आहे. म्हणजे एखाद्या अत्यंत छोट्या वस्तूमध्येदेखील अतिप्रचंड ऊर्जा/चेतना असते. ह्या ऊर्जेच्या स्फोटातून किती महाभयानक संहार होऊ शकतो हे जगणे हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटातून पहिलेच आहे.
ह्यावरून असे लक्षात येते कि संपूर्ण विश्वातील सजीव-निर्जीव वस्तू, प्राणिमात्र ह्यांच्यातील हि चेतना, हि ऊर्जा जर एकत्र केली तर ती मानवी मनाच्या कल्पनेपलीकडील अति-अति-अति-प्रचंड अशी चेतना असेल, आणि तीच मला आकलन झालेली ईश्वरीय चेतना होय, तोच ईश्वर होय! सोपे करून सांगायचे झाले तर एकोऽहम् बहुस्याम् ह्यातून संपूर्ण विश्व निर्माण झाले कि जे त्या एकाचे / singularity चेच प्रतिरूप आहे, आणि तीच अतिप्रचंड चैतन्य प्रत्येक प्राणिमात्र आणि वस्तूमध्ये अंश रूपात प्रकट झाली आहे. संपूर्ण सृष्टी हि त्या ईश्वराचेच रूप आहे, त्याचाच खेळ आहे, त्याचीच माया आहे. हि दृश्य, इंद्रिय गोचर सृष्टी हि माया आहे कारण जे इंद्रियांना जाणावते आहे ते संपूर्ण सत्य नाही, तर तो केवळ एक दिखावा किंवा देखावा आहे, पण तरीही जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वरच आहे.
वैदिक विचारांमध्ये ईश्वर हा कुठल्याही इंद्रियांना न जाणवणारा आहे - रंग-रूप, वास, स्पर्श, नाद, चव ह्या सर्वांपलीकडे आहे, त्यामुळेच त्याचे वर्णन नेsति नेsति असेच करणे क्रमप्राप्त आहे. जे तत्व हे संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे मूळ आहे, त्याचे वर्णन सृष्टीतील काही वस्तू-पदार्थ सांगून कसे करणार!. ऊर्जा अथवा चैतन्य हे देखील जोवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रकट होत नाही तोवर ते देखील इंद्रियगम्य नाही.
ह्या चैतन्याचा अंश जसा संपूर्ण सृष्टीमध्ये प्रतिबिंबित झाला आहे, तसाच तो काही विशिष्ट जीवांमध्ये अधिक प्रकर्षाने, अधिक प्रखरतेने, अधिक प्रभावीपणे आविष्कृत होतो. जसे एखाद्या electrical device ला अधिक मोठा current चालतो कारण त्याची तशी capacity असते, तद्वतच हे ईश्वरीय चैतन्य जेव्हा पूर्ण स्वरूपात एखाद्या मनुष्यामध्ये आविष्कृत होते तेव्हा त्याला ईश्वराचा अवतार किंवा पूर्णांश असे म्हणणे अगदी स्वाभाविक आणि तार्किक देखील आहे.
चैतन्य चराचरांमध्ये असल्याने, अचर गोष्टींमध्ये सुद्धा ती सुप्तावस्थेत संचारीत होत असते. परंतु जेव्हा चर आणि अचर हे दोन्ही एकाच चैतन्यस्वरूप तत्वातून निर्माण झालेले आहेत, तेव्हा अचर वस्तूतील सुप्त चेतनेला ऊर्जांवस्था देणे जसे nuclear reaction देताना शक्य आहे, तसेच ज्यांना ह्या विश्वाच्या एकात्मितेची जाणीव स्पष्ट झाली आहे, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी चर - अचर हा भेदच केवळ आभासी आहे, त्यांना ती अचर वस्तूला चेतना देऊन ती चर करणे अशक्य नाही. जेव्हा वस्तुमान आणि ऊर्जा ह्या नाण्याच्या केवळ दोन बाजू आहेत, नव्हे नव्हे त्या एकच आहेत, फक्त त्या एकमेकात रूपांतरित होऊ शकतात, मग एखाद्या ज्ञानदेवाला भिंत चालवणे किंवा एखाद्या रेड्याच्या तोंडी वेद वदवणे हे का शक्य नसावे! मुळात ज्याचे मूळ एकच आहे त्याच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये भेद मानणे हेच (आपल्या आणि पर्यायाने सृष्टीच्या, सृष्टीतील सर्व घटकांच्या सत्य स्वरूपाचे) अज्ञान आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सारेच एकाच सघन चिरंतन, सनातन चेतनेची आविष्कृत झालेली रुपेच केवळ आहोत, आणि ज्यातून आपण निर्माण झालो आहोत त्याच परमचैतन्यताच आपल्याला पुन्हा विलीन व्हायचे आहे (कारण जिथून ती चेतना आली तिथेच ती परत जाणे अगदी स्वाभाविक आहे), तर मग त्या परमचैतन्यमध्ये (अर्थात ईश्वरमध्ये) आणि आपल्यामध्ये भेद असणे, द्वैत असणे हि केवळ माया आहे, आणि ते आपले अज्ञान आहे. द्वैत हे केवळ दृश्य किंवा इंद्रिय-नैमित्तिक आहे, पण इंद्रियांच्या अतीत जेव्हा आपल्या चित्ताचा विकास होईल तेव्हा हे अशाश्वत मायारूपी पडदा दूर सरून मूळ ईशतत्व किंवा परमचैतन्य आणि आपल्यातील चैतन्य किंवा वस्तुमानरूपी चैतन्य ह्यात अद्वैत आहे ह्याची जाणीव होईल. सगुण आणि निर्गुण हा वादही इथेच मिटतो, कारण सगुण चैतन्यासाठी सगुण ईश्वराची आवश्यकता तोवरच आहे जोवर सगुणातील निर्गुणाची जाणीव स्थिर होत नाही. जेव्हा हि जाणीव स्थिर होईल, ज्ञान प्रकट होईल, तेव्हा सगुणाची आवश्यकता जरी नसली तरी सगुण हे निर्गुणाचेच स्वरूप आहे हे उमजल्याने सगुणा विषयी काही आक्षेप उरत नाही.
मला आजपर्यंत झालेल्या आकलनानुसार वैदिक शास्त्रातील ईश्वराविषयीचा विचार हा पूर्णतः E = mc² ह्या formula मधून तंतोतंत explain होतो, आणि म्हणूनच मी त्याला ईश्वराचा formula असेच म्हणतो!
सारंग भणगे.
No comments:
Post a Comment