Friday, September 15, 2017

एक टिपिकल कविता...

एका टिपिकल संध्याकाळी
तू आणि मी
अगदी टिपिकल एका कड्याच्या टोकाला बसलोय,
एकमेकांच्या कंपनीत,
पण कंपनी कायद्यातल्या रिलेटेड पार्टी transaction सारखं...
Arms length ठेऊन,
जरी लौकिकार्थाने unrelated असलो तरी.....

त्या सूर्याचा रक्तीमा टिपिकलपणे तुझ्या सस्मित गालावर पडलेला,
वाऱ्याच्या झुळुकीने पुढे येणारी तुझी बॉब बट
तू टिपिकलपणे मागे घेतेस,
मी टिपिकलपणे अनिमिष नेत्रांनी हे सुखद दृश्य पाहत राहतो,
तू माझ्याकडे बघून टिपिकल हसतेस,
मी टिपिकलपणे हळूच माझा हात थोड्या अंतरावर असलेल्या तुझ्या हाताजवळ सरकवतो,

असं सगळं टिपिकल असताना
त्या काव्यदृश्याचा अंत सुद्धा टिपिकलच होईल असा टिपिकल अंदाज बांधत असताना....

माझी बोटं तुझ्या बोटांना स्पर्श करतायत हे मी स्पष्ट पाहतोय
पण
पण माझ्या बोटांना अपेक्षित असलेला टिपिकल स्पर्श मात्र होत नाही....

आताही तुझ्या चेहऱ्यावर स्मित तरळत आहेच,
पण तेही टिपिकल नाही...

तुझा हात जेव्हा हातात घ्यायचा मी प्रयत्न करतो,
तेव्हा माझ्या हातात फक्त येते....
तिथे असलेली 'माती'!

ती माती मुठीत धरून जेव्हा
जीव कालवलेल्या नजरेनी मी तुझ्या कडे बघतो...
तुझं सगळं शरीर हळूहळू जणू
वातावरणात विरघळू लागलंय...
फिकट, धुरकट होत होत...
अखेर धुराची एक स्मितरेषा काही क्षण तिथे तरळून जाते...
आणि मग स्वच्छ हवा..
एका निर्मळ कस्तुरी सुगंधासहित वाहत राहते...

हातात राहिलेल्या मातीकडे,
खिन्न चेहऱ्याने बघताना
त्या मातीलाही तोच कस्तुरी सुगंध येत आहे असं जाणवतं,

मी हाताची ओंजळ नाकाजवळ घेऊन तो सुवास घेतो,
आणि जणू माझं संपूर्ण अंतर्विश्व..
एक मंदिराचा गाभारा धुपाच्या मंगल सुगंधाने भरून जावा; भारून जावा,
तस भरून; भारून जातं,
मी भारावून जातो, आणि....

मूठ घट्ट धरू जाता,
मुठीतुन ती माती
हळूहळू
निसटत जाते,
दिल चाहता है मधला दिपाला सांगितलेला डायलॉग आठवतो,

मी आता सस्मित त्या वाहून जाणाऱ्या मातीकडे पाहात राहतो...

व. पुं. च्या 'सखी'त तो जेव्हा सखीचा हात अनाहूतपणे हातात घेतो,
आणि नंतर ओशाळाल्यावर सखी त्याला म्हणते
की तू चांदणच हातात धरलं होतंस,
मी तर फक्त माती हातात धरली होती,
माझ्या मातीच्या हातांना..
सुगंधित करणारी..
पण कधीही हातात न येणारी.....

माझीही माती होऊन मी त्या मातीत विलीन होईपर्यंत!

(दूर कुठेतरी चाफा बोलेना चालू असतं)

- सारंग भणगे

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...