कधी कधी तू पोटातून येतेस
आतड्याला उष्ण तीक्ष्ण बाणाच्या टोकाने टोचल्यानंतर
विव्हळत तू माझ्या पोटातून येतेस,
मी तक्रार करत नाही,
कारण वेदनेचा असा शाप असला तरी
तू उ:शाप बनून येतेस,
कधी कधी तू पोटातून येतेस...
डोळ्यातून झरणारं सारंच काही दु:ख नसतं
आनंदाचे मोती गालावर ओघळतात
तेव्हा तू ओठातून येतेस,
कधी कधी तू पोटातून येतेस.....
कधी कधी तू अर्धीमुर्धीच येतेस
मी वाट पाहत राहतो
त्या सुरवंटाचं फुलपाखरू होण्याची
आणि जेव्हा वाट पाहण्याची वाट संपते
तेव्हा मी फुलपाखराचं फक्त चित्र रंगवतो
आणि मग....
तेव्हा तू माझ्या बोटातून येतेस
कधी कधी तू पोटातून येतेस.....
तुझे माग सापडत नाहीत
जिथे तुझी सुरुवात होते
त्याच्याही पलीकडे तू दिसत राहतेस,
तीही कदाचित तुझी सुरुवात नसते
आणि जिथे मी तुझा अंत करतो
तोही तुझा अंत नसतोच
खरंतर ती तू पुन्हा परत येण्याची
फक्त एक सुरुवात असते,
एका स्वल्पविरामानंतर
त्या अल्पविरामानंतर
पुन्हा जन्म घेण्यासाठी...
तू माझ्या पोटात येतेस,
आणि पुन्हा कधीतरी तू....
माझ्या पोटातून येतेस.
कधी कधी तू पोटातून येतेस
=================
सारंग भणगे (२५ फेब्रुवारी २०१६)
No comments:
Post a Comment