कामधेनू कि कल्पतरू वा चिंतामणी कि सारे
जननी म्हणजे कल्पांताचे स्वप्न विहंगम असते
कोसळणाऱ्या उल्का झेलत पथात भरतो तारे
बापच असतो जो दाखवतो आकाशाचे रस्ते
पती सुकाणू शीड नि पत्नी, सरते वादळ वारे
दोघांचीही साथ लाभता जीवन नौका तरते
भाऊ-बहिणी नसता जीवन होते नीरस कोरे
आयुष्याला जे मिळते ते गुरूविना का मिळते?
जगात नाही निर्मळ नाते मैत्री समान दुसरे
मैत्री रुजता मरुभूमीसम जीवन मधुबन होते
गणगोतांच्या अनुबंधाशी तुल्य नसावे दुसरे
ज्या नात्याला नावही नसते असेही कोणी असते
ऐलकिनारी गोकुळ अवघे सगेसोयरे सारे
पैलकिनारी गोपाळ उभा, वाटे निष्फळ सारे
============================
सारंग भणगे. (४ जुलै २०१७)
No comments:
Post a Comment