Wednesday, November 13, 2013

एकटी मी

काळजाचे काठ मोडू पाहते
दुःख ओसंडून गाली सांडते
 
ह्या जगाने बंध सारे तोडले
एकटी मी सावलीशी भांडते
 
वेदनांच्या पाहुण्यांचा राबता
आसवांच्या सोबतीने राहते
 
मज पुरावे वेदनांचे मागती
मी कुठे काही कुणाला मागते?
 
कोरडे आभाळ आहे फाटले
पापण्यांशी स्वप्न धागे जोडते
 
प्रेयसी की भोगदासी ना कळे
नागव्या दुःखासवे मी झोपते
 
लाभले ना सौख्य देवाजी मला
तेच दिधले तू मला जे झेपते
 
आप्त अस्तित्वासही नाकारती
जीवनाचे मीच थडगे बांधते
 
गाव माझ्या भावनांचा जाळला
वेस आयुष्या तुझी ओलांडते
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...