Tuesday, March 27, 2012

बघा माणसांच्या जगा

बघा माणसांच्या जगा
देती माणसेच दगा.

कसा केसाने कापती
गळा; पाठी खुपसती,
खंजिराला अशी धार
करी सपासपा वार.
आपल्याच माणसांच्या
नावे उगा रे शिमगा II१II


देव करी देवघेव
भावनेला नाही भाव,
त्याला देवळाचे घर
नको काळजाचे घर.
काळजाला घरघर
लावी देवही टोणगा II२II
-----------------------
सारंग भणगे

कवि ग्रेस

नियतीन जीवन आणि मृत्यू यांच्यातला अंतरपाट ओढून घेतला; आणि ग्रेस गेले.......

ग्रेस गेले आणि कवितेच्या अंतराळात शेकडो न उकलणारी कृष्णविवरे ठेऊन गेले. अनाकलनीय, अगम्य, गूढ आणि संदिग्ध अशा विशेषणांनी त्यांच्या कवितेला जी दूषणं दिली; किंवा विशेषण दिली, त्याचं काहीच विशेष वाटून न घेता, कवितेला कवितेचच आभूषण देऊन गेले.

ग्रेसची कविता समजण्याची कविता नव्हती, ती समजण्याच्या पलीकडचीहि नव्हती, ती अनुभवण्याची कविता होती. शब्दांच्याही पलीकडे असलेल्या अनाम भावनांना शब्दविभोर करणारी कविता होती.

त्यांची कविता मोर पिसासारखी मृदू मुलायम नव्हती कि तलवारी सारखी धारदारहि नव्हती; ती काळजात खोल दडलेल्या अंधाराच्या शाईत बुडवून काट्याने लिहिलेली कविता होती. दु:खाशी विलासमग्न होत नग्न भावनांनी शब्दांशी समागम करणारी कविता होती, कारुण्याच्या तारुण्याला शब्दांनी समृद्ध करणारी कविता होती. भळभळून वाहणाऱ्या व्रणांना श्रीमंत करणारी कविता होती.

त्यांच्या कवितेवर कुणाची छाप नव्हती, असूच शकत नव्हती; पण त्यांची कविता हत्तीच्या पायाने दलदलीत खोल ठसा उमटवावा तसा ठसा मनावर उमटवणारी होती.

त्यांच्या कविता म्हणजे अजाणतेपणान जाणिवांना ढवळून टाकणारे ओथंब होते. त्यांचे शब्द म्हणजे अमूर्त भावनांचा जगड्व्याळ पसारा होते. खरेतर शब्दांना अगम्य असणाऱ्या भावनांना शब्दांच्या कचाट्यात पकडून भावनांचे धबधबे आपल्या अंगावर लोटून देणारे ते कवी होते. गूढतेच्या गर्भगार डोहात बुडी मारून जाणिवांच्या किनाऱ्यावर घनचिंब शरीराचे निथळणे हि त्यांची अशरीर कविता होती. त्या शब्दांना कोंदण नव्हते; ते शब्द म्हणजे भावनांचे गोंदण होते, त्या शब्दांना चौकटी नव्हत्या; पण त्या शब्दांना भूमितीतल्या 'रेषेची' infinity होती.



अंतर्यामीच्या अंधारविश्वातील अनवट वाटा तुडवत जाताना घनघोर व्यथेच्या ज्योतींनी अज्ञेयाचे पाडाव शोधणारी त्यांची कविता, दुर्बोधतेचा शाप घेतलेली; परंतु अबोध भावनांना शब्द बोध देणारी त्यांची कविता, शब्दांच्या अत्तरानं भावनांचा उग्र घमघमाट पसरवणारी त्यांची कविता, कळण्याच्या अतीत असलेल्या कळांना शब्दकळांनी प्रसवणारी त्यांची कविता, आयुष्याच्या उजाड दुर्गम प्रदेशांना आपल्या तळव्यांच्या स्पर्शाने जीवंत करणारी त्यांची कविता, मनाचे कानडे कोनडे धुंडाळणारी, तळाशी नाळ जोडून तळालाच ढवळून काढणारी त्यांची नितळ कविता, अन प्रकाश किरणांना न सापडलेल्या सांदी कोपऱ्यातून गोठून बसलेला अंधार जगण्याच्या अंगांगावर उधळत वेदनांचा उत्कट जल्लोष करणारी त्यांची कविता.......................

कवितेच्या ज्या वाटांवर सहसा कुणी फिरकत नाही अशा मार्गांवर आपल्याला नेऊन सोडणारा हा वैराग्य-भोगी कवी अक्षरांना अमर करून गेला;

ते श्वास आता थांबलेत; आणि जीवनाचाच जी निश्वास होती ती त्यांची कविताही!

Sunday, March 25, 2012

शिवबा छत्रपती झाला

हर हर गर्जत महादेव तो धरतीवर आला
मत्त दानवा जाळीत पोळीत नेत्रातील ज्वाळा
महाराष्ट्राच्या क्षितिजावरती प्रतीभास्कर आला
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झाला IIधृII

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS

आयुष्याची मशाल केली स्वातंत्र्यासाठी
जळून आता ओवाळतीते नयनांच्या ज्योती
मावळ लाटा जणू थडकती रायगडकाठी
सातपुड्याची फुलून आली बुलंद ती छाती

सार्थकतेचे जणू वाहती डोळ्यातून मोती
यश-विजयाचे निनाद फुटती वाद्यांचे ओठी
रक्तपिपासू आज झुकली खड्गांची पाती
मुज-यासाठी मुजोर वाकल्या सैतानी पाठी

विजयध्वज तो मिरवीत मिरवीत अश्वमेध आला,
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झालाII१II

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS

दारोदारी गुढ्या-तोरणे सडा संमार्जने
रांगोळ्यांनी सजले अंगण तुळशी वृंदावने
औक्षण करण्या लक्ष तेवती वाती निरांजने
मनात राजे विराजलेले सुवर्ण सिंहासने

रुबाबात तो जणू चाललामृगेंद्र दरबारी
मुजरे झडती देती सवाया उठे ललकारी
"गाय-ब्राह्मणा नारी रक्षणा उचले तलवारी"
"योगी तरीही छत्र-चामरे आज शिरीधारी"

मावळ तेजापुढे म्लेंछ तो करपून मावळला,
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झाला II२II

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS

विजय दुंदुभी दुमदुमल्या त्या गगनाच्या पोटी
सुल्तानांचे पोट फाडले; मुघलांची छाती
नृप-शार्दुल तो झणी पाहण्या जनतेची दाटी
जननी लोचन आले भरुनी पाहुनी छत्रपती

तृप्त जाहल्या संतोषाने पाषाणाच्या मूर्ती
आज उघडली परब्रम्हाने स्वर्गाची ताटी
युगायुगांनी अखेर झाली स्वप्नांची पूर्ती
कलियुगातल्या प्रभू रामाला प्रणाम कोटी कोटी

कोटी कोटी कंठांमधुनी नारा गडगडला,
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झाला II३II

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS
---------------------------------------------------
सारंग भणगे (२५मार्च २०१२)

Friday, March 16, 2012

तुला पाहुनी


तुला पाहुनी हे
असे वाटते कि
किती गार होता
तेव्हा उन्हाळा IIध्रुII

आता हा असा मी
शिशिराप्रमाणे
गेली झाडुनी
फुले रान पाने.

मला सोसवेना
असा आसवांचा
मनी झोंबणारा
पुन्हा पावसाला II१II

आता हा उभा मी
क्षितीजाप्रमाणे
दिसेना तरीही
धुक्याच्या थराने.

तुझ्या सोबतीने
उबदार होता
मला बोचणारा
तेव्हा हिवाळा II२II
============
सारंग भणगे. (मार्च २०१२)

जरा वेगळी वाटते

वेगळ्या कोनातुनी जरा वेगळी वाटते,
तीच मोनालिसा मला जरा वेगळी वाटते.

शांत पाणी त्या नदीचे पाहतो कितीदातरी,
या किनारी पाहता जरा वेगळी वाटते.

रोज येती पाहुनी 'श्याम'ला ती मेहुणी,
राहुनी मज राहुनी जरा वेगळी वाटते.

तोच राजा तीच राणी राक्षसाची ती कहाणी,
रोज आज्जी सांगते जरा वेगळी वाटते.

तेच साधे शब्द नि त्याच सध्या कल्पना,
ऐकविता हि कविता जरा वेगळी वाटते.
===========================
सारंग भणगे. (११ फेब्रुवारी २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...