पांगली पुढची पिढी अन्
लांबली अवघड प्रतीक्षा
अनुभवांती लाभली मज
निबरतेची दिव्य दीक्षा
वेदनांच्या खोल डोही
जाणिवांचा अस्त झाला
फक्त उरली बेफिकीरी
आणि काही काळ उरला
वाकुल्या दावीत आहे
सांध्यरेषा जीवघेणी
आप्त माझे गात बसती
व्यर्थ मृत्यूची विराणी
मात्र मी अस्वस्थ नाही
एकटा असलो तरीही
बाहयरूपी शांत आहे
शांत आहे अंतरीही
मी तटस्था सारखा अन्
भाव नुरले, शब्द नुरले
काय झाले ते कळेना
जास्त जगणे पाप ठरले!
- निलेश पंडित
४ जानेवारी २०१४
===========================================
निलेशदा,
खरोखर एका अप्रतिम कवितेचा अनुभव तुम्ही दिलात. मी माझ्या कुवतीप्रमाणे मला त्यात समजलेले; भावलेले जे काही आहे त्यावर मनमोकळे विचार मांडतो.
एका वेगळ्या गंभीर विषयाचा काव्यात्मक अविष्कार सादर करत असताना तुम्ही त्या स्वत: न अनुभवलेल्या परिस्थितीतील भावस्थितीचे जे अफलातून वर्णन केले आहे त्याने त्या परिस्थितीविषयी तिटकारा, भीती किंवा सहानुभूती न वाटता मला एक वेगळेच आकर्षण वाटून गेले. कदाचित माझे हे म्हणणे थोडेसे विचित्र वाटू शकते, परंतु त्या परिस्थितीतील भावावस्थेच तुम्ही केलेलं समर्थ शब्दचित्रण माझ्या कवी मनाला मोहित करून जात. कुठलीही उत्कट भावावस्था कवीसाठी आकर्षण ठरू शकते हे तुम्ही निश्चित समजू शकाल.
तुमच्या काव्यप्रतिभेतून तुम्ही त्या स्थितीतील विकलता किंवा विषण्णता वर्णन न करता त्या परिस्थितील पुरुष किंवा कदाचित स्त्रीदेखील अशा एकाकी अस्ताकडे झुकलेल्या अस्वस्थ करणाऱ्या स्थितीमध्ये देखील स्थिरतेकडे जातो; निश्चल होतो, पण तरीही ती स्थिरता; निश्चलता हि निबरपणा सारखी असते, जाणीवच बधीर करणारी असते हा केवढा मोठा विषाद तुम्ही इथे विषद केला आहे!
आधीच अवघड असलेली प्रतीक्षा लांबणे - अगदी साधे वाटणारे हे शब्द नीट विचार करता एक विदारक अनुभूती निर्माण करतात! एखाद्या खोल अंतहीन अंधकारमय गुहेतून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो. आतमधून गुदमरल्यासारखा अनुभव येतो! प्रतीक्षा मुळातच कंटाळवाणी असते; त्यात अनिश्चित प्रतीक्षा हि तर अधिकच भयावह; त्यात पुढे अवघड परिस्थितीतील अनिश्चित गोष्टीची प्रतीक्षा आणखी कठीण आणि ती हि अपेक्षांच्या पलीकडे लांबणे हे खरोखरच अत्यंत विमनस्क करणारे आहे. मोजक्या शब्दात इतके सारे सांगून जाणे हे महत्कठीण काम तुम्ही इथे साधले आहे.
वर मी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ काळ जेव्हा आपण एखाद्या प्रतिकूल परिस्थितीतून जात असतो, तेव्हा त्या परिस्थितीतून स्वाभाविकपणे निर्माण होणाऱ्या संवेदना बोथट होत जातात. हे कदाचित स्वाभाविक मानसशास्त्र आहे. अशीच हि बोथटता; निबरता अनुभवांती लाभते हेच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हि निबरता का? कारण ते ती निबरता म्हणजे संवेदनांशी केलेली फार मोठी तडजोड आहे, ती अवस्था हि काही स्थितप्रज्ञासारखी स्थिर बुद्धीची अवस्था नाही, तर भावनाहीन अशी अवस्था आहे. एका तऱ्हेने ह्या स्थितीमध्ये देखील एकप्रकारचे दु:ख ठसठसून भरलेले असतेच, परंतु निबरतेच्या कृत्रिम आवरणाखाली ते दडपून टाकलेले असते. 'दिव्य दीक्षा' यातील 'दिव्य' कदाचित अस्थायी वाटू शकतो. परंतु मला त्या दिव्य मध्ये एकप्रकारचा हतबल उपहास जाणवला. अशा निबरतेला दिव्य, अर्थात काहीतरी विलक्षण असे म्हणायचे नसून, त्या दिव्य मधून कदाचित त्या निबरतेवर अप्रत्यक्ष टीकाच करायची आहे. किंवा 'दिव्य करणे' म्हणजे एखाद्या अतिशय कठीण परिस्थितीतून काहीतरी प्राप्त करणे, कठीण परिस्थितून वाट काढत पुढे जाणे असे काही सूचित करायचे आहे असेही वाटते.
वरील निबरतेची भावना पुढील कडव्यात अधिक विस्तृत करून सांगितली आहे. जाणीव नष्ट होणे हि एकप्रकारे विमनस्क भावावस्थाच आहे. त्यातून एक प्रकारची बेफिकिरी निर्माण होते, बेदरकारपणा निर्माण होतो हि वास्तविक मानसिकता समजून घेऊन ती शब्दात ओतण्याचे कठीण काम तुमच्या ह्या कवितेत अतिशय सहजतेने केलेले दिसते.
'आणि काही काळ उरला' ह्या ओळीत ती अवस्था हि निबरता आहे असे अधोरेखित होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे सारे दु:ख, विषाद, वैफल्य आणि विकलता हि त्या निबरतेच्या आवरणाखाली दडपून टाकलेली असते; गाडून टाकलेली असते. जणू काही अतिशय थंडीमध्ये नदी गोठून जाते, परंतु त्या गोठलेल्या बर्फाच्या आवरणाखाली पाणी वहातच असते. अजूनही काही काळ उरला आहे ह्यातून न संपणाऱ्या त्या प्रतीक्षेची भावनाच गडद होते.
सांध्यरेषा - सांध्य म्हटले जाते कि नाही मला ठाऊक नाही, माझ्या आधी कधी वाचनात आले नाही.
पण ह्या कडव्यात देखील किती काही प्रत्येक शब्दातून सांगितले आहे! संध्यारेषेच्या जवळ जीवन चालले आहे हि भावना जीवघेणी आहेच. त्या रेषेचे वाकुल्या दाखवणे ह्यातून कुठेतरी त्या संध्यारेषेजवळ जाण्यातील अपरिहार्यता प्रकट होते. तसेच मृत्यूची विराणी हे देखील अद्भुत लिहिले आहे. विराणी हि विरहाच्या खोल दु:खात बुडालेली कविता असते, मृत्यूची विराणी यातून कदाचित ते आप्त मृत्यूला आमंत्रणच देत आहेत असे मला वाटले. म्हणजे 'ह्या म्हाताऱ्याला मृत्यू येवो' असे प्रत्यक्ष न सांगता मृत्यूची विराणी गाणाऱ्या आप्तांच्या कल्पनेतून ते कसे त्याच्या मृत्यूचीच वाट पाहत असतात हे मांडले आहे. हि कल्पना केवळ विलक्षण वाटते. एखादी भावना, स्थिती अधिक उत्कट करताना तुमच्यासारखा प्रगल्भ विचारवंत कवी असाच विलक्षण दाखला देतो.
एवढ्या साऱ्या भावभावनांच्या आरोह-अवरोहात; चक्रीवादळात सापडलेला, जाणीव नष्ट होऊन निबर झालेला एकाकी हतबल वृद्ध अखेरीस अंतर्बाह्य शांततेची प्रचीती घेतो, एका तटस्थतेचा अनुभव घेतो, परंतु मला तरीही वाटते कि 'जास्त जगणे पाप ठरले' हा हेलावून सोडणारा प्रश्न तो कुठेतरी अजूनही आतून शांत नाही; किंवा पूर्ण शांत नाही असेच दर्शवतो. कुणालातरी नाकी इतके जगणे आणि याची आपल्याला जाणीव असणे हि मनाला खंगवत नेणारी भावना आहे.
जीवनांताला निर्माण झालेले वैषम्य आपल्या उपक्रमात दिलेल्या ओळीतून इतक्या समर्थपणे मांडण्याची शब्दकिमया तुम्ही साधली आहेत त्याने ह्या उपक्रमाचे सार्थक झाले असेच मी म्हणेन!
अनेक धन्यवाद!
सारंग भणगे. (५ जानेवारी २०१४)
No comments:
Post a Comment