Monday, September 19, 2011

यौवन-सरिता

उदासवेळी तुला पाहूनी काळीज माझे गलबलले,
प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

लावण्याची खाण जणू तू रूप तुझे ते बावनकाशी,
रुतूशारदा लेउनी आली 'वसंत'वैभव 'श्रावण'मासी.
तुला पाहूनी, "दिव्य अप्सरे" गुलाबमांडव हळहळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

क्षितीजावरती डुंबत होता रविकरसागर उदासवाणा,
उषा कपोली पाहूनी झुकला उर्ध्वदिशेला प्रकाशराणा.
सायंकाळी उषा जाहली पाहूनी तारे जळफळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

यौवन-सरिता दुथडी भरूनी तुडुंब वाहे तुझ्या गोकुळी,
चकोर-चातक क्षुब्ध जाहले चांदणराती-पाउसकाळी.
शिशीरपाने पाचोळाही पदस्पर्शाने सळसळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

पुष्पपाखरे डोलू लागली; भृंगथव्यांनी केले आर्जव,
सुगंध ल्याले कडूलिंबाने; निवडूंगाने ल्याले मार्दव.
ग्रीष्मामधले माळरान ते तुला बघुनी हिरवळले.

प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.

अशी पळाली मरगळ सारी चैतन्याने भरली सृष्टी,
हिरण्य-किरणे घे'ऊन' आली वातावरणी श्रावणवृष्टी.
'कपोल'कल्पीत आनंदाने सरितातटही खळखळले.
प्राजक्तावरी परसामधल्या रंगीत बुलबुल किलबिलले.
====================================
सारंग भणगे. (१८ सप्टेंबर २०११)

Sunday, September 18, 2011

राघव वेळी

घननिळा अशी कोसळते
कपिलेचा पान्हा फुटतो,
आईच्या गगनावरती
घनगार शहारा उठतो.

संध्येचे पाउल वेडे
रात्रीच्या वाटे वळते,
स्वप्नांच्या काठावरती
आठव बालक पळते.

हा देह स्फटिक होतो
चांदण स्पर्शामधुनी,
का दुःख बरे पाझरते
त्या देवीच्या डोळ्यामधुनी.

हा डोह कळेना आहे
खोल किती; किती गहिरा,
विरघळती व्याकूळ हाका
हा अंत:करणी बहिरा.

गर्भार धरा पुटपुटते
आनंदघनाची गाणी,
त्या गढूळ स्वरमेघांना
फुटते श्रावण वाणी.

मी शब्दांचे ठिपके देतो
या लाघव राघव वेळी,
तो श्यामल घालून कुंची
ओढतो अक्षर ओळी.
==================
सारंग भणगे. (१३ सप्टेंबर २०११)

Monday, September 12, 2011

मिसरे

जगावयाचे विसरुन गेलो लिहीत गेलो चुकार मिसरे,
कधी कुणाच्या गझलांमधुनी मागत गेलो उधार मिसरे.

आयुष्याच्या वाटा होत्या बिकट तरीही चालत गेलो,
वळणावरती भले हासरे भेटत गेले चिकार मिसरे.

कुणी फाडल्या, कुणी जाळल्या, कुणी बुडविल्या गाथा-पोथ्या,
भाळावरती काळाच्याही कोरुन गेले विचार मिसरे.

बेड्या ठोका, बंदी घाला, तोडुन टाका नसानसांना,
झुंडशाहिशी झुंजायाला शस्त्र नको तू उगार मिसरे.

थकवित गेले; फसवित गेले; तरी अखेरी बाजी माझी,
संकटकाळी संकटमोचन शिकवित गेले हुशार मिसरे.

कोटी तारे नभात असती तरीहि आगळा सूर्य दिसे,
उगा कशाला हजार गझला बरे लिहा दोन-चार मिसरे.

कौतुक करती वा-वा करती; श्रोते तारिफ फुकाच करती,
स्वानंदाच्या खुशीत देती हारतु-यांना नकार मिसरे.

=========================================
सारंग भणगे. (११ सप्टेंबर २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...