Thursday, April 22, 2010

ठेविले अनंते तैसेचि रहावे!

ठेविले अनंते तैसेचि रहावे?
उगा वाटेल ते का सहावे?
मरत मरत असे का जगावे?
पाणी वाहील तसे का वहावे?

भोगांचे दु:ख मना न लावावे;
कर्तृत्वाने परि स्थितीशी लढावे,
कधी कधी जरी हरून जावे,
हरण्याआधि दोन हात करावे.

अकर्मण्य होऊन रहावे,
त्यापरि मृत्युसि आवळावे,
खाटल्यावर बसून मागावे,
त्यापरि कर्माचे फळ मिळावे.

साचुन पाण्याचे डबके व्हावे,
कि वाहुन निर्मळ पाणी व्हावे,
उरी घेऊनी खारटपणा,
सागरापरी खळाळत रहावे.

ठेविले अनंते तैसेचि रहावे!
=============
सारंग भणगे. (२२ एप्रिल २०१०)

Wednesday, April 21, 2010

आनंद

दु:खाच्या डोहात; आनंदाचं पाणी,
आर्त आलापीतुन; स्वच्छंदी गाणी.

फाटक्या वस्त्राला; निर्मळ अस्तर,
हरलेल्या प्रश्नाला; उत्साही उत्तर.

भग्न पत्थरात कोरले लेणे,
काळ्या रात्रीवर हास्याचे चांदणे.

तो वीर भेटे; मृत्युस हसूनी,
शब्द 'अक्षर' झाले; आनंदवनभुवनी.
===============
सारंग भणगे. (२७ मार्च २००९)

Sunday, April 18, 2010

चित्कार माझा

तीने आज केला बलात्कार माझा
रसिकांस वाटे तो चमत्कार माझा

घेती पिऊनी अमृताचे ते प्याले
कळेना कुणाला तो फुत्कार माझा

उडाल्या कितीदा चिंधड्या मनाच्या
हे वेडे करती उगा सत्कार माझा

मी भ्यायलो नि टाकला चाप आहे
कौरवांस वाटे हा टणत्कार माझा

उगा नावता का डोई धरूनी
सन्मानिला का हो चित्कार माझा.
================
सारंग भणगे. (२४ जानेवारी २०१०)

Sunday, April 11, 2010

अहं ब्रह्मास्मि

त्यांच्या स्मरणार्थ माझिही काव्यांजली.

आज पहाटे कडाडली ती
नाही झाला तरी आवाज,
आणि नभाच्या निळ्या अंगणी
शांत उमटला शब्दब्रह्मसाज.

घनमेघांनी नभगर्द होई
शब्दसरींनी भिजलो आपण,
अता ग्रीष्माने भाजुन जाऊ
स्वर्गी गेला नि:शब्द श्रावण.

क्षितीजावरती शब्दब्रह्म ते
प्रतिभेचा जणु प्रतिभास्कर तो,
शब्दबाण ते नभी सोडुनी
काव्यधनुचे रंग चितारतो.

अता उरली माती केवळ
शुष्क नद्या नि फुटके ढेकुळ
बाभूळकाटे सुकली झाडे
ब्रह्म लोपले; धरती व्याकुळ.......धरती व्याकुळ!
====================
सारंग भणगे. (११ एप्रिल २०१०)

Sunday, April 4, 2010

हाय कृष्णा ये रे जन्मा!

हे इंद्र सारे झाले कुबेर,
लंकेत त्यांच्या शवांचे ढेर.

म्हणावयाला जनतेचे गुरखे,
खलनायकाला नायकाचे बुरखे.

रोज लुटताती जबरीच हुंडे,
पोसावयाला नरकाची तोंडे.

फुटली पोटे तरिही खाती,
अगणित धनाची अनंत खाती.

भूक अशी कि वडवानल जैसा,
पचनास्तवही खाती पैसा.

ऊस संपला उरला चोथा,
तो ही सुटेना लाविती ओठा.

लोणी खाती टाळुवरचे,
प्रेताच्या त्या साळसूद ते.

भाजत पोळी सरणावरती,
सौदे ठरती मरणावरती.

प्रेत जळाले उरली माती,
भूक अशी कि त्यासही खाती.

सुटली नाही जीती माणसे,
त्यासही खुडती जैसी कणसे.

असे अमुच्या का रे कर्मा,
हाय कृष्णा ये रे जन्मा!
============
सारंग भणगे. (डिसेंबर २००९)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...