Tuesday, September 28, 2010

मोरोपंतांची "केकावली"

'सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.
सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो,
वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो.'

लहानपणी शाळेत शिकवलेला एक श्लोक एवढंच त्याचं जीवनात स्थान होतं. पण पुढे कधी तो वाचनात येऊन त्याछ्या अर्थानं, त्याच्या माधुर्यानं अपाण भारावून जाऊ असे खचित वाटलेही नव्हते. पण मोरोपंतांच्या या केकेशी आता चांगलाच परिचय झाला आहे.

या आणि अशाच १२१ सुरस केकांचे 'केकावली' हे प्राकृत भाषेतील अत्यंत प्रसिद्ध काव्य आहे. प्राकृत भाषेला मिळालेली ती एक देणगीच आहे.

'व्यासांनंतर सत्प्रमेय रचनाचातुर्य ज्या लाभले' असे ज्यांचे वर्णन केले जाते अशा महाकवि मोरोपंतारचनाही रचना.

काव्याच्या नावातूनच कविच्या महानतेची जाणीव होते. "संसारातील तापत्रयाने पीडित होणा-या मयूराने 'दयामृतघना'च्या वृष्टीसाठी टाहो फोडला. हा टाहो म्हणजे 'केका', व त्यांची ही आवली (अर्थात माला किंवा माळ), अशी ही केकावली".

पण खरेतर, "श्रेष्ठ भगवद्भक्त कवीने स्वोद्धारासाठी आर्त मनाने केलेला धावा" हेच केकावलीचे खरे स्वरूप वर्णन होय. हे काव्य म्हणजे मोरोपंतांचे ह्रद्गतच आहे. म्हणूनच त्याला पंतांच्या काव्यात सर्वोच्च स्थान प्राप्त झाले.

ज्या भवनावेगात ज्ञानदेवांनी भावार्थदीपिका लिहीली, ज्या भक्तीरसाने ओथंबून तुकोबांना गाथा स्फुरली, ज्या उत्कटतेने गदिमांनी श्रीरामचरित्र गीतातून उतरवले, त्याचप्रमाणे प्रभुप्रसादाच्या अत्युत्कट आतुरतेने मोरोपंतांच्या मुखातून केकागंगा स्त्रवली. त्यामुळे केकावली वाचताना ह्रदयांत आनंदाच्या लाटा उत्पन्न होतात.

'दयामृतघना, अहो हरि! वळा मयूराकडे' अशी मोराच्या मुखातून बोलणा-या कविची आर्थ हाक म्हणजे केकावली', हा अर्थ कोणासही आकर्षित करणारा आहे.

'सदाश्रितपदा सदाशिवमनोविनोदस्पदा' या चरणानं केकावलीची सुरूवात होते. हे वाचून कदाचित असं वाटण्याचा संभव आहे कि, केकावली भयंकर क्लिष्ट आहे की काय? पण तसे नाही. पंतांचे काव्य हे प्रसाद गुणाने युक्त म्हणहे सुगम अर्थाचे आहे. पण पंतांचा संस्कृत ग्रंथांचा प्रचंड अभ्यास असल्याने त्यांच्या काव्यात संस्कृतशब्दप्राचुर्य दिसते. सामान्यजनांना जरी केकावली थोडी क्लिष्ट वाटली तरी पंतकाव्याचा थोडा परिचय झाला कि ती सोपी वाटू लागते.

पण पंत भाषेच्या शुद्धिबाबत अत्यंत जागरुक होते. वाटेल ती रुपे घालने त्यांना पसंद नव्हते. भाषाशुद्धिबाबत मराठी माणूस पंतांचा निश्चितच ऋणी आहे.

'न जे प्रिय सदोष ते, प्रिय सदोषहि चांगले.
स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दमी रांगले.'

इथे स्वतोक म्हणजे स्वतःचा मुलगा व कर्दमी म्हणजे चिखल हे शब्द अगदि चपखल वापरले आहेत.

पंतांचे आणखि एक वैशिष्ट्य म्हणजे पंतांचा कल्पनाविहार. मोरोपंतांच्या पूर्वी हजारो प्राचीन कवींनी परमेश्वराची शेकडो स्तोत्रे केली. त्यांतही शंकराचार्यांसारख्यांचे ईश्वरकाव्य हे अतिशय उद्बोधक, भक्तिरसपुर्ण आणि ह्रदयंगम आहे. परंतु मोरोपंतांचे कल्पनाचातुर्य हे सर्वांपेक्षाहि लोकोत्तर वाटते. पंतांचं कल्पनाचातुर्य पाहून मी तर दिग्मूढ झालो. काव्याला फक्त भावना लागतात असं मानणारा मी, भावनेच्या अन्नाबरोबरच काव्याला कल्पकतेचे वस्त्र व शब्दांचा निवाराही लागतो असे मानू लागलो. पंतांची एक उपमा इथे मला सांगाविशी वाटते.
=============

मला तू खूप काही दिलेस. पण तरी एक स्वोद्धाराची कमी ठेवलीसच आणि ही कमी भरून काढने किती आवश्यक आहे ते सांगण्यासाठी लिहीतात -

"अलंकृतिमती सती मनि झुरे! न जो संगती"

म्हणजे श्रृंगार केलेली पतिव्रता जर पति समागम झाला नाही तर मनात झुरत असते.

एके ठिकाणी भगवंताबद्दल सुंदर कल्पना रुपक अलंकाराच्या उपयोगाने केली आहे.

"कवीश्वरमनः पयोनिधीसुतास्तुतीच्या पते"

म्हणजे कवींचे मन हाच जणू क्षीरसमुद्र आणि त्याची मुलगी म्हणजे स्तुती हीच सागरकन्या लक्ष्मीदेवी व तीचे स्वामी म्हणजे तू. स्तुती कविंच्या मनातून उद्भवते व लक्ष्मी ही सागरकन्या होय. हा कल्पनाविलास मोठा मनोरम आहे.

आणखि एका ठिकाणी पंत ईश्वराला या भवमहानदीतून पार ने असे म्हणतात. पण त्यासाठी नाविकाला म्हणजेच ईश्वराला द्यावे लागणारे भाडे, मलाच साधुजनांना विकून वसूल कर, असा चमत्कृतीपूर्ण व कल्पनाचातुर्याने ओतप्रोत असा युक्तीवाद दिसतो. पंतांचा युक्तीवाद अनेकदा निरुत्तर करणारा असतो. केकावली हे काव्य म्हणजे स्वोद्धारार्थ केलेल्या युक्तीवादांची मालिकाच आहे. पंत देवाविरुद्ध दावा लावून केस स्वतःच लडवत आहेत व ह्या युक्तीवादात अनेक पौराणिक कथांचे आधार घेतात व या कथांचा केस लॉ सारखा उपयोग करतात.

पंत गजेंद्र, द्रौपदी व अर्जुन यांची उदाहरणे देतात व म्हणतात "ईश्वरा, तु त्याच्या मदतीस धावलास मग माझाही उद्धार कर. तुम्ही कंसाच्या दासीकरता आपले ऐश्वर्य व सुख सोडून हवी तसली नीचकर्मे करायला धावता; तुम्ही सीतेच्या वेड्या हट्टापायी मूढपणे धावलात, असे ठणकावून विचारून मग माझी ईच्छापूर्ती अंधवृत्तीने का नाही करत? असा सवाल टाकतात.

जेव्हा भगवंत म्हणतात कि इतके दिवस तुला भौतीक गोष्टीतून माझी आठवण का नाही झाली? तेव्हा पंत म्हणतात कि तुझी माता यशोदामाई तुला मांडीवरून खाली ठेऊन दूध उतरवायला धावलीच होती ना! पंतांची ही खुबी मोठी मनोरंजक आहे.

'समुद्धरसि एकटा जरि जडासि या कर्दमी'.

या केकेमध्ये पावसाने झालेल्या कर्दमातून गोवर्धनगिरी उचललास तसेच मलाही कामक्रोधादि वासनांच्या कर्दमातून उचल. एकिकडे पार्थिव कर्दम तर दुसरीकडे अध्यात्मिक कर्दम, असा सुंदर श्लेष इथे साधला आहे.

आणखि एका केकेत पंत म्हणतात -

'कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली'.

अर्थात, यमराज्याच्या सैन्याचे पांढरे निशानच जणू असे हे म्हातारपण दिसू लागले आहे. साधे म्हातारपण आले असे सांगताना किती कल्पकतेने लिहीले आहे.

पुढे लगेच पंत लिहीतात -

'पुरःसरगदांसवे झगडतां तनू भागली'.

पुढे चाल करून येणा-या रोगांबरोबर झगडून माझे शरीर थकू लागले आहे. अत्यंत सुंदर व कल्पनातीत, पण तरिहि अत्यंत समर्पक असे सर्वश्लोकव्यापी रूपक वापरले आहे.

अशा प्रकारे पंतांचे काव्य रुपक, दृष्टांत, उपमा, विरोधाभास, विशेषोक्ति, अर्थान्तरन्यास आदि अनेक अलंकारांनी सजलेले आहेत.

पंतांची एक सुंदर केका इथे सांगावी वाटते. गंगेचे वर्ण करताना पंत लिहीतात -

'जिच्या जळमळे तुळे न शरदिंदुचे चांदणे'.

जीच्या पाण्यावरील फेसाशी शरदाच्या चांदण्याची देखिल तुलना होऊ शकत नाही.

गंगा यमुनेपेक्षा श्रेष्ठ हे सांगताना पंत लिहीतात -

जशि सुधा तशि न काकवी.

पंतांची शब्दरचना व त्यातील यमक, अनुप्रास, श्लेष आदिंचा उपयोग हे ही अतिशय माधुर्यपूर्ण आहे.

विमुक्तिबहुसाधने तदितरे गणिनाच तो,
सजूनि वरवल्ल्की तव सभांगणि नाचतो.

येथे शब्दांची मधुर रचन दिसते. तसेच पाच अक्षरी यमक अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण, अर्थपूर्ण वाटतो. वरवल्लकी असे नारदाच्या वीणेला संबोधून काव्यसौंदर्य वृद्धिंगत केले आहे.

'दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे'.

म्हणजे दयारूपी अमृताने जिचे ह्रदय भरलेले आहे अशी ती आई, कुळाला काजळाप्रमाने कलंक असणा-या मुलाला कंटाळत नाही.

अशा अवघड रचनांबरोबरच 'पिता जरी विटे, विटो, न जननी कुपुत्री विटे' व म्हणून 'म्हणति भले न रिण जन्मदेचे फिटे', अशा सोप्या पण अर्थपूर्ण रचनाही पंतांनी केल्या आहेत.

यमक हा तर पंतांना 'करतलामलकवत', म्हणजे हाताच्या मळासारखा होता. तो कुठेही ओढून ताणून न बसवता, अर्थगम्य व काव्यभाव जपणारा असाच आहे. याचे सुंदर उदाहरण म्हणजे,

'अगा प्रणतवत्सला! म्हणसि त्या जनां पावलां,
म्हणोन तुमच्याच मी स्मरतसे सदा पावलां'.

एकाच शब्दाचा दोन वेगळ्या अर्थांनी दोन चरणात उपयोग करून सुंदर यमक साधला आहे.

शिवाय -

'सदैव अपराध हे रचितसे कोटि, गा!
स्वयेंहि कथितो, न तिळहि लाज, मी कोटिगा!'.

यात पहिला कोटि ही एक संख्या व गा हे संबोधन आहे. तर दुसरा कोटिगा म्हणजे कोडगा.

यमकाबरोबरच अनुप्रास हे ही केकावलीचे वैशिष्ट्य आहे.

एका केकेत मुर राक्षसाचा नाश करणारा म्हणून मुरांतक व त्रिपुरांचा अन्तक शंकर तो पुरांतक असा सुंदर अनुप्रास आहे.

शिवाय, 'सदाश्रितपदा सदाशिव मनोविनोदास्पदा' यात स, द, र या अक्षरांवर सुंदर अनुप्रास आहे.

'कृतांत शिवला नसे, तंव दिसे, बरे पावणे'.

अर्थात, जोवर अटळ मृत्यु गाठत नाही तोवरच हे ईश्वरा, तु पावलेला बरा.

अशी स्वोद्धाराची याचना करणारे पंत, शंकराने वृकासुराला दिलेल्या वराने तुम्ही स्वतःवरच संकट ओढवून घेतले; असा ईश्वराचा उपहासही करतात.

अर्थात, ईश्वराची प्रशंसा करताना ते थकत नाहीत. ईश्वराला उद्देशून त्यांनी वापरलेली काही संबोधने खरोखरच विलक्षण आणि विलोभनीय आहेत. काही उदाहरणे पाहु:

'जगन्नायका, जगज्जनका,दयमृतघना, प्रणतवत्सला, सुदुस्तरविपन्नदीसेतुला (तरून जाण्यास अत्यंत कठिण अशी जी अनर्थांची नदी, तीच्यावरील सेतु), सदाश्रितपदा, भवपयोधिच्या पारदा (संसार समुद्रातुन तारून नेणा-या)' ई.

अशी संबोधने वापरून म्हणतात, तुझ्यासारख्या उत्तम सुकाणुधराशिवाय आमची जीवननौका 'भवोदधितटि' कशी लागणार!

भक्त प्रल्हादाविषयी पंतांनी लिहीलेल्या काही पङ्क्ति अतिशय साध्या पण परिणामकारक आहेत.

"किती वय? कसे तप प्रखर? काय विश्वास तो
ध्रुव ध्रुव खरा, स्तवा उचित होय विश्वास तो".

अशांच पंतांच्या काही विस्मयकारक ओळी पाहुया -

"मुखी हरी वसो तुझि कुशलधाम नामावली
क्षणांत पुरवील जी सकळ कामना मावली'.

पंतांचे मन संतांप्रमाणे भगवद्भक्तीमध्ये रममाण होणारे होते. 'मनभवच्चरितत्री जडो' असे म्हणणारे पंत पुढे म्हणतात,

"न निश्चय कधी ढळो, कुजनविघ्नबाधा टळो,
न चित्त भजनी चळो, मति सदुक्तमार्गी वळो.
स्वतत्व ह्रदया कळो. दुरभिमान सारा गळो,
पुन्हा न हे मन मळो, दुरित आत्मबोधे जळो".

ओळींमधला अर्थ तर स्पष्टच आहे. स्वतःसाठी पुनःपुन्हा ईश्वराची आळवणी करणारे पंत ईश्वराकडे सकलजनांना सद्बुद्धि देण्याविषयी प्रार्थना करतात. अति भावनावेगाचे प्रासादिक प्रत्यंतर म्हणजे पंतांचे केकावलीतील शेवटचे श्लोक. हे श्लोक म्हणजे पंतांच्या प्रतिभेचा कळस आहेत.

पंतांनी भगवत्पदापासून केकावलीस प्रारंभ करून, ते सत्संगावर येऊन ठेपले. म्हणजे भगवत्पदप्राप्ति हे साध्य व सत्संग हे साधन होय, असाच यातुन अर्थ निघतो.

'सदाश्रितपदा' ने सुरू होणारे आणि

"सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो".

या ओळींनी सांगता करणारे केकावली हे काव्य ज्ञानदेवांच्या 'ओम नमोजी आद्या' ते 'जे खळांची व्यंकटी सांडो' या भावार्थदीपिकेप्रमानेच भावभक्तिपुर्ण असे काव्य आहे.

केकावलीचा आस्वाद कविप्रेमींनी आयुष्यात नक्किच घ्यावा अशी मनोमन ईच्छा!

6 comments:

PRAGI said...

मोरोपंतांची केकावली म्हणजी गेयातेचा नजराणा आहे. मुल १०८ कडवी आहेत. दुर्दैवाने ती सगळी कुठे सापडत नाहीत. तुम्हाला माहित असल्यास कृपया इथे प्रसिद्ध करावीत.

Maitrayan said...

चिरंजीव सागर ,
तुझा ब्लोग न्याहाळा अतिशय प्रासादिक भाषत तू लिहितोस ,भाषा नुसती प्रसादिकच नव्हे तर अभ्यास पूर्णही आहे. तुझे लेखन मनाला दिलासा देते कि मे मराठीचे सुपुत्र तिचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करताहेत, मोरोपंतांची केकावली ह्या विषय वरचा तुझा लेख आवडला ,सरळ सोप्या भाषेत तू जे निरुपण करतो त्यातला हरदासी बाज मनाला लोभवतो. अतिशय रसाळ आणि द्वैदिप्यमान अश्या शब्द रत्नांची तुशी उधळण ह्या लेखात तू केली आहेस ,तुझ्या ब्लोगचे वाचन करताना शब्द उमटतात "सुसंगती सदा घडो सागर वाक्य कानी पडो .
तुला आणि तुझ्या लेखनाला अनेक शुभार्शिर्वाद ।
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Maitrayan said...

http://mitrancheramayan.blogspot.in/2014/11/blog-post_8.html

Unknown said...

सुरेख..

Unknown said...

सुरेख

Dr. Dakshayani Pandit said...

सारंग, लेख खूप सुंदर आहे.भाषालाघव अप्रतिम. मीही मोरोपंतांची भक्त आहे. पण त्यांची पुस्तके उपलब्ध होत नाहीत.मला त्यांची जवळजवळ सर्व पुस्तके घ्यायची आहेत. तुला काही कल्पना असल्यास कृपया सामायिक करशील का?-
डॉ. दाक्षायणी पंडित

Related Posts Plugin for WordPress, Blogger...