Saturday, April 6, 2013

कृष्णाचा रवि उदयाला

तम भरल्या कातरवेळी
हे सांज व्योमहि व्याकूळ,
आरक्त दिशेला फुटले
घन-अंधाराचे ढेकूळ.
 
 
नभगर्भी काळोखाच्या
उन्मत्त मातल्या छाया,
क्षितिजाच्या डोळ्यामधुनी
पाझरते काजळमाया.
 
 
अव्यक्त असा अंधार
व्यापून उरे विश्वाला
भयक्लांत भूवर यावा
त्राता कुणी जन्माला
 
 
प्रगाढ मिठी अंधारी
संध्यामग्न दिशेला,
काळोख असतो नश्वर
शरणागत अटळ उषेला
 
 
हे भीषण तम दैत्यांनो
विस्फोट उषेचा झाला
अंतिम प्रहरी येतो
कृष्णाचा रवि उदयाला
================
सारंग भणगे
(मार्च २०१३)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...