Sunday, November 23, 2014

राघव समयी


नभपटलावर नयनमनोहर I
बहुविध सुंदर I रंग उमलले II

गिरिवर कंदर घन-वन त्यावर I
नभचर सुस्वर I मंद किलबिले II

रविकर वैभव अनुभवते भव 
कनक महोत्सव अंबर खुलले ll

सुमन सुशोभित पुलकित गंधित l
तुळस विराजित अंगण फुलले ll

दशरथ नंदन नित नित वंदन l
स्मरण चिरंतन राघव उठले ll
====================
सारंग भणगे (१८ नोव्हेंबर २०१४)

Wednesday, November 19, 2014

रसग्रहण

‘First impression is last impression’ असे माणसांच्या बाबत म्हटले जाते, पण मला वाटते ते कवितांच्या बाबतही तितकेच लागू आहे. एखादी कविता पहिल्या पहिल्या वाचावी वाटते. काही वेळा त्या कवितेचा form/ रचना हे त्याचे कारण असू शकते किंवा काही वेळा कवितेच्या सुरुवातीच्या ओळीच सुंदर असतात कि आपण ती कविता पूर्ण वाचतोच. सहसा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण ह्या कवितेच्या निमित्ताने माझ्या मनात हा विचार आला आणि असे वाटून गेले कि जसे एखाद्या चित्रपटाची सुरुवातच नाट्यमय किंवा काहीतरी आकर्षित करणारी असेल तर पुढे पाहत राहण्याची उत्सुकता राहते तद्वतच कवितेचे पण असावे. मला आनंद आहे ह्या कवितेवर विचार करण्याच्या निमित्ताने हे तत्व माझ्या समोर आले.

मागे एकदा प्राजक्ता (प्राजु) शी गप्पा मारताना ती म्हणाली कि जर कविता समाजत नसेल तर त्याचा उपयोग नाही, ती कविताच नाही. त्या गप्पांमध्ये मी हा मुद्दा अमान्य केला, मला तो चुकीचा वाटला. पण माझ्या मते जी कविता आपण सर्वांसमोर मांडतो (एका अर्थाने प्रकाशित करतो) ती कविता फार दुर्बोध, संदिग्ध असू नये. असा विचार माझ्या मनात आला कि कविता ह्या दुर्बोध किंवा संदिग्ध असल्याने सामान्य माणूस कविते पासून दूर जातो आणि मग कवीपासून देखील दूर जातो. ह्याचा अर्थ दुर्बोध किंवा संदिग्ध कविता लिहूच नये असे नाही, किंवा त्या प्रकाशित करू नयेत, सादर करू नयेत असे नाही. परंतु तशा कविता मांडताना तितकाच ताकदीचा वाचक, रसिक समोर असला पाहिजे हे ध्यानात घेतले पाहिजे.

हे लिहिण्याचे कारण कि हि कविता मला दुर्बोध वाटली. मी सुमारे ३ वेळा हि कविता वाचली आणि तरीही मला ती फारशी समजली नाही. मी निलेशदा, श्रीधर काका ह्यांचे प्रतिसाद देखील वाचले, पण तरीही मला फार अर्थबोध झाला नाही.

आता असा अर्थबोध न होणे ह्याचा दोष कवितेला लागतो कि वाचकाच्या सामान्य समजशक्तीला हे सापेक्ष आहे. हे लिहिण्याचे प्रयोजन एवढेच कि केवळ कविता दुर्बोध वाटली अशा प्रतिक्रियेचा अर्थ कवीने कविता चांगली नाही असा घेऊ नये.

तर जी कविता मला ठीक ठीक समजलीच नाही त्यावर अधिक भाष्य करणे कठीण. परंतु एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे मला इथे निश्चित लिहावी वाटते कि मला हा छंदमुक्त form नाही आवडला. मी ह्याला मुक्तछंद म्हणत नाहीये, तर छंदमुक्त म्हणतोय कारण कदाचित मुक्तछंदामध्ये काही प्रमाणात तरी छंद असावा. त्यामुळे मुक्तछंद हा काव्य जगतात मान्य झाला. परंतु मुक्तछंद मान्य झाल्यावर पद्य सदृश काहीही लिहिले तरी चालते असा समज कवी मंडळींनी करून घेतला आणि (हे म्हणणे माझ्या पातळीला लहान तोंडी मोठा घास असे होईल) मराठी कविता अधोगतीच्या मार्गाला लागली. मी विचारांती ह्या मताचा झालो आहे कि सकस काव्यनिर्मितीसाठी वृत्त, छंद जाती ह्यांना धरूनच काव्य निर्मिती झाली पाहिजे.

वर सर्व लिहिले असले तरीही मी असे मानतो कि आशय हा सर्वात महत्वाचा काव्यगुण मानला पाहिजे. ज्या वृत्तबद्ध कवितेत आशय नाही ती कविता दुकानात निर्जीव पुतळ्यावर चढवलेल्या पोषाखाप्रमाणे असते असे मला वाटते. आशय हा कवितेचा आत्मा आहे, हे माझे निश्चित मत आहे.

ह्या कवितेत आशय निश्चित असावा. असावा म्हणण्याचे कारण खरेतर एवढेच कि तो बऱ्याच मंडळींना सापडला, मला तो नाही सापडला. शिवाय कवयित्रीने मांडलेल्या विचारांमध्ये देखील ह्या कवितेमागची भूमिका जाणवते आणि त्यामुळे हि कविता एका विशिष्ट अन्वयाने लिहिली आहे हे मान्य करणे क्रमप्राप्त आहे.

परंतु तो आशय सुस्पष्ट नाही असे मात्र मला ठामपणे म्हणावे वाटते. प्रतीकात्मक कवितेमध्ये देखील कुठेतरी मूळ आशयाकडे अंगुलीनिर्देश असावा असे मला वाटते. तो मला इथे तितकासा स्पष्ट जाणवला नाही.

खरेतर एखाद्या कवितेतून अनेक अर्थ निघणे हे उत्तम काव्याचे लक्षण मानले जाते, जे बरोबरच आहे. परंतु अनेक अर्थ निघतात असे म्हणत असताना ते ते अर्थ हे वाचकाला जाणवले पाहिजेत हे हि निश्चित. इथे मला तसे खुपसे जाणवलेच नाही.

वरील सर्व लिहिल्यानंतर मी पुन्हा एकदा कविता वाचली, सर्व चर्चा; सर्वांची मते पुन्हा एकदा वाचली. माझ्या बाबतीत बरेचदा असे झाले आहे कि मी प्रथम कविता वाचतो तेव्हा ती आवडत नाही आणि नंतर त्यावर लिहायला लागले कि अनेक कंगोरे स्पष्ट होतात आणि मग अर्थबोध होतो आणि कविता जाम आवडून जाते. मागे एकदा एका उपक्रमात एक कविता मला रसग्रहण करायची होती आणि मी ती वाचली, अजिबात आवडली नाही. पण काहीतरी लिहिणे भाग होते, म्हणून मी त्यावर टीकात्मक लिहायला लागलो. लिहिता लिहिता एक एक घडी उलगडू लागली आणि ती कविता मला पराकोटीची आवडून गेली, आणि त्यावर मी पानेच्या पणे लिहून काढली (ओर्कुट बंद पडले आणि हे सारे कालौघात वाहून गेले आता).

तोच प्रयत्न आणि प्रयोग मी इथे परत सर्व कविता आणि सर्व चर्चा वाचून केला, परंतु काही केल्या हि कविता आतमध्ये शिरत नाही.

ह्याचे कारण काहीही असू शकते आणि त्याचा दोष मी माझ्या कडेच घेतो कारण निलेशदांसारखा प्रगल्भ कवी-वाचक जेव्हा ह्या कवितेवर इतक्या विश्वासाने बोलतो तेव्हा हा निश्चितपणे माझ्यातील दोष आहे ह्या बाबत मला शंका राहत नाही.


हे सर्व लिहित वाचत असताना खूप काही शिकायला मिळाले हा आनंद मात्र आहे, जरी कविता वाचून मला तितकासा आनंद मिळाला नाही!

Monday, November 17, 2014

जबलपूर मराठी कवी संमेलन वृत्तांत


जबलपूरच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या हर्षे सभागृहामध्ये ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ ह्या संस्थेतर्फे ‘मराठी कविता समूहा’च्या संचालकांचा जबलपूर मधील मराठी रसिकांच्या समोर ‘मराठी कवितांचा’ कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मराठी कविता समूहाच्या इतिहासात प्रथमच केवळ संचालकांचा असा कार्यक्रम साकार झाला.
कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव श्री. अनिल राजूरकर ह्यांची होती. में महिन्यामध्ये इंदूर येथे मराठी कविता समूहाचा स्नेह मेळावा झाला होता. त्याची माहिती राजूरकर सरांपर्यंत पोहोचली आणि जबलपूर येथील ह्या कार्यक्रमाचे बीज त्यांच्या मनात रुजले.
जबलपूर सारख्या हिंदी भाषिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक मंडळी वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत. जरी आता जबलपूर मध्ये मराठी भाषेमध्ये शिक्षण बंद झाले असले तरी ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’ ह्या संस्थेच्या माध्यमातून काही मोजक्या मराठी मंडळींनी अजूनही मराठीचा दीप तेवत ठेवला आहे. संस्थेतर्फे विविध मराठी कार्यक्रमांचे आयोजन होत असते आणि त्यामध्येच हा संचालकांच्या कवितांच्या सादरीकरणाचा ‘मराठी कविता मेळावा’ आयोजित करण्यात आला.
संध्याकाळी सुमारे सव्वा सहाच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सौ. सुमेधा पोळ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन ह्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कवींना मंचावर आमंत्रित करण्यात आले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व कवी आपापल्या ठरलेल्या क्रमानुसार मंचावर स्थानापन्न झाले, आणि ध्वनिक्षेपक श्रीधर काकांच्या हातात देण्यात आला.
नोव्हेंबरच्या महिन्यातील सुरम्य संध्याकाळ, बाहेर सुटलेला मंद गारवा, समोर बसलेला रसिक प्रेक्षक आणि मराठी कविता समूहाच्या काव्यशिलेदारांच्या हातात आलेला ध्वनिक्षेपक, म्हणजे कवितांच्या कार्यक्रमाला संपूर्णत: पूरक असे हे वातावरण!
श्रीधर काकांनी त्यांच्या शांत, धीम्या शैलीत सुस्पष्ट शब्दोच्चारांनी, प्रसन्न मुद्रेने रसिकांबरोबरचा आपला संवाद सुरू केला. महाराष्ट्राच्या सीमेपार हिंदी भाषिक प्रदेशात मराठी कविता सादर करायला बोलावणाऱ्या रसिक जनांचे सर्वप्रथम आभार मानत, श्रीधर काकांनी कार्यक्रमाचे प्रयोजन; संकल्पना आणि स्वरूप विषद केले. कार्यक्रम दोन चक्रांमध्ये होणार होता. मंचावरील सात कवी (श्रीधर जहागीरदार, उमेश वैद्य, रमेश ठोंबरे, अलकनंदा साने, सारंग भणगे, तुषार जोशी आणि विनायक उजळंबे) प्रत्येक चक्रामध्ये आपल्या दोन कविता सादर करणार, मध्ये कवींची ओळख आणि कवितेविषयीचे अल्प निवेदन असे कार्यक्रमाचे नेटके आणि आटोपते स्वरूप होते.
कार्यक्रमाचा ‘श्रीगणेशा’ ‘सात्विक बंडखोरी’ कवितेत मुरलेल्या ‘विनायक’च्या कवितेने झाला. प्रेम कवितांचे पेटंट मिळू शकेल अशी त्याची ‘पत्रकविता’ त्याने सर्वप्रथम सादर केली आणि प्रेक्षागृह जिंकून घेतलं. खळी, मिठी, मोगरा, गजरा असे त्याचे खास शब्दमोती पेरून त्याने कवितेची पहिली माळ रसिकांच्या गळ्यात घातली आणि तो त्यांच्या गळ्यातला ताईतच झाला. ह्या कवितेच्या तरल अनुभवातून रसिक बाहेर येतायत न येतायत तोच त्यांच्या समोर विनायकने त्याचा खास ठेवणीतला कॉफीचा काव्य-कपच ठेवला. विनायकची कॉफीशॉप कविता म्हणजे हमखास टाळ्या, हशा, खुसखुस आणि कुजबुजहि.
विनायकाच्या कवितानंतर कवितेची गाडी सरकली एका हरहुन्नरी कवीच्या स्टेशनवर. स्टेशनाचे नाव तुषार जोशी, नागपूर. तुषारने त्याच्या प्रेमाचे रंग खुलवणाऱ्या दोन कविता सादर केल्या. ‘पाहिले तुला हळूच’ मधून प्रेयसीचा रुपमोगरा दरवळून आला तर पुढच्या कवितेत तुषारने कवितेची ‘वसंत’ पंचमी साजरी केली. त्याच्या ‘वसंत’ कवितेतून धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनातही आपल्या जीवनसंगिनी बरोबर प्रेमाचे हळुवार क्षण कसे घालवू शकतो, ह्या कृत्रिम जीवनात कविता कशी जगू शकतो ह्याचा प्रत्यय आणला.
प्रेमाचा रंग मैफिलीत गहिरा होत जात होता आणि पुढची प्रेमसूक्ते सादर करण्याची पाळी होती सारंगची. प्रेमाचा गुलाबी रंग आपल्या ‘आठवते का काही’ ह्या कवितेतून सारंगने तरन्नुममध्ये गाऊन पेश केला, तर जन्मभराचा आपला सांगाती सोडून गेल्यानंतर जीवनातल्या संध्याकाळी दाटणारी खिन्न छटा ‘झाली संध्याकाळ’ ह्या कवितेतून सादर केल्यानंतर रसिकांच्या पापण्यांवर टीचभर पाणी खचितच तरळले असेल.
प्रेमाच्या सुटलेल्या भरधाव गाडीला थोडा विराम देत, आपल्या प्रगल्भ लेखनशैलीतून अलकनंदा काकूंनी वैचारिक स्त्रीवादी कवितांची पेशकश केली. पहिल्या कवितेतून स्त्री मधल्या सहनशक्ती आणि आव्हाने पेलण्याच्या; झेलण्याच्या स्वयंभू स्वभावाधर्माचे दर्शन अलकनंदा काकूंनी घडवले. खेळणं मागणाऱ्या मुलीच्या हातावर वास्तवाचे ज्वलंत निखारे दिल्यानंतर ती मुलगी त्यांच्याशी सहजपणे खेळते हे स्त्रीजीवनाचे एक वास्तववादी जीवनदर्शन मनाला अंतर्मुख करून गेले. एकीकडे स्त्रीच्या ह्या शाश्वत जीवनसत्याविषयी बोलल्यानंतर काकूंनी आजच्या स्त्रीच्या, विशेषत: तरूण मुलींच्या आजच्या युगातील व्यवहारावर; आचरणावर सौम्य टिप्पणी करत निरागस मुलींमधील हरवलेल्या अल्लडपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी त्यांची ‘मुली गेल्या कुठे’ हि कविता सादर केली.
काव्यसादरीकरणाची ‘शमा’ मग पुढे रमेशच्या समोर सरकली. रमेशने त्याच्या खास नर्म विनोदी शैलीत कवितेतील हास्य रंग खुलवला. तरूणवयात आवडलेली एखादी सुंदर मुलगी लग्नानंतरही भेटते आणि मग त्यातून कसले कसले ‘शिक्षण’ मिळते हे त्याच्या ‘शिक्षण’ कवितेतून शिकायला मिळाले. हळुवार कोपरखळ्या मारत अनेकांच्या मनातल्या जुन्या प्रेमाची आठवण रमेशने जागी केली, तर एकदम वेगळ्याच वळणावर जात ‘महात्म्याच्या कविता’ मधील ‘स्वप्नातला भारत’ हि उपहासाच्या अंगाने सरकारी कार्यालयातील कारभारावर टीका करत, गांधीजींना अपेक्षित स्वप्नातील भारत हा केवळ भ्रष्टाचार हा शिष्टाचार केल्यानंतरच येऊ शकतो कि काय असा प्रश्न निर्माण करून जाणारी कविता सादर केली.
आतापर्यंत वैविध्यपूर्ण काव्यवाचन झाल्यावर उमेशदांनी हार्मोनियमवर आपली बोटे सफाईदारपणे फिरवून संपूर्ण सभागृहाला एक सूरमयी सुखद धक्का दिला. हार्मोनियममधून निसटणाऱ्या सुरांमध्ये उमेशदांच्या गळ्यातील मुलायम सूर मिसळले आणि कवितांच्या सुगंधाने भारावून गेलेले सभागृह ह्या सुरावटीत बुडून गेले. पहिल्यांदा ‘जगणे उधाण वारा’ हि तरल; अलवार कविता त्यांच्या तशाच मुलायम स्वरात न्हाऊन रसिकांसमोर उमेशदांनी पेश केली, तर त्यापाठोपाठ एका वेगळ्याच बाजाचे ‘कारभारीन’ हे गीत त्यांनी गायले. कारभारीन मधल्या शेतकरी गड्याचे आपल्या कारभारनीविषयीचे कौतुकाचे ग्रामीण भाषेचा बाज घेऊन लिहिलेले शब्द आणि त्याला तशीच लावलेली उडती ग्रामीण ढंगाची चाल सर्वांना आवडून गेली, हे प्रेक्षकांनी अभावितपणे धरलेल्या तालावरून दिसून आले.
सभागृह असे स्वरमुग्ध झाल्यानंतर पहिल्या चक्रातील शेवटचे कवी श्रीधर काका ह्यांनी एक वेगळाच धागा पकडत त्यांच्या कवितेवरील (म्हणजे कविता हाच कवितेचा विषय असलेल्या) दोन कविता सादर केल्या. आपल्याच कवितेविषयी प्रामाणिकपणे भाष्य करणे आणि तरीही तिच्याविषयी एक सार्थ अभिमान व्यक्त करणारी अशी ‘माझी कविता’ हि कविता श्रीधरकाकांनी सादर केली. शब्दांवरील प्रभुत्व, विचारांवरील पकड आणि अवघड वाटणारा विषय सोपा करून सादर करण्याची त्यांची शैली ह्यामुळे हि कविता सुजाण रसिकांनी खूपच गौरविली. एक कवी सतत कवीपण वागवत असतो आणि त्याचं ते कवीपण घरभर पसरलेलं असतं, म्हणून कवीची बायको त्याला एक माळा बांधून घ्यायला लावते अशी कल्पना करून कवीचं जगण कस असतं ह्यावर आपल्या ‘पसारा’ कवितेत काकांनी प्रकाश टाकला. विनोदाची पेरणी करत, काळजाला चिमटा काढणारी त्यांची हि कविता जितकी श्रोत्यांना आवडली असेल तितकीच सर्व कवी मंडळींना देखील ती जवळची वाटली.
हे पहिले चक्र झाल्यानंतर संस्थेतर्फे डॉ. सौ. स्वाती गोडबोले आणि त्यांच्या मार्गदर्शक सौ. सारिका ठोसर ह्यांचा मराठी भाषेत त्यांनी केलेल्या संशोधन/ PHD साठी सन्मान करण्यात आला. तसेच सर्व कवी मंडळींचाही आपुलकीने गौरव करण्यात आला. काही काळाच्या विश्रांतीनंतर कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू झाले.
पहिल्या चक्राप्रमाणे ह्या चक्रात देखील कवींनी आपल्या दोन कविता सादर करायच्या होत्या. फक्त पहिल्या चक्राला प्रत्येक कवीने कविता सादर करण्यापूर्वी त्या कवीचा अल्प परिचय करून दिला जात होता, तर ह्या दुसऱ्या चक्रामध्ये कुठला वेगाने कविता सादर करायच्या असे त्याचे स्वरूप होते.
दुसऱ्या चक्राची सुरुवात केली श्रीधर काकांनी. पहिल्या चक्रात मुक्तछंदी कविता सादर केल्यानंतर दुसऱ्या चक्रात काकांनी ‘नाते’ आणि ‘चालतो’ ह्या दोन गझल सादर केल्या. दोन्ही कविता ह्या गंभीर आणि आत्ममग्न वाटल्या.
त्यानंतर उमेशदांनी ‘तू जेव्हा कुंकू लावायचीस’ आणि ‘आता मुक्या क्षणांचा मज भार सोसवेना’ ह्या दोन कविता सादर केल्या. भावविहंगम अशा ह्या दोन कवितांनी रसिकसुद्धा भावमुग्ध झाला.
ठरलेल्या क्रमानुसार पुन्हा एकदा रमेशने ‘ओटी आणि ‘अभिव्यक्ती’ ह्या दोन कविता सादर केल्या. शेतकऱ्यांच्या जीवनाचा आणि वस्तुस्थितीचा वेध घेणाऱ्या दोन्ही कविता श्रोत्यांच्या संवेदनांना हलवून गेल्या. ओटीमध्ये पावसाच्या अभावाचीच परिस्थिती जरी चित्रित केली असली तरीही कवितेच्या शेवटला एक सकारात्मक संदेश देणारी अशी ती वेगळीच कविता होती, तर ‘अभिव्यक्ती’ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कृत्रिम सहानुभूती दाखवणाऱ्या कवीवर एकप्रकारे ताशेरे ओढले आहेत.
पुन्हा एकदा अलकनंदा काकूंनी दोन चटका लावणाऱ्या कविता सादर केल्या. ‘घरभर आरसे लावून घ्यावे, कोणीतरी सोबतीला आल्यासारखे तरी वाटेल’ अशीच सुरुवात होणारी, मनाला हालवून आणि हेलावून सोडणारी कविता जेव्हा काकूंनी सादर केली तेव्हा सभागृहात कित्येक जणांचे सुस्कारे आणि खंत प्रकट करणारी चुकचुक ऐकू आली. तोच मूड पुढे नेत ‘कळवायचे राहून गेले’ हि कविता देखील रसिकांच्या मनाला चुटपूट लावून गेली.
मैफिलीचा नूर त्यानंतर पालटला तो सारंगच्या दोन कवितांनी. आतापर्यंत सादर झालेल्या कवितांहून निराळी अशी एक वीररसयुक्त ‘तानाजीची शौर्यकथा’ आणि दुसरी भक्तीरसयुक्त ‘भक्त एकादशी’ ह्या कविता आवेश आणि आवेगपूर्ण सादर केल्या. कवितांमधील हे वैविध्य पाहून सभागृह स्तिमित झाले.
भारावून गेलेल्या सभागृहाला पुन्हा आपल्या वळणावर घेऊन येत तुषारने पहिल्यांदा त्याची स्फूर्तीदायी कविता कि जी एखाद्या सुभाषिताप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक लोक वापरत असतात, ती सादर केली आणि सभागृहात एक चैतन्याची लहर पसरली. ‘मी हरलोय म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण’ अशा ओळीतून जीवनाला उर्मी देणारं तत्वज्ञान तुषारने जेव्हा कवितेतून मांडले तेव्हा प्रेक्षक त्या विचारांची उंची पाहून दिग्मूढच झाले असावेत. त्यापाठोपाठ एक अतिशय सुंदर तरल, हळुवार प्रेमळ भावना जागवणारे गीत त्याने गाऊन सादर केले. ‘तू दिसलीस आणिक माझ्या बघण्याचे गाणे झाले’ अशी एकच ओळ ह्या कवितेमध्ये प्रेमामुळे संपूर्ण जीवन कसे भारावून जाते हे सशक्तपणे दाखवून देते.
करता करता कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ येऊन ठेपली. ज्या कॉफीशॉप पासून विनायकने कार्यक्रमाची सुरुवात केली त्याच कॉफीशॉप शृंखलेतील पुढची कविता सादर करून त्याने कार्यक्रमाचा समारोपही केला. तत्पूर्वी त्याने आपली ‘उत्तान कविता’ हि एक आत्ममग्न आणि कवितेतील सच्चेपणाचा शोध घेणारी कविता सादर केली. तशी समजायला कठीण कविता, परंतु श्रोतृवर्ग इतका प्रगल्भ होता कि अशी कविता देखील त्यांनी छान समजून त्याला उत्तम प्रतिसाद देखील दिला. समारोपाला कॉफीशॉपची कविता अशी काही लज्जतदारपणे सादर केली कि संपूर्ण सभागृह खुश होऊन गेली. उत्तम मिष्टान्नांचे यथेच्छ जेवण झाल्यावर गरमागरम कॉफीचा स्वाद चाखाल्यासारखे सर्वांना झाले असावे.
सुमारे ७०-७५ प्रगल्भ रसिक, त्यांनी दिलेली मनमुराद सुयोग्य दाद, मधून अधून येणाऱ्या टाळ्या आणि हशा, वाहवा आणि आह, तुरळक आलेले काही once more अशा मस्त वातावरणात मैफल विलक्षण रंगली. सुमारे सव्वादोन अडीच तास कसे निघून गेले ते समजलेच नाही. कार्यक्रमाची सांगता श्रीधरकाकांनी आभार मानून आणि त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. जामदार ह्यांच्या संभाषणात्मक संक्षिप्त भाषणाने झाली.
एक चिरकाल मनात जपणारी आठवण घेऊन आम्ही सगळे आमच्या परतीच्या प्रवासाला सर्वांचा हृद्द्य निरोप घेऊन निघालो. जबलपूर विषयी एक न पुसली जाणारी जागा मनामध्ये आता निर्माण झाली होती.

Sunday, November 16, 2014

आकाश

उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशाने,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधाराने ।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटाने ,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही ह्याच्याच थयथयाटाने …
मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या पेटवल्या ह्या अंबराने ,
आभाळा एवढ्या चुका देखील
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने ...
असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळलेल अंबर
आधार होता पांगळयाचा
उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची
ही होती नियती,
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।
येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....
आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)
- श्रीधर जहागिरदार

=========================================

कविता म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो आणि अलीकडे फक्त वृत्तांमध्ये लिहिलेले पद्य हेच कविता असा हेकट अट्टाहास पण काही ठिकाणी दिसतो. मुक्त लिहिताना छंदांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, गद्यरूपी पद्य; आणि त्यात तेही अतिशय अर्थाविहीन लिहिणारे महाभाग कवी मशरूमसारखे वाढल्यामुळे मुक्त कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा काहीसा झाला असावा!

परंतु जेव्हा केवळ आशयगर्भच नव्हे, तर अत्यंत आशयनिष्ठ अशी मुक्त कविता समोर येते तेव्हा वरील विवादाचे किंवा काव्य; किंवा त्याहूनही कविता म्हणजे नक्की काय ह्याचे उदाहरण मिळून जाते!

वरील लेखनप्रपंचाचे कारण असे कि वरकरणी ह्या कवितेत देखील केवळ एक विचार प्रभावीपणे मांडला गेला आहे. हाच विचार गद्य स्वरुपात मांडताही आला असता खचित, परंतु ह्या कवितेची मांडणी; त्यातील अभिव्यक्ती; कवितेत परावर्तीत झालेले विचाराचे आवर्तन हे कवितेच्या मुक्त मांडणीला न्याय देतात. कवितेची मांडणी किंवा बांधणी हि आशयाला पूरक अशी असावी; ती आशयाशी प्रतारणा करणारी नसावी असे एक सूत्र ह्या कवितेच्या अनुषंगाने विचार करत असताना माझ्या मनात आले. मुक्त कविता वाचत असताना ती तशी मुक्तच योग्य आहे कि त्या कवितेवर काव्यसंस्कार करून ती अधिक शास्त्रोक्त करायला हवी होती असा एक विचार मी अलीकडे करत असतो, आणि बहुतेकवेळा मुक्त कविता वाचल्यानंतर त्या तशा कवितेतील भाव; भावना किंवा विचार हे वृत्त-छंदादी शिस्तीमध्ये लिहिले जाणे आवश्यक होते असे वाटून जाते, कारण त्या तशा कवितांचा गाभा (आशय म्हणणार नाही, कारण अनेकदा मुक्त कवितांमध्ये तो नसतोच) हा इतका ठिसूळ असतो कि त्या तसल्या गाभ्यासाठी वृत्त-छंदमुक्ती; अर्थात सूट घ्यावी हेच पटत नाही.

ह्याउलट ह्या कवितेमध्ये जो मूळ विचार प्रकट झाला आहे कि तो कदाचित वृत्तबद्ध कवितेला पेलवला नसता; किंवा असे म्हणावे कि तो वृत्तबद्ध कवितेमध्ये तितक्याच सहजतेने आणि सशक्तपणे मांडता आला नसता. (मांडता येणारच नाही असे नाही)

इतका सशक्त वैचारिक; नव्हे तात्विक आशय इतक्या सहजतेने; पण प्रभावीपणे मुक्त कवितेमध्ये मांडणारी एकच व्यक्ती आठवते.....आसावरी गुपचूप.

थोडे नमनाला घडाभर तेल झाले, पण हे सर्व विचार ह्या कवितेच्या निमित्ताने मनात येऊन गेले.

कवितेचा केंद्रबिंदू हा एकच विचार आहे; एकच तत्व आहे असे मला वाटते. अनेकदा कवितेमध्ये विविध भाव-भावना प्रकट होतात; अनेकविध विचार मांडले जातात. परंतु ह्या कवितेमध्ये मात्र एक विशिष्ट विचाराचेच प्रकटीकरण झाले आहे. तो विचार व्यक्त होण्याआधी त्याला प्रस्तावना जोडली आहे. आकाशाचे आणि माझे नाते विविध प्रकारे दाखवून, ते नाते अधिकाधिक गडद करत नेण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. विविध अंगांनी ते नाते स्पष्ट करत नेले आहे आणि आकाश हेच जणू सर्वस्व; हेच जणू सर्व विश्व अशा विचाराप्रत वाचकाला नेऊन ठेवल्यानंतर अचानकपणे त्या सर्वास्वमधील फोलपणा; किंवा आभासीपणा दर्शवून वाचकाला चकित करण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. परंतु असे चकित करणे हाच कवितेचा उद्देश नसून, मुळात कविता हि त्या मानलेल्या सर्वस्वाचे अस्तित्वच प्रश्नांकित करते; त्या अस्तित्वालाच आव्हान देते, किंबहुना सरते शेवटी त्याचे अस्तित्वच नाकारते. हे अतिशय चकित करणारे आहे; बंडखोर आहे; क्रांतीवादी आहे. एखाद्या विचाराची उत्क्रांती होत होत त्यातून मूळ विचारला, धारणेला छेद देत त्या विचाराचे ध्रुवीकरण होते आणि संपूर्णत: विरोधी असा विचार, धारणा किंवा तत्व समोर येते, हि संपूर्ण प्रक्रिया विस्मयजनक आहे. कवितेच्या आरंभीचा आणि अंताचा विचार हे दोन ध्रुवासारखे आहेत आणि कविता ह्या दोन ध्रुवांना जोडणाऱ्या अक्षासारखी वाटते.

अनेकदा मला असे जाणवते कि अशा प्रकारच्या कवितांमध्ये ‘विचार जिंकतो; आणि कविता किंवा काव्य हे मागे राहते’. इथे काहीसे असेच मला वाटते. विचार वरिष्ठ आणि कविता दुय्यम असे काहीसे चित्र इथे निर्माण होते. म्हणजे एका अर्थाने कविता त्यातील काव्यामुळे नव्हे तर त्यातील ह्या विचारामुळे हलवते, मनाला भावते. कवितेविषयी लिहिण्यापेक्षा कवितेतील content विषयी अधिक लिहिण्याचा मोह होत राहतो. अजूनही त्याविषयी खूप काही लिहिता येऊ शकते, लिहावेसे वाटते. हा मला त्या विचाराचा, एका अर्थाने त्या आशयाचा विजय वाटतो. पण संपूर्ण कविता विजयी नाही होत असे माझे मत आहे. म्हणजे एकाच खेळाडू match जिंकून देतो आणि बाकीचे खेळाडू येतात जातात तसे काहीसे होते.

पण हे म्हणत असतानाच मी आधी म्हटले तसे कविता केवळ आशयगर्भच नाही; तर आशयनिष्ठ देखील आहे. म्हणजे कविता त्यातून जो आशय प्रकट करायचा आहे त्याच्याशी प्रामाणिक आहे. हि कविता आहे, म्हणून ती अधिक खुलविण्याचा, तिला अधिक नटविण्याचा आणि त्यासाठी कवितेत काही अधिक अनावश्यक असा मसाला भरण्याचा प्रयत्न करत नाही. एका अर्थाने कविता अव्यभिचारीपणे त्यातील मूळ गाभा प्रकाशित करते आणि बाकीच्या पसा-याला फाटा देते. उगाच तिच्या आंतरिक सौंदर्यावर बाह्यदर्शी सौंदर्याचा मुलामा चढवत नाही. त्यामुळे कविता कवीच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण करते. म्हणूनच पुन्हा वाटून जाते कि कविता एक आत्मनिवेदन मांडते कि जे वैश्विक आहे; अर्थात ते सर्वांसाठी आहे; सार्वत्रिक आहे.

वर मांडलेल्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने असे वाटून जाते कि जे कवितेचे यश आहे तेच कवितेची मर्यादा पण दर्शवते का? मला तरी ह्याचे उत्तर माहित नाही, पण मनात हा विचार येऊन जातो.

मी एवढे लिहिले म्हणजे हि कविता काही फार outstanding आहे असे मला बिलकुल म्हणायचे नाही. पण कवितेमध्ये असे काही मुलभूत आहे कि जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...