-----------------
हाय हा मी झालो अंध
नुस्ता रक्त-लक्तराचा गंध
ठसठसती या ठायी ठायी
जाळ जखमांची लाही लाही
कोंडुनी या बंदीगृहात
ही गिधाडे वाट पहात
मारून चोची तोडी लचके
श्वास मोजके आणि आचके
भ्याड श्वापदे अशी लुचती
हाडेकाडे सडून पिचती
नसानसांना गेली छिद्रे
सुमुख झाले वेडेविद्रे
बद्ध हाती-पायी बेड्या
फ़ोक फ़टके फ़ोडी नाड्या
अवयव ते सारे सुजले
रक्त-व्रणांनी शरीर सजले
देह पिंजला वेदनांनी
धीर खचला यातनांनी
मांडीची ती उशी मिळावी
तात तुमची कुशी मिळावी...
तात तुमची कुशी मिळावी...
======================
सारंग भणगे. (२२ औगस्ट २००९)
No comments:
Post a Comment