हे इंद्र सारे झाले कुबेर,
लंकेत त्यांच्या शवांचे ढेर.
म्हणावयाला जनतेचे गुरखे,
खलनायकाला नायकाचे बुरखे.
रोज लुटताती जबरीच हुंडे,
पोसावयाला नरकाची तोंडे.
फुटली पोटे तरिही खाती,
अगणित धनाची अनंत खाती.
भूक अशी कि वडवानल जैसा,
पचनास्तवही खाती पैसा.
ऊस संपला उरला चोथा,
तो ही सुटेना लाविती ओठा.
लोणी खाती टाळुवरचे,
प्रेताच्या त्या साळसूद ते.
भाजत पोळी सरणावरती,
सौदे ठरती मरणावरती.
प्रेत जळाले उरली माती,
भूक अशी कि त्यासही खाती.
सुटली नाही जीती माणसे,
त्यासही खुडती जैसी कणसे.
असे अमुच्या का रे कर्मा,
हाय कृष्णा ये रे जन्मा!
============
सारंग भणगे. (डिसेंबर २००९)
No comments:
Post a Comment