Sunday, November 16, 2014

आकाश

उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशाने,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधाराने ।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटाने ,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही ह्याच्याच थयथयाटाने …
मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या पेटवल्या ह्या अंबराने ,
आभाळा एवढ्या चुका देखील
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने ...
असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळलेल अंबर
आधार होता पांगळयाचा
उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची
ही होती नियती,
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।
येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....
आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)
- श्रीधर जहागिरदार

=========================================

कविता म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो आणि अलीकडे फक्त वृत्तांमध्ये लिहिलेले पद्य हेच कविता असा हेकट अट्टाहास पण काही ठिकाणी दिसतो. मुक्त लिहिताना छंदांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, गद्यरूपी पद्य; आणि त्यात तेही अतिशय अर्थाविहीन लिहिणारे महाभाग कवी मशरूमसारखे वाढल्यामुळे मुक्त कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा काहीसा झाला असावा!

परंतु जेव्हा केवळ आशयगर्भच नव्हे, तर अत्यंत आशयनिष्ठ अशी मुक्त कविता समोर येते तेव्हा वरील विवादाचे किंवा काव्य; किंवा त्याहूनही कविता म्हणजे नक्की काय ह्याचे उदाहरण मिळून जाते!

वरील लेखनप्रपंचाचे कारण असे कि वरकरणी ह्या कवितेत देखील केवळ एक विचार प्रभावीपणे मांडला गेला आहे. हाच विचार गद्य स्वरुपात मांडताही आला असता खचित, परंतु ह्या कवितेची मांडणी; त्यातील अभिव्यक्ती; कवितेत परावर्तीत झालेले विचाराचे आवर्तन हे कवितेच्या मुक्त मांडणीला न्याय देतात. कवितेची मांडणी किंवा बांधणी हि आशयाला पूरक अशी असावी; ती आशयाशी प्रतारणा करणारी नसावी असे एक सूत्र ह्या कवितेच्या अनुषंगाने विचार करत असताना माझ्या मनात आले. मुक्त कविता वाचत असताना ती तशी मुक्तच योग्य आहे कि त्या कवितेवर काव्यसंस्कार करून ती अधिक शास्त्रोक्त करायला हवी होती असा एक विचार मी अलीकडे करत असतो, आणि बहुतेकवेळा मुक्त कविता वाचल्यानंतर त्या तशा कवितेतील भाव; भावना किंवा विचार हे वृत्त-छंदादी शिस्तीमध्ये लिहिले जाणे आवश्यक होते असे वाटून जाते, कारण त्या तशा कवितांचा गाभा (आशय म्हणणार नाही, कारण अनेकदा मुक्त कवितांमध्ये तो नसतोच) हा इतका ठिसूळ असतो कि त्या तसल्या गाभ्यासाठी वृत्त-छंदमुक्ती; अर्थात सूट घ्यावी हेच पटत नाही.

ह्याउलट ह्या कवितेमध्ये जो मूळ विचार प्रकट झाला आहे कि तो कदाचित वृत्तबद्ध कवितेला पेलवला नसता; किंवा असे म्हणावे कि तो वृत्तबद्ध कवितेमध्ये तितक्याच सहजतेने आणि सशक्तपणे मांडता आला नसता. (मांडता येणारच नाही असे नाही)

इतका सशक्त वैचारिक; नव्हे तात्विक आशय इतक्या सहजतेने; पण प्रभावीपणे मुक्त कवितेमध्ये मांडणारी एकच व्यक्ती आठवते.....आसावरी गुपचूप.

थोडे नमनाला घडाभर तेल झाले, पण हे सर्व विचार ह्या कवितेच्या निमित्ताने मनात येऊन गेले.

कवितेचा केंद्रबिंदू हा एकच विचार आहे; एकच तत्व आहे असे मला वाटते. अनेकदा कवितेमध्ये विविध भाव-भावना प्रकट होतात; अनेकविध विचार मांडले जातात. परंतु ह्या कवितेमध्ये मात्र एक विशिष्ट विचाराचेच प्रकटीकरण झाले आहे. तो विचार व्यक्त होण्याआधी त्याला प्रस्तावना जोडली आहे. आकाशाचे आणि माझे नाते विविध प्रकारे दाखवून, ते नाते अधिकाधिक गडद करत नेण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. विविध अंगांनी ते नाते स्पष्ट करत नेले आहे आणि आकाश हेच जणू सर्वस्व; हेच जणू सर्व विश्व अशा विचाराप्रत वाचकाला नेऊन ठेवल्यानंतर अचानकपणे त्या सर्वास्वमधील फोलपणा; किंवा आभासीपणा दर्शवून वाचकाला चकित करण्याचा प्रयत्न कवितेत दिसतो. परंतु असे चकित करणे हाच कवितेचा उद्देश नसून, मुळात कविता हि त्या मानलेल्या सर्वस्वाचे अस्तित्वच प्रश्नांकित करते; त्या अस्तित्वालाच आव्हान देते, किंबहुना सरते शेवटी त्याचे अस्तित्वच नाकारते. हे अतिशय चकित करणारे आहे; बंडखोर आहे; क्रांतीवादी आहे. एखाद्या विचाराची उत्क्रांती होत होत त्यातून मूळ विचारला, धारणेला छेद देत त्या विचाराचे ध्रुवीकरण होते आणि संपूर्णत: विरोधी असा विचार, धारणा किंवा तत्व समोर येते, हि संपूर्ण प्रक्रिया विस्मयजनक आहे. कवितेच्या आरंभीचा आणि अंताचा विचार हे दोन ध्रुवासारखे आहेत आणि कविता ह्या दोन ध्रुवांना जोडणाऱ्या अक्षासारखी वाटते.

अनेकदा मला असे जाणवते कि अशा प्रकारच्या कवितांमध्ये ‘विचार जिंकतो; आणि कविता किंवा काव्य हे मागे राहते’. इथे काहीसे असेच मला वाटते. विचार वरिष्ठ आणि कविता दुय्यम असे काहीसे चित्र इथे निर्माण होते. म्हणजे एका अर्थाने कविता त्यातील काव्यामुळे नव्हे तर त्यातील ह्या विचारामुळे हलवते, मनाला भावते. कवितेविषयी लिहिण्यापेक्षा कवितेतील content विषयी अधिक लिहिण्याचा मोह होत राहतो. अजूनही त्याविषयी खूप काही लिहिता येऊ शकते, लिहावेसे वाटते. हा मला त्या विचाराचा, एका अर्थाने त्या आशयाचा विजय वाटतो. पण संपूर्ण कविता विजयी नाही होत असे माझे मत आहे. म्हणजे एकाच खेळाडू match जिंकून देतो आणि बाकीचे खेळाडू येतात जातात तसे काहीसे होते.

पण हे म्हणत असतानाच मी आधी म्हटले तसे कविता केवळ आशयगर्भच नाही; तर आशयनिष्ठ देखील आहे. म्हणजे कविता त्यातून जो आशय प्रकट करायचा आहे त्याच्याशी प्रामाणिक आहे. हि कविता आहे, म्हणून ती अधिक खुलविण्याचा, तिला अधिक नटविण्याचा आणि त्यासाठी कवितेत काही अधिक अनावश्यक असा मसाला भरण्याचा प्रयत्न करत नाही. एका अर्थाने कविता अव्यभिचारीपणे त्यातील मूळ गाभा प्रकाशित करते आणि बाकीच्या पसा-याला फाटा देते. उगाच तिच्या आंतरिक सौंदर्यावर बाह्यदर्शी सौंदर्याचा मुलामा चढवत नाही. त्यामुळे कविता कवीच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण करते. म्हणूनच पुन्हा वाटून जाते कि कविता एक आत्मनिवेदन मांडते कि जे वैश्विक आहे; अर्थात ते सर्वांसाठी आहे; सार्वत्रिक आहे.

वर मांडलेल्या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने असे वाटून जाते कि जे कवितेचे यश आहे तेच कवितेची मर्यादा पण दर्शवते का? मला तरी ह्याचे उत्तर माहित नाही, पण मनात हा विचार येऊन जातो.

मी एवढे लिहिले म्हणजे हि कविता काही फार outstanding आहे असे मला बिलकुल म्हणायचे नाही. पण कवितेमध्ये असे काही मुलभूत आहे कि जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...