काळजाच्या कळीवर भावनांचं दंव दाटलंय का!
मनाचं वस्त्र आर्ततेन कधी फाटलंय का!
प्रेमाबिमाच दुकान मनात कधी थाटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
कधीतरी कुठेतरी मनात काही सललं असेल,
कधीतरी कुणीतरी मनात थोडं फुललं असेल,
काट्यांच्या जीवनावर गुलाबाचं फुल नटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
कधीतरी कोमेजून तुम्ही देखील रुसला असाल,
कधी चूक उमजून तुम्ही मनातच हसला असाल,
झुरण्यातही आनंद असतो, हे तुम्हाला पटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
वैतागून मनात साचलेलं कधी तुम्ही ओकलं असेल
उफाळून येणारं बरंच काही कधी तुम्ही रोखलं असेल
मनात तुमच्या भावनांचं तुफान कधी सुटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
आयुष्यात असलं बरच काही घडून गेलं असेल,
मनाच्या भिंतीवरच रंगाचं लिंपण उडून गेलं असेल,
मनाच्या क्षितिजावर कधी तांबडं फुटलंय का!
मला सांगा, कधी तुम्हाला कवी व्हावं वाटलंय का!
================================
सारंग भणगे. (जानेवारी २०१३)
No comments:
Post a Comment