रहाटगाडे आयुष्याचे गरगर फिरते; फिरत रहाते
चऱ्हाट निशिदिन व्यवहाराचे रटाळवाणे छळत रहाते
गुरफटलेलो गुऱ्हाळात ह्या गुळगुळीत मग जगत रहातो
रंगहीनसे हिणकस जीवन चोथा बनुनी पिचत रहातो
अवचित कोणी फूलपाखरू भिरभिर डोई फिरत रहाते
रंगबिरंगी कवीकल्पना डोक्यामध्ये शिरत रहाते
भावभावना विभाव अगणित काव्यमानसी उठत रहाती
मानस क्षितिजा ओलांडुन ते काव्य-धरेवर पडत रहाती
कृष्णधवल ह्या आयुष्याला सृजनरंगीत पोत असावा
रंगबिरंगी ठसे सोडले चेहरा तरीही त्यास नसावा
===================================
सारंग भणगे (१२ फेब्रुवारी २०१६)
No comments:
Post a Comment