Tuesday, April 24, 2012

बिखरे पन्ने


हर एक पन्ने पे शुरू एक नयी किताब है;
हर एक याद एक पुरा हुआ ख्वाब है.

बिखरे है पन्ने या सुलझे है कई सवाल;
हर पन्ने पे लिखा शायद कोई जवाब है

है पड़ी कितनी सारी बंद किताबे दुकान में;
बिखरे पन्ने याने जैसे खुली हुई किताब है

खुला हूँ ऐसे मै जैसे खुला असमान, वर्ना
लोगो के चहरोंपे जाने कितने नकाब है.

पन्ने होंगे बिखरे हुए हुजुर ये आपके लिए
मेरे लिए तो वो मेरी साँसे अजी जनाब है
----------------------------------------------
सारंग भणगे (२४ एप्रिल २०१२)

Saturday, April 21, 2012

योग नाही


पावसाने आज यावे योग नाही
ती भिजावी मी पहावे योग नाही

जाग येते राग येतो या दिसाचा
ती निजावी मी बघावे योग नाही

पाठमोरी पाहताना नित्य वाटे
ती हसावी मी भुलावे योग नाही.

रातराणी पाहताना रोज वाटे
ती फुलावी मी खुलावे योग नाही

मीच परवाना शमा ती का नसावी,
ती जळावी मी जळावे योग नाही

जीवनाच्या खिन्न वाटा चालताना
ती वळावी मी दिसावे योग नाही
------------------------------------
सारंग भणगे. (२० एप्रिल २०१२)

Saturday, April 14, 2012

रस्ता हा अंधारा आहे

रस्ता हा अंधारा आहे
डोळ्यामध्ये तारा आहे

पंखे सारे तुम्ही ठेवा
माझ्यासाठी वारा आहे.

नेत्यांच्या या सत्काराला
जोड्यांचा हा मारा आहे.

जिंकू किंवा मारू ऐसा
हल्ली झाला नारा आहे.

बोले तैसा चाले त्याची......
सोडा; तो बिच्चारा आहे.

खाशांसाठी सारी माफी
शेतीसाठी सारा आहे.
--------------------------
सारंग भणगे (१२ एप्रिल २०१२)

Friday, April 6, 2012

घे विसावा जरा

धावते नदी बये थांबशील का कधी?
घे विसावा जरा सांगतो महोदधी.

वाहणे तुझ्यापरी वात तोचि जाणतो,
तो हि तू हि जीवनास जीवनात आणतो.

काय रे हे जीवना तू अखंड वाहतो,
दु:ख ते जगायचे मरेपर्यंत साहतो.

घे विसावा जरा मी तुला म्हणू कसा!
चालण्याचाच तू घेतलास रे वसा.
 --------------------------------------
--
सारंग भणगे. (५ एप्रिल २०१२)

Wednesday, April 4, 2012

"कालिदासहि पडे अधुरा"

ती दिसते तेव्हा गगनामध्ये तारांगण जणू खुलते,
नक्षत्रांच्या बागेमध्ये फुल जणू कि फुलते.

गुलबकावली म्हणू तिला कि कस्तुरीचा परिमळ,
वाटे मजला अवतरले जणू ब्रह्मकमळ दुर्मिळ.

कांचनमृग हा जणू नाचतो वृन्दावनी गोजिरा,
गंधर्वांनी सूर कि दिधले निर्मळ त्या निर्झरा.

मयूर पिसारा फुलता खुलते रान खलु सुंदर,
भगीरथीच्या काठीचे ती कोरीव कि मंदिर.

हेमलता ती जणू स्वर्गाच्या दारी फुललेली,
दिव्य कविता चिंतामणीच्या हृदयी स्फुरलेली.

देवसुरा कि म्हणू अप्सरा अमृतधारा सुधामधुरा,
उपमा रूपक सारे थकले "कालिदासहि पडे अधुरा".

शब्दांच्या ती अतीत आहे जणू वैखरी पतित आहे,
तिच्या वियोगे परब्रह्महि व्याकूळ जीवन कंठीत आहे.
===========================================
सारंग भणगे (३ एप्रिल २०१२)

Sunday, April 1, 2012

आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का


गान कोकिळे माझ्या साठी गाशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!

रंगीत रंगीत पाण्याचे हे नको बुडबुडे,
स्वप्नामध्ये तुला भेटण्या जीव तडफडे,
त्या स्वप्नांना रंगवीत रंगवीत येशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!

तुझ्याचसाठी दार हे उघडे सताड आहे,
तुझ्याविना हि बाग मनाची उजाड आहे.
फूल सुगंधित बागेमधले होशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!

तुला पाहता डोळ्यांचे या फिटे पारणे,
भरून आले डोळे माझे तुझ्या कारणे.
डोळे भरून मला कधी तू बघशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!

तुझ्या स्मृतींच्या किती चांदण्या नभी कोरल्या,
चोरांपासून अमावस्या मी किती चोरल्या.
चोरून माझे काळीज सखये नेशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!
============================
सारंग भणगे. (१ एप्रिल २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...