Wednesday, January 27, 2010

भावस्थंडिल

वृत्त - मनोरमा - गालगागा गालगागा)

पोळलेल्या काळजाला
द्या दिलासा वादळाला.

पोर छोटा पोहताना
पार गेला... हो तळाला.

ढोल वाजे भावनांचा
साथ देतो गोंधळाला.

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला.

मानताती वीर त्याला
वेळ येता तो पळाला.

काळ येता फासताती
काजळीही काजळाला.
===========
सारंग भणगे. (२७ जानेवारी २०१०)

Sunday, January 24, 2010

रजनी

संधी साधुन संध्या आली
गाली घेऊन गुलाब लाली
पीत पोत ते मऊ उन्हाचे
सांज सावली सोनसावळी

नीलनभाची सनिल आभा
क्षितीज टाके पिऊन गाभा
खगरांगांची रंगमधुरा
रम्य रमणी रजनी-रंभा

काजळवेडी गडद शर्वरी
शुभ्रचांदणे किनार भर्जरी
गर्भरेशमी कुंतल काळे
रजनी आली लाजलाजरी.
=============
सारंग भणगे. (जानेवारी २०१०)

कुणी एक कृष्ण उधार द्या रे

लखलाभ तुजला तुझे सुर्य - तारे
मी अंधारयात्री! मज अंधार द्या रे!

तमाच्या भितीची तमा रे कुणाला
मला त्या तमाचाच आधार द्या रे!

त्या उन्मत्त लाटा आल्या फिरूनी
नको जीत मजला, माघार द्या रे!

मी पेटलेलो, तुला काय त्याचे
मला पेटलेला अंधार द्या रे!

तो कृष्ण गेला अंधार झाला
कुणी एक कृष्ण उधार द्या रे!
===============
सारंग भणगे. (२३-२४ जानेवारी २०१०)

ऋतु

हवेत नुसता सुटलाय गारवा
कॉफी बरोबर ऐकावा मारवा.

थेंबात पाऊस नाचे रूणझुण
लताची सुरेल तरल गुणगुण.

उन्हाची उठे अशी काहिली
ग्रेसच्या डोळा दुपार पाहिली.

प्रत्येक ऋतुत आनंद लकेर
आनंद आदि आनंद अखेर.
============
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

सिगारेटी देवी

ओठांनी एकदा घेतली शप्पथ
ओढणार नाही आता लपतछपत.

पब्लिकमध्ये तीला लावीन ओठांना
चिमटीत धरायची सवयच आहे बोटांना.

झुरक्याचा आनंद भुरक्यात नाही
जगू भले उपाशी, पण नरकात नाही.

तीला एवढे 'मारून' नाही तक्रार
बायकोसारखि नाही बदलते 'आकार'

एवढीशी नळकांडी दूर तीचा महिमा
नको वैधानिक ईशारे 'त्राही मां त्राही मां'

कवियित्री बहुदा असावी खरी
स्वतः जळूनही ती आनंदच बिखरी.

सिगारेटी देवी तुला माझा सलाम,
आयुष्यभर राहीन बाई मी तुझा गुलाम...मी तुझा गुलाम.
======================
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

??

तो अडकलाय..
अगदि पुरता अडकलाय..
त्याच्याभोवती विणलंय
कवितेचं एक भक्कम चक्रव्युव्ह,
आणि
शब्द, भाव, छंद, वृत्त, अलंकार, गण, मात्रा, व्याकरण..
सारे त्याला आपल्या अमोघ शस्त्रांनी
विद्ध करीत सुटलेत..
अजुनही तो अपराजीत आहे,
आणि मला खात्री आहे,
तो त्या सा-यांचे आव्हान
निश्चित परतावुन लावेल.
पण मला भिती आहे..
त्याला परतीचा रस्ता ठाऊक असेल का?
असलाच तर तो मला परत भेटेल,
याच असीम आकाशाच्या,
निस्सीम छायेमध्ये,
मला माझा..
हरवलेला..


आशय!
===========
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

Thursday, January 21, 2010

आला क्षण गेला क्षण

आला क्षण गेला क्षण
फिकिर ईथे कुणा,
कालातीत मस्तीत
रहाण्याचा केला गुन्हा.

मरतो आहे ईथे जो तो
क्षणेक तरी जगतो का?
काळाला त्या आनंदाचे
आंदण थोडे मागतो का?

क्षणेकही नाही करायाची
भिती-क्षिती हो क्षणांची,
क्षण-क्षण घेऊ वेचूनि
माती आनंद कणांची.

क्षणभर द्यावा विश्रामाचा
आनंद त्या क्षणाला,
धावतोच आहे वेडा कधीचा
आयुष्य लाऊन पणाला.

आला क्षण गेला क्षण
निव्वळ मातीचे ते कण,
नाही दिला जर त्याला
आनंदाचा एक तरी क्षण.
=============
सारंग भणगे. (२१ जानेवारी २०१०)

Saturday, January 16, 2010

आली कविता आली..

बोचली दु:खपुष्पे ऊराशी
माळली माझ्याच केशी
रसिकास रिझवताना
जाळल्या माझ्याच पेशी

श्रृंगार जळून पेटण्याचे
व्यापार आतून तुटण्याचे
घातलेले बंध सारे
कवितेतून फुटण्याचे

पावलास वादळाची आस
जगण्यात मृत्युचा श्वास
पुरलेल्या अस्तित्वाच्या
स्वप्नात सत्याचे भास

मी उध्वस्त ईमला
पहा रसिक जमला
तारीफांच्या फैरीमध्ये
अवशेष विशेष रमला

जखमांच्या फुलल्या वेली
वेदना गर्भार झाली
पेटून सर्वस्व माझे
आली कविता आली..
===========
सारंग भणगे. (२००९)

काही केल्या जात नाही!

आली आली ती आतुन
गेली गेली ओसंडुन
तीला नाही तळ जरी
गेली तळा ढवळून

शोधू तीला किती कुठे
यत्न सारे झाले थिटे
एके दिनी अचानक
वेडी ऊराऊरी भेटे

ओठ तीचे ते पातळ
बांधा नि सडपातळ
स्पर्श तीला करू जाता
भासे कठिण कातळ

खोल गेली अशी आत
जशी वीज काळजात
घट्ट रूतली अशी कि
काही केल्या नाही जात..
काही केल्या नाही जात..
=============
सारंग भणगे. (१६ जानेवारी २०१०)

Wednesday, January 13, 2010

निसर्ग आई

उंच डोंगर; निळे सुंदर, हिरवी दुलई मृदुल त्यावर,
झुळझुळ पाणी; मंजुळ गाणी, वा-याचा नि विमुक्त वावर.

श्वेत ढगांची सुंदर नक्षी, निलाकाशी रंगीत पक्षी,
फुटे तांबडे क्षितीजावरती, फिटे पारणे दोन्ही अक्षी.

हसती पाने; डुलती राने, फुले सुगंधित गाती गाने,
मऊ लव्हाळी प्रातःकाळी, दंवात भिजती आनंदाने.

गार लहरी; गोड शिरशिरी, मऊ उन्हाचे पोत भर्जरी,
थंड धुक्याचा फेडित पडदा, बालकिरणे लता वल्लरी.

निर्झरकाठी तरूवर दाटी, वाकुन घेती सलिल गाठी,
चिंब भिजूनी काळे पत्थर, दाटून येते त्यांचे कंठी.

फुले गोजिरी लाजलाजरी, ताम्र आम्र नि पीत अंजिरी,
कुसुम सुंदर सारा परिसर त्यावर डुलती तुळस मंजिरी.

उर्ध्व निळाई; भू हिरवाई, सृष्टी वैभव ही नवलाई,
देवाचे हे समूर्त दर्शन, नितनित वंदन निसर्ग आई.
==========================
सारंग भणगे. (१३ जानेवारी २०१०)

Sunday, January 3, 2010

हातावरचा फोड़

कधी करते कट्टी
कधी करते बट्टी
आई म्हणते झाली आहे
हल्ली फार हट्टी

कधी पटकन रुसते
कधी खुदकन हसते
जिलबी सारखि गोलगोल
फतकल मारून बसते

कधी होते आई
कधी होते ताई
शाळा भरवुनी मोठ्यांची
कधी होते बाई

कधी मारते गप्पा
कधी मारते थापा
बाबा आणि रागवता
देते गोड पापा

आहे मोठी गोड गोड
आंब्याची फोड फोड
बाबा-आईसाठी तर
हातावरचा हा फोड
=========
सारंग भणगे. (३ जानेवारी २०१०)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...