मनात खुलली कळी इटुकली प्रिती त्या म्हणे
जणू प्रतिपदा फुलून पडले नभी चांदणे
सुन्या निरस मैफलीत घुमली मुकी पैंजणे
प्रितीत बुडता मनात भरली रिती रांजणे
जणू चिखल लोचने मम असे म्हणेना कुणी
तिचे मुखसरोज रोज बघण्या झुरे पापणी
चकोर बनतो शशी मुखशशी तिचा पाहुनी
सुवर्णमृग ती बनून मृगया करे मोहुनी
जणू गुलबकावलीच मजला मिळाली असे
उषा उगवता निशा निवळता मला ती दिसे
मनोरम दिसे मनोहर हसे, उसासे पिसे
बघून तिजला मयूर फुलवी अवेळी पिसे
तिच्या अधर पाकळ्या उमलवी कळ्या लाजऱ्या
तळ्यात तरळे तरंग म्हणजे खळ्या हासऱ्या
समीर सरिता तडाग तडिता कपारी दऱ्या
तिलाच स्मरती तिच्यात रमती फुले मंजिऱ्या
म्हणू मदनमंजिरी मदनिका तिला की परी
परीच जरी ती परी तिजपरी कुणी ना परी
विशेषण कितीतरी तिज दिली अपूरी तरी
तिची न तुलना अशी ती ललना रती सुंदरी
=========================
सारंग भणगे (१४ फेब्रुवारी २०१६)
No comments:
Post a Comment