वेशीवरचा दरवेशी
त्याचा वेष वेगळा होता ।
जगण्यासाठी मरण्याचा
तो खेळ आगळा होता ॥
दाखवुन तो कसरती
करती रंजन लोकांचे ।
पोटामधल्या आगीसाठी
घास जळत्या ओकांचे ॥
काचा खातो कचाकचा
खातो कच ना खेळात ।
उड्या मारी दोरीवरी
आणि आगीच्या लोळात ।।
हमी न पुढल्या श्वासाची
हाय मांडला जुगार ।
जीव लावला डावाला
किंमत तरीही भंगार ।।
चालत वहाण्या आयुष्य
वहाण केली ही चमडी ।
टाळ्या पिटून बघे अखेरी
फेकती कवडी अन दमडी ।।
मरणाशी तो लढून जिंके
जगण्यासाठी फिरे कटोरी ।
तुकडा तुकडा आयुष्य
कणाकणाने पुन्हा बटोरी ।।
=============
सारंग भणगे. (२३ डिसेंबर २००९)
No comments:
Post a Comment