Wednesday, April 4, 2012

"कालिदासहि पडे अधुरा"

ती दिसते तेव्हा गगनामध्ये तारांगण जणू खुलते,
नक्षत्रांच्या बागेमध्ये फुल जणू कि फुलते.

गुलबकावली म्हणू तिला कि कस्तुरीचा परिमळ,
वाटे मजला अवतरले जणू ब्रह्मकमळ दुर्मिळ.

कांचनमृग हा जणू नाचतो वृन्दावनी गोजिरा,
गंधर्वांनी सूर कि दिधले निर्मळ त्या निर्झरा.

मयूर पिसारा फुलता खुलते रान खलु सुंदर,
भगीरथीच्या काठीचे ती कोरीव कि मंदिर.

हेमलता ती जणू स्वर्गाच्या दारी फुललेली,
दिव्य कविता चिंतामणीच्या हृदयी स्फुरलेली.

देवसुरा कि म्हणू अप्सरा अमृतधारा सुधामधुरा,
उपमा रूपक सारे थकले "कालिदासहि पडे अधुरा".

शब्दांच्या ती अतीत आहे जणू वैखरी पतित आहे,
तिच्या वियोगे परब्रह्महि व्याकूळ जीवन कंठीत आहे.
===========================================
सारंग भणगे (३ एप्रिल २०१२)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...