Sunday, March 25, 2012

शिवबा छत्रपती झाला

हर हर गर्जत महादेव तो धरतीवर आला
मत्त दानवा जाळीत पोळीत नेत्रातील ज्वाळा
महाराष्ट्राच्या क्षितिजावरती प्रतीभास्कर आला
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झाला IIधृII

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS

आयुष्याची मशाल केली स्वातंत्र्यासाठी
जळून आता ओवाळतीते नयनांच्या ज्योती
मावळ लाटा जणू थडकती रायगडकाठी
सातपुड्याची फुलून आली बुलंद ती छाती

सार्थकतेचे जणू वाहती डोळ्यातून मोती
यश-विजयाचे निनाद फुटती वाद्यांचे ओठी
रक्तपिपासू आज झुकली खड्गांची पाती
मुज-यासाठी मुजोर वाकल्या सैतानी पाठी

विजयध्वज तो मिरवीत मिरवीत अश्वमेध आला,
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झालाII१II

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS

दारोदारी गुढ्या-तोरणे सडा संमार्जने
रांगोळ्यांनी सजले अंगण तुळशी वृंदावने
औक्षण करण्या लक्ष तेवती वाती निरांजने
मनात राजे विराजलेले सुवर्ण सिंहासने

रुबाबात तो जणू चाललामृगेंद्र दरबारी
मुजरे झडती देती सवाया उठे ललकारी
"गाय-ब्राह्मणा नारी रक्षणा उचले तलवारी"
"योगी तरीही छत्र-चामरे आज शिरीधारी"

मावळ तेजापुढे म्लेंछ तो करपून मावळला,
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झाला II२II

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS

विजय दुंदुभी दुमदुमल्या त्या गगनाच्या पोटी
सुल्तानांचे पोट फाडले; मुघलांची छाती
नृप-शार्दुल तो झणी पाहण्या जनतेची दाटी
जननी लोचन आले भरुनी पाहुनी छत्रपती

तृप्त जाहल्या संतोषाने पाषाणाच्या मूर्ती
आज उघडली परब्रम्हाने स्वर्गाची ताटी
युगायुगांनी अखेर झाली स्वप्नांची पूर्ती
कलियुगातल्या प्रभू रामाला प्रणाम कोटी कोटी

कोटी कोटी कंठांमधुनी नारा गडगडला,
सप्तनद्यांना धारून शिवबा छत्रपती झाला II३II

शिवबा छत्रपती झालाSS
शिवबा छत्रपती झालाSS
---------------------------------------------------
सारंग भणगे (२५मार्च २०१२)

1 comment:

सारंग भणगे said...

पार्श्वभूमी- महाराष्ट्राचे दैवत असलेला शिवशंभूराजा, आदिलशाहीमध्ये गाढवाचे नांगर फिरवलेल्या पुण्याच्या पुण्यभूमीवर त्यांच्या लाल महालात मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत राहायला आले. तेथे त्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामरिक आणि राजकीय शिक्षण संस्कारांच्या बरोबरीनेच सुरु झाले. अल्पावधीतच शिवबा युद्धपारंगत तर झालाच; परंतु त्याच बरोबरीने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने त्याने तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यासही केला. हळूहळू या शिवबाने बारा मावळातील अठरापगड जातींमधल्या गरिबीत खितपत पडलेल्या मराठी मावळ्यांशी नाते जमवले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अस्मितेची जाणीव निर्माण करायला सुरुवात केली. हळूहळू हा शिवबा आदिलशाही, निझामशाही यांच्या कडील एकेक प्रदेश काबीज करत सुटला. प्रत्येक वेळी नवनवीन युक्तीने आणि क्लृप्तीने त्याने सा-या शाह्यांना चकित आणि चारी मुंड्या चीत करून टाकले. केवळ एक जुजबी वाटणारे बंड हळूहळू एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वरूप घेऊ लागले. मग हे बंड मोडून काढण्यासाठी या शहांनी एकेक मोठमोठी संकटे या छोटुकल्या स्वराज्यावर धाडली. परंतु अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान यासारख्या बलाढ्य सरदारांशी झालेली भयंकर युद्धे असोत की सिंहगड, पावनखिंड-पन्हाळा, पुरंदर सारख्या किल्ल्यांवर मावळ्यांनी दिलेली झुंज असो, हरेक दिन मराठी स्वराज्य विस्तारत गेले आणि एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून वाढत गेले. आणि अशा त-हेने स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणा-या शिवाजीराजांवर राज्याभिषेक होऊन त्यांनी छात्रचामरे धारण केली पाहिजेत हा आग्रह घेऊन प्रत्यक्ष काशीवरून प्रकांड पंडित विश्वनाथ भट्ट उर्फ गागाभट्ट थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची आग्रही विनंती केली. शिवाजी महाराजांनी ती मान्य केली आणि महाराष्ट्रभूमीचे भाग्य खुलले. अनेक युद्धे आणि नाट्यमय प्रसंग दाखवून चित्रपटाचा अखेरचा प्रसंग दाखवण्यात येत आहे तो "शिवराज्याभिषेका"चा!!! चित्रपटातील प्रसंग - एक दवंडीवाला एका गावामध्ये दवंडी देतो - 'ऐका हो ऐकाSSS! आजपातूर अर्ध्या मासानं आपल्या शिवाजीराजाला अभिषेक होनार हाये होSSS! आणि चित्रपटातील गीताला सुरुवात होते........................... ही वार्ता ऐकताच गावातील प्रत्येक माणूस आनंदानं फुलून निघतो. सारे अबालवृद्ध आनंदानं गावाच्या रस्त्यांवर अक्षरश: नाचू लागतात. चहूकडे आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे. सारा मावळ परिसर आनंदानं न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या मातीमाधली हिरवाई नवचैतन्यानं डोलू लागली आहे. रायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गडावर महाराजांच्या दरबाराचे बांधकाम जोरात सुरु झाले आहे. महाराजांचा राजमहाल, अश्वशाळा, गोशाला, मंदिरे, कार्यालये ई. सर्व ईमारतींची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे. महाराजांचे रत्नजडीत सिंहासन, हिरे-माणिकमंडित राजमुकुट, रेशमी उंची पेहराव ई. ची तयारी सुरु आहे. शास्त्रशुद्ध राज्याभिषेकासाठी काशीवरून वेदविद्याविभूषित अनेक महापंडित ब्राह्मण आले आहेत आणि राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी पंचनद्यांच्या पवित्र जलापासून ते चंदन-अष्टगंधादी नाना परिमळ द्रव्यांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक तपशीलाकडे जातीने लक्ष देत आहेत. स्वराज्याचं सैन्यदेखील जोरदार तयारीत आहे. विविध पथके आपापल्या विशिष्ट गणवेशात संचालनाची तयारी करत आहेत. राज्याभिषेक समारोहाच्या वेळी कुठलीही आगळीक होऊन नये याची दक्षता घेण्यासाठीची सज्जता चालू आहे. आणि अखेरीस महाराष्ट्राची भाग्यरेखा बदलणारा; मराठी मातीला तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा, मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला तो दिवस; तो क्षण आला आहे. रायगडावर पहाटेच्या मंगलप्रसंगी होम-हवनादी अनेकविध विधी संपन्न झाल्यानंतर महाराजांवर पंचनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यदेवता शिवाजी महाराज हे राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले आहेत. वेदमंत्रघोषात शिवाजी महाराजांवर छत्र-चामर धरली गेली आहेत आणि गागाभट्ट आपल्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवत आहेत "प्रतीपश्चंद्रलेखेव.............." आणि चित्रपट येथेच संपतो!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...