Wednesday, January 13, 2010

निसर्ग आई

उंच डोंगर; निळे सुंदर, हिरवी दुलई मृदुल त्यावर,
झुळझुळ पाणी; मंजुळ गाणी, वा-याचा नि विमुक्त वावर.

श्वेत ढगांची सुंदर नक्षी, निलाकाशी रंगीत पक्षी,
फुटे तांबडे क्षितीजावरती, फिटे पारणे दोन्ही अक्षी.

हसती पाने; डुलती राने, फुले सुगंधित गाती गाने,
मऊ लव्हाळी प्रातःकाळी, दंवात भिजती आनंदाने.

गार लहरी; गोड शिरशिरी, मऊ उन्हाचे पोत भर्जरी,
थंड धुक्याचा फेडित पडदा, बालकिरणे लता वल्लरी.

निर्झरकाठी तरूवर दाटी, वाकुन घेती सलिल गाठी,
चिंब भिजूनी काळे पत्थर, दाटून येते त्यांचे कंठी.

फुले गोजिरी लाजलाजरी, ताम्र आम्र नि पीत अंजिरी,
कुसुम सुंदर सारा परिसर त्यावर डुलती तुळस मंजिरी.

उर्ध्व निळाई; भू हिरवाई, सृष्टी वैभव ही नवलाई,
देवाचे हे समूर्त दर्शन, नितनित वंदन निसर्ग आई.
==========================
सारंग भणगे. (१३ जानेवारी २०१०)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...