प्रिय राधा,
आज प्रथमच तुला प्रिय
लिहिण्याचं धाडस करतो आहे; पण खरंतर ते ‘प्रिय सागर किंवा प्रिय समीर’ हे
लिहिण्याइतकंच सहज आणि उत्स्फूर्त होतं, आणि जे सहज असतं ते निर्मळ असतं असं निदान
मला तरी वाटतं. त्यामुळे त्यात धाडस खरंतर नाहीये. ‘पण सहजपणे आपल्या हातून घडते
ती चूक निर्मळ आणि पवित्र असली, तरीही त्याची जाणीव हि त्रासदायकच असते.’ तेव्हा
ह्या धाडसाला मनावर घेऊन नकोस.
खरंतर यात धाडस कोणतच
नव्हतं. कारण जे प्रिय असतं त्याला ‘प्रिय’ म्हणण्यात काय चूक? पण आपल्याला जे
‘प्रिय’ असतं ते जगाला ‘अप्रिय’ असेल किंवा त्याहून अधिक म्हणजे आपल्याला जे
‘प्रिय’ वाटतं, ते वाटणं त्या ‘प्रियालाच’ अप्रिय वाटत असेल तर...... तर मात्र ते
निश्चितच चूक असलं पाहिजे, आणि मग ‘प्रिय’लाही ‘प्रिय’ म्हणायचं धाडस करावं लागतं!
असो! तुला वाटेल माझं घोडं
‘प्रिय’पाशीच अडलं कि काय! किंवा मी खरंतर तुला पत्र नव्हे तर ‘प्रिय’ ह्या
शब्दाची ‘चिकित्सात्मक मीमांसा’ करून, ‘प्रिय’ असण्याचे विषदीकरण व
‘प्रियाप्रियाचे संकलनात्मक विश्लेषण’ करतो आहे कि काय! पण तसं नाहीये. मी मला जे
‘प्रिय’ आहे..........
पुन्हा मी ‘प्रिय’ भोवतीच
रुंजी घालतोय. खरंतर हे पत्र मी माझ्या ‘भावनांची सतरंजी’ अंथरण्यासाठी लिहित
होतो. पण लिहिता लिहीतच कधीतरी किंवा कदाचित त्या आधीच माझ्या साऱ्या भावनाच शुष्क
होऊन गेल्या.
मी एकदा लिहिले होते कि
‘काही भावनांची फुलं शब्दांचा सुगंध न घेताच कोमेजतात.’ पण काही वेळेला मात्र ‘शब्दांच्या
लाटा उसळत असतात, पण भावनांच्या नावा त्यावर उतरतच नाहीत’. अशा वेळच्या लिहिण्याला
अर्थ उरत नाही. त्यात नकळतच शुष्कपणा येतो.
आज काहीशी स्थिती तशीच आहे.
खरंतर तुला काही लिहायचं म्हणजे शब्द सुचण्यापेक्षा ते हृदयातून उमटायला हवेत.
बुद्धीला विचार करायला संधीच मिळाली नाही पाहिजे. पण आज तसं नाहीये. माझ्या
हृदयातील भावनांचा सागर ओहोटीला गेलाय कि तुझ्याबद्दलच्या प्रेमाचा झराच आटून
गेलाय? कदाचित तसच असावं! अग पाऊसच पडला नाही तर तो झरा तरी कसा टिकेल!
चातकासारखी पावसाची वाट पाहताना;
चकोरासारखा चंद्रामृतकणांसाठी झटपटताना मला जर ‘माझा पाऊस’ किंवा ‘माझे अमृतकण’
मिळालेच नाहीत तर मी जगणार तरी कसे! त्यातच जर नकाराचं विष दिलं तर मी मरणं
स्वाभाविकच आहे. विष पचवायला मी नीलकंठ नाही; मी व्याधाच्या विषारी बाणानं घायाळ
होऊन मरणारा ‘सारंग’; अर्थात ‘श्रीकृष्ण’ आहे. आणि खरी शोकांतिका हीच आहे कि
श्रीकृष्ण असूनही मला राधेची प्रीत...............!
तसे तर मला हे नात्यांचे
बंध नकोच होते. खरेच! हि माझी निराशा नाही, किंवा तडजोडही नाही. कुठेतरी ते पटलेलं
होतं. म्हणूनच मी एकदा लिहिलं होतं,
‘प्रेम राखीच्या धाग्यात नसतं, प्रेम कुंकवाच्या टिळ्यात नसतं’
प्रेम अलौकिक असतं, त्याला
असल्या लौकिक, भौतिक आणि प्रतीकात्मक गोष्टीत स्वारस्य नसतं.
‘प्रेम आत्म्याचं मिलन असतं, खुल्या हृद्याच दालन असतं’
असंही कधीतरी लिहिलं होत.
मला ते पटलही होत. त्यामुळेच भौतिक सुखांच्या व आकांक्षांच्या बर्फाखालून हि
अभौतिक, अलौकिक, अपार्थिव सुखाच्या अनुभूतीची नदी खळाखळा वाहतच होती. त्यामुळे एक
डोळा रडत असता, दुसरा मात्र हसत होता. कोरड्या, कडक उन्हात पावलं भाजत असताना, डोक्यावर
मात्र ज्ञानाचं छत्र अडग होतं. म्हणूनच मी माझ्या मनातले आवेग आणि उर्मी, त्या
उसळत्या भावनांची वाफ शक्तीन व संयमानं निर्धाराच्या व ज्ञानमय निश्चलतेच्या सायीखाली
कोंडू शकलो. अवखळपणे धावू पाहणाऱ्या माझ्या भावनांच्या अजाण, अबोध, असमंजस, अवखळ,
नाठाळ वासराला ज्ञानाच्या दोरान संयमाच्या दावणीला जखडू शकलो.
त्यातूनच मला जाण आली व मला
वाटू लागलं; पटू लागलं कि,
‘प्रत्येक नात्याची परिणतीच
आपल्याला का अपेक्षित असते? एका सुंदर हळुवार पातळीवर आपण समांतर राहिलो तर बिघडले
कुठे?
ज्याचं त्याचं प्रत्येकी एक
जग असेल. त्या त्या जगातील एकमेकांच्या प्रतिमा वास्तवाशी मेळ साधणाऱ्या नसतीलही.
पण जे काही होतं ते एका उच्च कलात्मक पातळीवर असेल. अनुभवातला अस्सलपणा
वास्तवापेक्षाही प्रासादिक असेल.
अशा अशरीर संबंधांना
नात्यात बद्ध करण्याची इच्छा का व्हावी?’ (संदर्भ ‘हृदयस्पर्शी’ – सुहास शिरवळकर)
ह्या विचारांनी प्रेरित
झालेली माझ्या आत्म्याची कवाडं खाडकन उघडली. ज्याला प्रेमाचं नाव देत होतो, ती
माझ्या मनापेक्षा जर माझ्या आत्म्याची अभिव्यक्ती असेल तर माझ्या नजरेत सारं विश्व
हे समान व भेदाहीन असेल. ज्या अंतिम प्रेमाची सारेच प्रतीक्षा करीत असतात, त्याची
अनुभूती प्रत्यक्ष होऊ शकली. काही क्षण का होईना, पण मनाला आत्म्याचा साक्षात्कार
होऊन एका नवीन भावविश्व सृष्टीचा अविष्कार माझ्या मानस स्पर्शून गेला. त्याचे आभार
कोणास मानावे हेच मला कळेना. पण मग त्याची सुरुवात जिथे झाली ते चैतन्याचे मूलगर्भ
तू होतीस, म्हणून तुला हे आभार!
आता नात्यापलीकडच्या
विश्वात आत्म्याचा प्रवेश करणे हेच जीवनाचे ध्येय राहिले. त्यासाठी अखंड, अथक
प्रयत्न करणे हेच जीवनाचे खरे सार्थक! आता त्यासाठी ‘बाहेरच्या’ स्फुर्तींचा कागदी
आधार नको. अंत:स्फुर्तींना बाह्यात्कारी गोष्टींचा आधार नको असतो. कारण,
‘आत ओसंडणाऱ्या प्रकाशाच्या लाटा, बाहेरच्या काळोखाने अंधारात
नाहीत.’
शब्दांची हि कृत्रिम कारंजी
इथे आता आपोआपच अस्तंगत झाली आहेत..........
सारंग.