Tuesday, January 21, 2014

राधा - २


प्रिय राधा,

 

कशी आहेस? कित्ती दिवसात तुझे पत्रच आले नाही! पाठवलेच नाहीस कि आपल्या post खात्याच्या कार्यक्षम कारभारामुळे मला मिळाले नाही! अर्थात तुला हे माझे पत्र मिळाले आणि त्याचे तू उत्तर लिहिलेस आणि ते मला पोहोचले तरच ते कळेल, नाही का.

 

मी तसा मजेत आहे. खरेतर ‘तसा’ हे चुकूनच लिहून गेलो. मी तसे लिहावयाला नको होते. मला कल्पना आहे कि तुला त्यातून काय वाटणार आहे याची. पण खरोखर सहज लिहिता लिहिता मी तसे लिहून गेलो गं! आत्ता माझ्याकडे पेनाचे खोडरबर देखील नाही, आणि ज्यावेळी हे पत्र लिहितो आहे त्यावेळी कुठली दुकानं उघडी असणार! तुला तर कल्पना आहेच माझी पत्र लिहायची वेळ!

 

नाही, ती वेळ बदलली नाही. बदलेल असेही वाटत नाही. आठवतंय, मी दिवसा तुला एक पत्र लिहिलं होतं, आणि मग त्याचं उत्तर येण्याऐवजी तूच घरी आली होतीस भेटायला इतक्या लांबून, मी आजारी वगैरे आहे का असे पाहायला. तुझं येणं आवडतंच गं, पण मी आजारी आहे का पाहायला आलीस, आणि मी आजारी नाही म्हटले तेव्हा कपभर चहाही न घेता निघून गेलीस............ते आवडलं नाही. म्हणूनच, ज्यावेळी कदाचित आकाशात चंद्रालाही झोप लागत असेल अशाच वेळी मी तुला पत्र लिहू शकतो! तसेही त्या चंद्राशिवाय, आकाशातल्या ताऱ्यांशिवाय, कळवळणाऱ्या काही जनावरांपेक्षा आणि माझ्या मनात तुझ्या विषयी उठलेल्या वादळांशिवाय आणखी ह्यावेळी कोण कुठे जागे असते!

 

sorry, हे देखील लिहून गेलोच! तुला सांगू, काही वेळा शब्द साथच देत नाहीत, आणि काही वेळा जणू पेनाला गळती लागल्यासारखे निबमधून ते झिरपत जातात जणू. निसरड्यावरून आपला पाय सटकतो ना तसा ह्या शब्दांचादेखील पाय घसरतो कधी कधी असेच वाटते.

 

असो! मी छान मजेत आहे. तू इतकी ओरडयाचीस म्हणून ऑफिसमध्ये वेळेत जायचा, मन लावून काम करायचा खूप प्रयत्न केला, करत असतो. पण तुला माहिती आहे ना, औषधाचा डोस एकदा दोनदा घेऊन चालत नाही. काही काही रोग असे असतात कि त्यांना वारंवार आणि सातत्याने औषध घ्यावेच लागते. पण काही काही दूरच्या गावांमध्ये कुठे दवाखाने आणि औषधाची दुकानं असतात! तिथले रोगी नाहीत का कधीतरीच औषध घेतात कुणी शहरा-बिहराकडून घेऊन आले तर, आणि मग जेव्हा औषध मिळत नाही तेव्हा खोकत राहतात; कण्हत राहतात! आपल्या देशात गरीबीच फार आहे बघ.

 

नवीन काय वाचते आहेस? म्हणजे तुला मिळत का वाचायला काही? आणि नाही मिळालं तरी काही बिघडत नाही गं. नुसती पुस्तकं वाचून कुणी मोठं होत का? पुस्तकी किडे होतो आपण. मी देखील हल्ली अजिबात पुस्तकं वाचत नाही............पहाटेपर्यंत! हं! झोपेचं माझं पहिल्यापासून तसं वाकडंच, तुला तर माहितीच आहे. मग त्याची कशाला काळजी करायची उगाच. अग काही काही माणसांना झोप कमी चालते; पुरते. मग रात्री फक्त रातकिड्यांच अद्भुत संगीत ऐकत बसण्यापेक्षा बसतो आपला काहीतरी पुस्तकाची पान उघडून, त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही.

 

काळजी करायचीच झाली तर ह्या कडाक्याच्या थंडीत डांबराच्या निगरगट्ट रस्त्याच्या कडेला कुत्र्यासारख झोपणाऱ्या त्या भिकाऱ्यांची करावी किंवा धरणामध्ये जमीन बुडालेल्या; आतड्यात फक्त पीळच उरलेल्या; सरकार दरबारी हक्काचा मोबदला मागण्यासाठी कित्येक कोस चालत तालुक्याच्या गावाला आलेल्या शेतकऱ्याची करावी, नाहीतर ....................

 

म्हणूनच मी तुला पत्र लिहित नाही! लिहायला घेतलं कि काहीतरी भलत-सलतच लिहितो जातो. जिथे सलतंय तिथे असंच होत कि काय कोण जाणे! राधे, सोलवाटलेल्यानं विव्हाळायचही नाही का गं!

 

असो, माझ्या जखमांच रक्त हळूहळू माझ्या शाईत उतरायला लागलं आता बहुदा. ते वाचून तुझ्या डोळ्यात अश्रुंच रक्त तरारेल. म्हणून इथेच थांबतो आता!...............पुन्हा उद्या लिहीनच ना तुला पत्र, ह्या रात्रीला तांबडं ढुशी द्यायला सुरुवात करायच्या वेळी!

 

आणि हो, सर्वात महत्वाचं राहिलंच कि! अग बाई, लवकरात लवकर जरा तुझा पत्ता कळव कि!

 

सारंग

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...