Friday, July 7, 2017

Letters to Young Poet - Letter 1

You ask whether your verses are any good. You ask me. You have asked others before this. You send them to magazines. You compare them with other poems, and you are upset when certain editors reject your work. Now (since you have said you want my advice) I beg you to stop doing that sort of thing. You are looking outside, and that is what you should most avoid right now. No one can advise or help you - no one. There is only one thing you should do. Go into yourself. Find out the reason that commands you to write; see whether it has spread its roots into the very depths of your heart; confess to yourself whether you would have to die if you were forbidden to write. This most of all: ask yourself in the most silent hour of your night: must I write? Dig into yourself for a deep answer. And if this answer rings out in assent, if you meet this solemn question with a strong, simple "I must", then build your life in accordance with this necessity; your whole life, even into its humblest and most indifferent hour, must become a sign and witness to this impulse. Then come close to Nature. Then, as if no one had ever tried before, try to say what you see and feel and love and lose. Don't write love poems; avoid those forms that are too facile and ordinary: they are the hardest to work with, and it takes a great, fully ripened power to create something individual where good, even glorious, traditions exist in abundance. So rescue yourself from these general themes and write about what your everyday life offers you; describe your sorrows and desires, the thoughts that pass through your mind and your belief in some kind of beauty Describe all these with heartfelt, silent, humble sincerity and, when you express yourself, use the Things around you, the images from your dreams, and the objects that you remember. If your everyday life seems poor, don't blame it; blame yourself; admit to yourself that you are not enough of a poet to call forth its riches; because for the creator there is no poverty and no poor, indifferent place. And even if you found yourself in some prison, whose walls let in none of the world's sound - wouldn't you still have your childhood, that jewel beyond all price, that treasure house of memories? Turn your attention to it. Try to raise up the sunken feelings of this enormous past; your personality will grow stronger, your solitude will expand and become a place where you can live in the twilight, where the noise of other people passes by, far in the distance. And if out of , this turning within, out of this immersion in your own world, poems come, then you will not think of asking anyone whether they are good or not. Nor will you try to interest magazines in these works: for you will see them as your dear natural possession, a piece of your life, a voice from it. A work of art is good if it has arisen out of necessity. That is the only way one can judge it. So, dear Sir, I can't give you any advice but this: to go into yourself and see how deep the place is from which your life flows; at its source you will find the answer to, the question of whether you must create. Accept that answer, just as it is given to you, without trying to interpret it. Perhaps you will discover that you are called to be an artist. Then take that destiny upon yourself, and bear it, its burden and its greatness, without ever asking what reward might come from outside. For the creator must be a world for himself and must find everything in himself and in Nature, to whom his whole life is devoted.

But after this descent into yourself and into your solitude, perhaps you will have to renounce becoming a poet (if, as I have said, one feels one could live without writing, then one shouldn't write at all). Nevertheless, even then, this self searching that I ask of you will not have been for nothing. Your life will still find its own paths from there, and that they may be good, rich, and wide is what I wish for you, more than I can say.

- Rainer Maria Rilke (27 February, 1903)
-----------------------------------------------------------------------------------
‘माझ्या कविता चांगल्या आहेत का?’ असं तुम्ही मला विचारलं आहे. ह्यापूर्वी इतरांनाही तुम्ही असं विचारलं आहे, तुम्ही तुमच्या कवितांची तुलना इतरांच्या कवितांशी करता, असं देखील तुम्ही पत्रात लिहिले आहे. तुम्ही मासिके आणि नियतकालिकांना तुमच्या कविता प्रकाशित करण्यासाठी पाठवल्या, आणि काही कविता प्रकाशकांनी अस्वीकृत केल्यामुळे तुम्ही नाराज झालात, असंही तुम्ही लिहिले आहे. तुम्ही मला विचारलेच आहे म्हणून सांगू इच्छितो कि कृपया ह्या अशा सर्व गोष्टी करणे तुम्ही त्वरित थांबवावे. तुम्ही (तुमच्या कवितेविषयी जाणून घेण्यासाठी) बाह्य जगताकडे पाहात आहात. परंतु खरेतर ह्या तुमच्या स्वत:च्या कवितेविषयीच्या कुतुहलाबाबत तुम्हाला इतर कुणीही मदत करू शकणार नाही. तुम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, आणि ती म्हणजे तुमच्या अंतरंगात; तुमच्या अंतर्मनातल्या विश्वात ह्याचा शोध घेतला पाहिजे.

असे काय आहे कि जे तुम्हाला लिहिण्यास भाग पाडते; ते तुमच्या मनात खोलवर रुजले आहे का, ह्याचा शोध घ्या. जर तुमच्या लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले, तर तुम्ही जगू शकाल का? ह्याची प्रामाणिक कबुली आपल्या मनाला तुम्ही द्या. उत्तररात्रीच्या सर्वात शांत प्रहरी तुम्ही स्वत:ला विचारा ‘लिहिणे ही माझी गरज आहे का?’, आणि जर त्याचे उत्तर ‘हो’ असे तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून निनादत आले; जर ह्या कळीच्या प्रश्नाचं सरळ पण निश्चित उत्तर ‘होय, मी लिहिले पाहिजे’ असे असेल तर तुम्ही जरूर लिहा. अतिशय कठीण आणि खडतर काळात देखील, तुमचं संपूर्ण जीवन ह्या (अंत:) प्रेरणेचे प्रतिक झाले पाहिजे; तुमचे जगणे हेच त्या प्रेरणेचा पुरावा ठरले पाहिजे. आणि असे असेल तर तुम्ही काय पाहता; अनुभवता; कशावर प्रेम करता आणि कशात हरवता, हे सगळ सगळ लिहा.

पण माझा एक प्रेमाचा सल्ला असा असेल कि प्रेमकविता लिहू नका. असे लिहिणे टाळा कि जे उथळ, सहज आणि सामान्य आहे. खरेतर त्यामध्येच (प्रतिभा) शक्तीचा खूप (अप) व्यय होतो, आणि जिथे अशा प्रकारच्या पुष्कळ सुंदर सुंदर कविता आधीच उपलब्ध आहेत, तिथे स्वत:च्या अशा प्रकारच्या कविता निर्माण करण्यासाठी अतिशय प्रगल्भ अशी प्रतिभा आवश्यक असते. म्हणून तुम्ही अशा सर्वसामान्य प्रकारांपासून स्वत:ला दूर ठेवा.

त्यापेक्षा तुमच्या नित्य जीवनातल्या घडामोडींविषयी लिहा, तुमची स्वप्न; तुमच्या व्यथा हे शब्दबद्ध करा; तुमच्या मनातील विकारांच्या प्रवाहांविषयी; भावनांच्या आरोह-अवरोहांविषयी; तुमच्या जीवनातील सौंदर्य विषयक मूल्यांबाबत, अतिशय सहृदयतेने; शांतपणे; प्रांजळपणे आणि सर्वात मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे लिहा. तुमच्या सभोतालच्या वस्तू; तुमच्या स्वप्नातील प्रतिमा; आणि तुमच्या स्मृतींत बिंबलेली चित्रे हे सारे तुमच्या अभिव्यक्तीमध्ये दिसू दे.

जर तुमच्या आयुष्यात कवितेतून प्रकट करता येईल; व्यक्त करता येईल अशा गोष्टींचा अभाव आहे असे वाटत असेल तर त्याचा दोष स्वत:ला द्या; आयुष्याला नको. कारण आयुष्य सुंदर आहे, आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याइतपत कवित्व आपल्यात नाही, हे मान्य करावे. कारण खरेतर ह्या विश्वाच्या निर्मिकासाठी आयुष्यात सुंदर किंवा असुंदर असे काहीच नाही. समजा, तुम्ही अशा एखाद्या कराल तुरुंगात बंद आहात कि ज्याच्या अभेद्य भिंतीतून बाहेरच्या विश्वातील कुठलेच नाद तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण अशा वेळी सुद्धा तुमच्या स्मृतींमध्ये जपलेले तुमचे अमूल्य असे बालपण तुमच्याकडे असेल, होय ना! ते आठवा. मनाच्या सागरात खोल बुडालेले ते मोती स्वत:च्या अंतरंगात खोल बुडी मारून वर काढा; मला खात्री आहे कि तुमच्या कवित्वाच्या आणि व्यक्तित्वाच्या विकासासाठी ते पूरक ठरतील, तुमच्या एकांताच्या कक्षा रूंदावतील, आणि तुम्ही संधीप्रकाशाच्या प्रशांत डोहात हरवाल, जगातील कोलाहल आणि गोंगाट तुमच्या जवळ देखील फिरकणार नाही.

आणि जेव्हा अंतर्यामीच्या अशा कल्लोळातून; स्वत:च्या आंतरविश्वात बुडून जेव्हा तुमच्या कविता उत्फुल्लित होतील तेव्हा तुम्हाला तुमच्या कवितांवर अभिप्राय मागण्याची आवश्यकता वाटणार नाही, कि कुठल्या प्रकाशकाला त्या प्रकाशनयोग्य वाटाव्यात ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नाही. कारण मग त्या कविता तुम्हाला तुमच्या अधिक व्यक्तिगत वाटतील, तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटतील; त्या कविता तुमच्या आयुष्याचा एक उद्गार आहेत असे तुम्हाला वाटेल.

कला ही कलाकाराची अशम्य भूक असायला हवी; त्याच्या जगण्यासाठीची मुलभूत आवश्यकता असायला हवी. एवढे एकच कलेचे मूल्यमापन होऊ शकते!

म्हणून माझा तुम्हाला फक्त एकच सल्ला आहे कि, ‘स्वत:च्या अंतर्विश्वात खोSSSल बुडी मारून तुमच्या अस्तित्वाच्या मूळ प्रवाह-स्त्रोतापर्यंत पोचलात, तर त्यापाशी तुम्हाला तुमच्या सृजनाच्या आवश्यकतेच समाधान खचित मिळू शकेल.’ (सृजन ही तुमची मुलभूत गरज आहे का ह्याच समाधान अत्यंत आत्मरत होऊन, आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाच्या; अस्तित्वाच्या आणि स्वत्वाच्या मुळाशी गेल्यावर ‘होय’ असं मिळालं तरच कविता लिहायला हव्यात!) ते उत्तर कुठलेही संदर्भ आणि अन्वयार्थ न लावता स्वीकार करा. कदाचित तुम्हाला असे लक्षात येईल कि तुम्ही एक कलाकार म्हणून जन्मला आहात.

मग तेच तुमचं संचित त्याच्या बऱ्या-वाईट फलितांसकट स्वीकारा, इतरांकडून कुठल्याही कौतुक किंवा पारितोषिकांची अपेक्षा न धरता. कारण जो सर्जनशील असतो त्यासाठी त्याचे सृजन; त्याची कला हेच त्याचे संपूर्ण विश्व असते, आणि ती कलादेखील त्याला स्वत:च्या अंतर्विश्वातच मिळते, ज्यासाठी त्याचे आयुष्य वाहिलेल असते.

पण स्वत:च्या ह्या एकांत चित्तविश्वात एकदा बुडून गेल्यानंतर, तुम्ही स्वत:होऊन तुमचे कवित्व त्याग कराल, आणि तरीही हा आत्मशोध विफल ठरणार नाही. तुमचे आयुष्य त्याचे पुढचे मार्गक्रमण तेथूनच करीत राहील, आणि ते कदाचित तुमच्या-माझ्या अपेक्षांपेक्षा देखील अधिक समृद्ध आणि विशाल असेल!

- अनुवाद: सारंग भणगे (६ जुलै २०१७)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...