Monday, July 23, 2012

चादर

झाकून चादरीने माझ्या कलेवराला,
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला.
 
टाकून चादरीला जेव्हा पुढे निघालो,
तोडून पिंजऱ्याला पक्षी नभी उडाला.
 
या चादरीस माझ्या ठिगळे जुनी पुराणी,
घेतो शिवून जखमा ज्या जाहल्या मनाला.
 
मावेचनात सारी या चादरीत माझ्या,
स्वप्ने हजार लाखो ती टांगली नभाला.
 
आयुष्य चादरीचे आहे परोपकारी,
झाकावायास जगते साऱ्या चराचराला.
---------------------------------------------
सारंग भणगे (२० जुलै २०१२)

Sunday, July 22, 2012

जादूची चादर

करतो आहे तुमच्या समोर
आता मी सादर
माझ्या जवळ आहे मुलांनो
एक जादूची चादर.
 
चादर हि पांघरलं तर
होऊन जाल गुडूप,
आणि मग जाता येईल
कुठेसुद्धा गुपचूप.
सारेच करू लागतील तुमचा
खूप खूप आदर,
अशी आहे माझ्या जवळ
एक जादूची चादर.
 
आणि बसलात चादरीवरती
मांडी ठोकून छान,
उडेल हवेत ती झाले कि मग
फिरायला मोकळे रान.
कुठल्या जायचे चौपाटीला
जुहू बांद्रा कि दादर,
अशी आहे माझ्या जवळ
एक जादूची चादर.
------------------------------
सारंग भणगे (२१ जुलै २०१२)

Saturday, July 21, 2012

विस्कटलेली चादर

मी उलगडलेली चादर तिने नेहेमी घडी करून ठेवली,
पण एकदा मात्र ती, चादरच विस्कटून निघून गेली.

माणूस मी विस्कटलेला तरी, कसातरी सावरलो,
पण तेव्हा पासून मात्र चादर आवरायलाहि बावरलो.

आता असतात माझ्या घरात त्या चादरी तशाच पडून,
सांगतात घड्या त्यांच्या, 'गेलय बराच काही घडून'.
 
चादरींचे ते बोळे मी तर आता साधे बघतही नाही,
खर सांगू मित्रांनो, मी तर आता साधे जगतही नाही.
---------------------------------------------------------
सारंग भणगे (२० जुलै २०१२)

Wednesday, July 18, 2012

बाहुपाशी घे मला

बाहुपाशी घे मला होऊनी तू शिंपला,
जोखडात प्रीतीच्या वृषभराज जुंपला,
तनु रणात या जणू शाल्व-शंख फुंकला,
ऋण तरुण रात्रीचे फेडता तू जिंकला.

करू गुन्हा रे सख्या पुन: पुन्हा सारखा,
मिलनात माझिया स्वत:स हो तू पारखा,
च-हाट चालू दे तुझे; चालू दे हा चरखा,
नकोत ऋतू मास नि नकोत वार तारखा.

देह हा जणू कळी, हरेक वेच पाकळी,
होऊनी भुजंग तू कवळून घे हि कर्दळी,
माझिया गळ्यातली अतूट हो तू साखळी,
श्वास होऊनी सख्या भरून टाक पोकळी.
------------------------------------------------
सारंग भणगे. (१८ जुलै २०१२)

Monday, July 16, 2012

रंग मोराचे फिकेसे वाटले

एवढे का तू मनाला लावले
सोड आता जाहले ते जाहले

पावलांचे माग मागे सोडले
आपसूकच संकटांचे फावले

ज्या सुखांचा घेत होतो शोध मी
"बोध" होता मीच त्यांना टाळले

एवढी झाली सुखाची ओल की
गंज माझ्या लेखणीला लागले

दु:ख होते अंतरी त्याच्या खुणा
काव्य माझ्या जीवनी फोफावले

पाहताना पंढरीचा सावळा
रंग मोराचे फिकेसे वाटले
-----------------------------------
सारंग भणगे (१६ जुलै २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...