गान कोकिळे माझ्या साठी गाशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!
रंगीत रंगीत पाण्याचे हे नको बुडबुडे,
स्वप्नामध्ये तुला भेटण्या जीव तडफडे,
त्या स्वप्नांना रंगवीत रंगवीत येशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!
तुझ्याचसाठी दार हे उघडे सताड आहे,
तुझ्याविना हि बाग मनाची उजाड आहे.
फूल सुगंधित बागेमधले होशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!
तुला पाहता डोळ्यांचे या फिटे पारणे,
भरून आले डोळे माझे तुझ्या कारणे.
डोळे भरून मला कधी तू बघशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!
तुझ्या स्मृतींच्या किती चांदण्या नभी कोरल्या,
चोरांपासून अमावस्या मी किती चोरल्या.
चोरून माझे काळीज सखये नेशील का!
आकाशी तू माझ्या मनीच्या उडशील का!
============================
सारंग भणगे. (१ एप्रिल २०१२)
No comments:
Post a Comment