Saturday, April 13, 2013

कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!

काळजाच्या कळीवर भावनांचं दंव दाटलंय का!
मनाचं वस्त्र आर्ततेन कधी फाटलंय का!
प्रेमाबिमाच दुकान मनात कधी थाटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
कधीतरी कुठेतरी मनात काही सललं असेल,
कधीतरी कुणीतरी मनात थोडं फुललं असेल,
काट्यांच्या जीवनावर गुलाबाचं फुल नटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
कधीतरी कोमेजून तुम्ही देखील रुसला असाल,
कधी चूक उमजून तुम्ही मनातच हसला असाल,
झुरण्यातही आनंद असतो, हे तुम्हाला पटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
वैतागून मनात साचलेलं कधी तुम्ही ओकलं असेल
उफाळून येणारं बरंच काही कधी तुम्ही रोखलं असेल
मनात तुमच्या भावनांचं तुफान कधी सुटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
 
आयुष्यात असलं बरच काही घडून गेलं असेल,
मनाच्या भिंतीवरच रंगाचं लिंपण उडून गेलं असेल,
मनाच्या क्षितिजावर कधी तांबडं फुटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
================================
सारंग भणगे. (जानेवारी २०१३)

Wednesday, April 10, 2013

मी जिंकायचा कधी प्रयत्नच केला नव्हता; त्यामुळे मी कधी हरलोच नाही!
 
जिंकण हारणं हा आहे फक्त एक पाठशिवणीचा खेळ;
जिंकल्याशिवाय हारू शकत नाही; नि हरल्याशिवाय जिंकू शकत नाही!
 
जिंकणारा हारणाऱ्याला एकच सांगून जातो, 'जिंकायचं असेल, तर…… हारायची तयारी ठेव;
आणि हरायचं नसेल तर ……… जिंकायची तयारी सुरु कर'!
 
खर तर जिंकलेला कधी जिंकलेला नसतोच,
फक्त हारलेला हरला असतो, म्हणून तो जिंकतो!
 
कुणी काय जिंकलं आणि कोण किती हारलं, याचे फालतू हिशेब ठेवणारा खेळायचा आनंद घ्यायचा विसरतो, आणि मग हारायाच्या भीतीनं खेळायलाही घाबरू लागतो!
 
जो जिंकण्या - हारण्याची तमा न बाळगता खेळतो, तो खेळतच राहतो, आणि अखेरीस जिंकतच रहतो. कारण जो खेळायचा राहतो, तो जिंकायचा काय; पण हारायचाही राहतो!
 
खर तर हारणं किती मस्त आहे!
न हारणाऱ्याला जिंकायचा आनंद कसा मिळेल!
 
जर जिंकण नित्याचाच झालं तर त्यातली मजाच निघून जाईल, आनंद हरवेल, आणि जर आनंदच हरवला तर जिंकले तरी काय असा प्रश्नच आहे!
 
ज्याला हारण माहित आहे तोच जिंकतो,
कारण जिंकलेला कधीतरी हरलेलाच असतो!
 
--
सारंग भणगे (2000)

Saturday, April 6, 2013

कृष्णाचा रवि उदयाला

तम भरल्या कातरवेळी
हे सांज व्योमहि व्याकूळ,
आरक्त दिशेला फुटले
घन-अंधाराचे ढेकूळ.
 
 
नभगर्भी काळोखाच्या
उन्मत्त मातल्या छाया,
क्षितिजाच्या डोळ्यामधुनी
पाझरते काजळमाया.
 
 
अव्यक्त असा अंधार
व्यापून उरे विश्वाला
भयक्लांत भूवर यावा
त्राता कुणी जन्माला
 
 
प्रगाढ मिठी अंधारी
संध्यामग्न दिशेला,
काळोख असतो नश्वर
शरणागत अटळ उषेला
 
 
हे भीषण तम दैत्यांनो
विस्फोट उषेचा झाला
अंतिम प्रहरी येतो
कृष्णाचा रवि उदयाला
================
सारंग भणगे
(मार्च २०१३)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...