Saturday, July 28, 2018

नागेश कुकनूरचा "धनक"

नागेश कुकनूर विषयी वेगळ्याने काही सांगायला नकोच. पण कदाचित डोर नंतर तो विस्मरणात गेला, आणि अचानक पणे समोर आला ते 'धनक' मधून, एक अनपेक्षित सुखद धक्का देत!
मोठमोठे Stars; foreign मधली shootings; चित्रपटामध्ये विविध प्रकारचा बडेजाव किंवा हिंसाचार किंवा ओढून ताणून केलेले; बरेचदा ओंगळ वाटावेत असे विनोद; किंवा कुठेतरी फारच खिन्नता .......ई. ई. ने खचाखच भरलेले अनेक चित्रपट येऊन आपापले ढोल ताशे वाजवून निघून जातात!
'धनक' मध्ये असा कुठलाच डामडौल नाही; कुठलीच चमकधमक नाही.

पण साधेपणातले स्वच्छ सौंदर्याने नटलेला एक सुरेख चित्रपट म्हणून 'धनक' मनावर ठसा उमटवून गेला.

राजस्थान मधल्या कुठल्याशा दुर्गम छोट्या गावातल्या गरीब; रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबात दोन मुले असतात - परी नावाची गोड १३-१४ वर्षाची मुलगी आणि तिचा ९ वर्षाचा लहान भाऊ 'छोटू'. ह्यांचे आई-बाप कसल्याशा अपघातात वारले आहेत, आणि हि दोन मुले त्यांच्या अपत्यहीन असलेल्या काका-काकूंच्या कुटुंबात राहत आहेत. काका happy go lucky पण काम न करता दिवसभर हुक्का पीत बसणारा; तर काकू शेतावर मोलमजुरी करून चार पैसे कमावणारी; पण कजाग. मेलेल्या आई-बापाची पोर म्हणून काकू काही मुलांना चांगली वागणूक देत नसते. म्हणजे ती अगदी अत्याचारी नसते, पण मुलांचा द्वेषच करणारी असते.

काकूच्या अशा स्वभावामुळे; छोटूला पोषक आहार न दिल्यामुळे त्याचे डोळे ४ वर्षापूर्वी गेले आहेत आणि तो आता अंध झाला आहे.

छोटू भलता चुणचुणीत आणि हिम्मतवाला मुलगा. आंधळा असला तरी कुणाशी भांडायला कचरणार नाही, बोलण्यात एकदम चतुर, गोड गळ्याचा आणि सलमान खानचा प्रचंड fan.त्याचा अगदी अंध-भरोसा तो म्हणजे परीवर; त्याच्या लहान ताईवर!

परी १३-१४ वर्षाची गोड पोर. बुद्धीने हुशार आणि धाडसी. भावावर प्रचंड माया आणि प्रेम करणारी. अंध भावाला त्याच्या ९ व्या वाढदिवसाला डोळे आले पाहिजेत; त्याला रात्रीत 'धनक' (म्हणजे इंद्रधनुष्य) दाखवायचे आहे, हे तिचे स्वप्न! ती शाहरुख खानची प्रचंड चाहती.

तिला एकदा एक पोस्टर दिसते कि शाहरुख खान अंधांना फुकट नेत्रदानाचे काम करत आहे. लगोलग तिला बातमीही मिळते कि शाहरुखचे जैसलमेर मध्ये शुटींग चालू आहे.

एका रात्री ती निर्णय घेते आणि काकाचे घर सोडून छोटू बरोबर जैसलमेरला जाण्यासाठी बाहेर पडते. दोन चिमुकले जीव गळ्यातल्या पिशवीत थोडा खाऊ; अगदी मोजकेचे पैसे आणि पाण्याची बाटली घेऊन राजस्थानच्या विराण; निर्मनुष्य वाळवंटात चालत बाहेर पडतात.

वाटेत त्यांना निरनिराळे लोक भेटतात; एखादे संकट देखील येते (जे अपेक्षितच असते), पण करत करत ९ व्या वाढदिवसाला छोटूचे डोळ्याचे operation होते आणि छोटू बरा होतो! मी उपकथानकांच्या तपशीलात शिरणार नाही.

कथानक वरकरणी फार आकर्षक वाटत नाही, परंतु नागेशने छोटू आणि परी हि दोन पात्र इतकी सुंदर आणि गोड निर्माण केली आहेत; ती तितक्याच अद्भुत कलाकारीने दोन छोट्या मुलांनी निभावली आहेत कि काय सांगावे!

छोटू आणि परी ह्यांच्यातले संवाद अतिशय गोड! छोटू परीला कसा छेडतो; त्रास देतो, परी तरी त्याच्यावर कसा जीव लावते, बहिणीचे त्या छोट्या भावावर किती अपरिमित माया असते; छोटू देखील कसा तिच्यावर पूर्ण भरोसा आणि प्रेम करत असतो, ह्याचे चित्रण त्या चित्रपटात आपल्याला बांधून ठेवते.

परीचे अत्यंSSत निरागस गोSSड हसणे, छोटूचे हट्ट; सलमान भाईची नक्कल; आणि संवादफेक हि इतकी लोभस आहे कि दोन हरणाच्या पिल्लांचा खेळ जणू आपण तंद्री लावून बघत बसू तसे ह्या चित्रपटात हरवून जायला होते.

एखाद्या ठिकाणी थोडा चित्रपट ताणला गेलाय असे वाटू शकते, परंतु प्रत्येक प्रसंगात काही न काही गोडवा नागेशने निर्माण केलाय त्याने कुठेच इतकी साधी सरळ कथा कंटाळवाणी होत नाही. कुठे अति-भावूक प्रसंग नाहीत. जरी काही प्रसंगात logic वाटत नाही, तरी अतिरंजितपणा किंवा मूर्खपणा जाणवत नाही. आणि जरी जाणवलाच तरी परी आणि छोटू ह्यांच्यातला जिव्हाळा; त्यांचा अभिनय इतर सर्व किरकोळ किल्मिष धुवून काढतो!

परी आणि छोटू ह्यांनी अफलातून सहज अभिनय केला आहे. ते दोघेच संपूर्ण चित्रपटाचे नायक-नायिका आहेत. बाकी इतर सर्व त्यांच्या अवती-भवतीच फिरत असतात.

'धनक' म्हणजे इंद्रधनुष्य. ह्या चित्रपटात इतके सुंदर रंग भरले आहेत कि प्रत्यक्षातले इंद्रधनुष्य फिके पडावे!

- सारंग भणगे
(२८ जुलै २०१८)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...