-------------------------
रस्त्यावरचा कर्कश्श हॉर्न
कर्णबधिर करतानाच...
तुझ्यामागे फ़िरताना,
किती जणांचे कान बधिर केले..ते स्मरले,
आणि तो कर्णबधिर ध्वनि
तुला कर्णमधुर वाटायचा,
आणि तो ऐकण्यासाठी तु अधिर असायचीस,
असं; तुझ्या लडिवाळ लाघवी शब्दात..
तु सांगितल्याचं आठवलं.
त्या धुरात माखलेल्या चौकात..
तुझ्या बरोबर खाल्लेल्या पाणीपुरीचा स्वाद,
जीभेच्या सा-या संवेदनांना जागवीत,
तुझ्या स्वादिष्ट स्मृतींना संजीवन करून गेला,
अन् त्या स्मृतींच्या आस्वादात न्हाऊन निघालेल्या मनातुन,
एक घामाचा ओघळ..
तापलेल्या कानशीलाच्या मागुन निथळुन गेला.
आणि..
कुणीतरी..
कानशीलात वाजवावे..
असा एक कर्णकर्कश्श आवाज..
शेवटचाच..
काळजावर धुरकट ओरखडा ओढत..
डोळ्यातील आसवांच्या पिशवीला,
एक पाशवी टाचणी टोचत..
निघुन गेला...
तुझ्याबरोबर..
आणि तुझ्याबरोबरच्या त्या आठवणीं बरोबरच..
त्या जीवघेण्या अपघाताच्या..
स्मृतींना जीवंत करीत..
तुझा जीव एकदाच घेऊन गेला..
मला मागे जीवंत सोडुन..
रोजच माझा जीव घेण्यासाठी,
त्या जीवघेण्या..
आठवणींबरोबर जगण्यासाठी..
रोज एक..
जीवंत मरण..
=================
सारंग भणगे. (16 ऑगस्ट 2009)
No comments:
Post a Comment