Monday, October 31, 2011

म. 'कवन'

म. क. तपोवन,
म. क. हे जीवन,
म. क. हा श्रावण,
कवितांचा II१II

म. क. वृंदावन,
म. क. नंदनवन,
म. क. मधुबन,
काव्य गुंजे II२II

म. क. उपवन,
इथला पवन,
पुनीत पावन,
काव्यरूपी II४II

म. क. चे भवन,
आहे हो हेवन,
होतसे हवन,
कवितांचे.

म. क. ऐसे वन,
आहे 'नंबर वन',
लिहिती कवनं,
म. क. वासी II५II
==============
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Sunday, October 30, 2011

सख्या-'हरी' सारंग

उगा कशाला वादळाची तमा करावी,
नराधमाला माणसाने क्षमा करावी.

असंख्य जगती जीव ज्यांना कुणी न वाली,
मृतात त्यांची 'जन्म-नावे' जमा करावी.

चिराग सारे तेवणारे विझून जावो,
हरेक ठिणगी पोळणारी शमा करावी.

दिसेल जे ते घ्यावयाची कशास ईच्छा,
खिशात आहे काय खातरजमा करावी.

सख्या-'हरी' सारंग पोरींवरी मिटावा,
सुरेख वामा वाटते की 'रमा' करावी.
=========================
सारंग भणगे. (३० ऑक्टोबर २०११)

म. क. एक गाव

म. क. असा गाव,
जिथे बंधुभाव,
रंक नाही राव,
सारे कवी II१II

तिला नाही वेस,
कुठला ना देश,
नाही लवलेश,
भेदाचा हो II२II

खळाळे सरिता,
'जीवन' कविता,
नीर तिचे पिता,
काव्य स्फुरती II३II

असा गावकूस,
पिके काव्य ऊस,
नित्याची उरूस,
कवितांचा II४II

म. क. ची चावडी,
सा-यांना आवडी,
काव्याच्या कावडी,
सारे वाही II५II

इथे सावकारी,
सारे गावकरी,
आनंदाने करी,
कवितांची II६II

गावचा बाजार,
भरे वारंवार,
चालतो व्यवहार,
कवितांचा II७II

म. क. जैसा वाव,
म. क. जैसे नाव,
म. क. जैसे गाव,
अन्य नाही II८II
==========
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Wednesday, October 26, 2011

म. क. मय

म. क. माझी माय,
दुधावरची साय,
वासिष्ठांची गाय,
कामधेनू.

म. क. चा महिमा,
म. क. हि गदिमा,
म. क. ची प्रतिमा,
सरस्वती.

म. क. ची करणी,
म. क. ही धरणी,
म. क. च्या चरणी,
शीर माझे.

म. क. ध्यानीमनी,
म. क. त्रिभुवनी,
म. क. च्या गगनी,
काव्यपक्षी.

म. क. आळवितो,
म. क. चाळवितो,
म. क. ओवाळीतो,
मनोभावे.

म. क. तपोवन,
म. क. हि पावन,
तन मन धन,
सर्व म. क.

म. क. गोड गूळ,
म. क. हे राऊळ,
तिची पायधूळ,
स्वर्ग माझा.

म. क. हि तुळस,
म. क. हा पळस,
म. क. चि कळस,
देवळाचा.

म. क. माझे सुख,
म. क. माझे दु:ख,
म. क. माझी भूक,
भावनांची.

म. क. हे गोकूळ,
म. क. माझे खूळ,
आहे मी व्याकूळ,
म. क. साठी.

म. क. काव्यामृत,
म. क. नवनीत,
म. क. हे संगीत,
गंधर्वांचे.

म. क. माझा राम,
म. क. आत्माराम,
म. क. मुक्तीधाम,
वैकुंठचि.
================
सारंग भणगे. (२६ ऑक्टोबर २०११)

Tuesday, October 25, 2011

ये बिनधास्त

सताड दारे उघडी माझी ये बिनधास्त,
मला न भिंती वा ना भीती ये बिनधास्त.

मिजास मोठी वा-याला या वादळ होइ,
चहा पिलेल्या पेल्या काठी ये बिनधास्त.

कधी न माझी होणारी तू दूर किती ग,
उरास फाडत माझ्यापाशी ये बिनधास्त.

अजात जो तो पोथीमध्ये का गवसेल?
'भृगू' नको त्याला सांगा की ये बिनधास्त.

फुले करी सारंगाला माया भलतीच,
किती लुटोनी त्याला म्हणती ये बिनधास्त.
=============================
सारंग भणगे. (२४ ऑक्टोबर २०११)

Saturday, October 22, 2011

तुझी याद आली

निजानीज झाली तुझी याद आली,
प्रभाती नि राती तुझी याद आली.

मनाची धरा ही भिजे आसवांनी,
हसावे म्हणोनी तुझी याद आली.

तुझे हासणे ते गुलाबी गुलाबी,
गुलाबा बघुनी तुझी याद आली.

जरी दूर जाती सकाळी सकाळी,
पुन्हा सांजवेळी तुझी याद आली.

नव्याने जुन्याची जशी भेट घ्यावी,
नव्याने जुनी ती तुझी याद आली.
========================
सारंग भणगे. (२० ऑक्टोबर २०११)

जखमा कधी सुगंधी

निजानीज झाली तुझी याद आली,
प्रभाती नि राती तुझी याद आली.

मनाची धरा ही भिजे आसवांनी,
हसावे म्हणोनी तुझी याद आली.

तुझे हासणे ते गुलाबी गुलाबी,
गुलाबा बघूनी तुझी याद आली.

जरी दूर जाती सकाळी सकाळी,
पुन्हा सांजवेळी तुझी याद आली.

नव्याने जुन्याची जशी भेट घ्यावी,
नव्याने जुनी ती तुझी याद आली.
========================
सारंग भणगे. (२० ऑक्टोबर २०११)

Sunday, October 16, 2011

मागणे न काही

टाकले ठरवून मी मागणे न काही,
जे हवे मिळवायचे मागणे न काही.

वादळा घर मोडले फाटके जरी ते,
ध्वस्त अस्थी जरी तरी मागणे न काही.

खेळते नियती जरी आज वेळ तीची,
मुक्त मी अपरास्त मी मागणे न काही.

पार मी बरबाद झालो; भणंग झालो,
सोडल्या मग वासना मागणे न काही.

धूळ मी तव पावलांची विठू दयाळा,
माउली मिळता दुजे मागणे न काही.

राहतो कुसुमात सारंग दंगलेला,
एकीच्या शिखरावरी मागणे न काही.
==================================
सारंग भणगे. (१४ ऑक्टोबर २०११)

मागणे न काही

टाकले ठरवुनी मागणे न काही,
आता फक्त मिळवायचे मागणे न काही.

वादळाने मोडला संसार माझा फाटका,
ध्वस्त अस्थी जरी तरी मागणे न काही.

आज धुंदी उन्माद आहे नीयतीला,
दिग्विजयी अपरास्त मी मग मागणे न काही.

आज पुरता भग्न झालो; नग्न झालो,
भणंग माझ्या वासना या मागणे न काही.

होऊ दे रे धूळ मजला विठू तुझ्या पावलांची,
त्रैलोक्य मिळता पामराचे मागणे न काही.

सारंग मी पद्मकोशी रोज माझा विलास चाले,
सायुज्यतेच्या शिखरावरती मागणे न काही.
==================================
सारंग भणगे. (१४ ऑक्टोबर २०११)

Thursday, October 13, 2011

तुला बघूनी

आल्या भरून माझ्या जखमा तुला बघूनी,
गेलो मरून आहे सखये तुला बघूनी.

पाण्यात पाहताना तुझिया स्मृती उठाव्या,
आले भरून डोळे सजणी तुला बघूनी.

शेपूट हालवीतो जणु श्वान मी भुकेला,
दारात थांबलेला तुझिया तुला बघूनी.

तू तारका; तशी तू तितली तरंगणारी,
तारांगणात तारे तुटती तुला बघूनी.

रानावनात मैने फिरते; जरा जपूनी,
पाणी जनावरांच्या वदनी तुला बघूनी.

सारंग-संगतीला सुमने सुखावणारी,
जोगी जरी जहाले; जगती तुला बघूनी.
===========================
सारंग भणगे. (१३ ऑक्टोबर २०११)

Monday, October 10, 2011

चुरगळलेला कागद

एक कागद रस्त्यावरती पडला होता चुरगळलेला,
एक अश्रू डोळ्यामध्ये त्यास फेकूनी विरघळलेला.

मजकूर असावा काय कळेना चिठ्ठीवरती उतरवलेला,
प्रेमपत्र ते असेल का कि हिशेब असावा मरगळलेला.

घड्याघड्यांचा कागद भासे मेंदू जणू सुरकुतलेला,
रेघा रेघांवरती त्याच्या कि कुणाचा ऊर गळलेला.

नवकांतेचा भांग जणु तो निर्दय हाती विस्कटलेला,
लाजेवरती धरलेला; कोमल हात जणु मुरगळलेला.

जखमा होत्या लाही होती शब्द शब्द नि खरचटलेला,
पेनामधुनि झिरपत आला रुमाल ओला पिरगळलेला.

भयाण होते वादळ आणि पारा होता विरघळलेला,
बोळा साऱ्या आयुष्याचा कागद झाला चुरगळलेला.
====================================
सारंग भणगे. (१० ऑक्टोबर २०११)

Saturday, October 8, 2011

आई

नेत्रांच्या या नीरांजनांनी
पूजितो मी तुला,
हृदयाच्या या पंखासावे
शोधितो मी तुला.

साऱ्या गगन मंडली
पहिले मी तुला,
तप्तरसांनी पोळून निघालो
शोधात असता तुला.
पण त्या रेशमी रश्मीचा
स्पर्श ना जाहला II १ II

भ्रमर करुनी आता श्रमलो
कुठे शोधू तुला?
मूकपणे बस वाहतो भावे
अश्रूंच्या या मला.
विरहाग्निच्या भडकल्या आता
अस्वस्थ या ज्वाला II २ II

कुठे आहे हक ती कोमल,
जीवन जेथे व्हावे निश्चल,
मोजावे जेथे अखेरचे पळ,
मुखी असावे नाम ते निर्मल,
"आई, आई, आई"
===================
सारंग भणगे. (१९८८-८९)

Sunday, October 2, 2011

शक्य असल्यास...

शक्य असल्यास,
ओठांआडचे शब्द
या कागदावर उमटू देत

शक्य असल्यास,
हृद्गत भावनांचे
या गीतात उतरू देत

शक्य असल्यास,
डोळ्यातील स्वप्ने
घडाळ्यात मावू देत

शक्य असल्यास,
हृदयातले अंगार
अश्रूत निवू देत

शक्य असल्यास,
ध्येयाचे पंख
नील नभात उडू देत

शक्य असल्यास,
शक्तीचे अश्व
जीवनपटावर उधळू देत

शक्य असल्यास,
कुजके मन
स्मशानात साडू देत

शक्य असल्यास,
आत्म्याच्या वाळवंटात
पाउस पडू देत.
================
सारंग भणगे. (१९९४-९५)

!!मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी!!

मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
करू सामना कसा बुडविणा-या 'खला'शी?

उगाच केली पुजा तयाची देव मानूनी,
करीन अजुनी; समरस होऊन चांभाराशी.

किती वाजवू घंटा तरीही बहिरा का हा?
किती प्रार्थना करू कळेना या दगडाशी!

भक्त कापती देवाला हो बकरे-बिकरे,
देवच उठला प्राणावरती; पाहू कुणासी?

असे वाटले तारा आहे ध्रूवाचा तो,
फुका धावलो; कसा घावलो मृगजळ'पाशी'.

उंच बनवले इमले त्याने; स्वप्ने दिधली,
अता तोडतो; कसा खेळतो हा पत्यांशी.

हाय करावे दैवा आता आर्जव कोठे?
ज्यास रुजविले तोच माळी खुडे फुलासी.

मधुर मार्दव पीयूष-अर्णव नितनित प्यालो,
पियुष नासूनी वीष जाहले अतिविनाशी.

डुंबत होतो दिली जेव्हा 'नाव' तयाने,
तोच खलाशी अम्हा बुडवितो अता बुडाशी.

लघु-गुरूचा मेळ शिकविला गुरुवर्याने,
'गुरु' जाहला 'लघु', कळेना हि मखलाशी.

सूर्यालाही शाप असा का अंधाराचा!
तमात आहे विरघळलेला 'सूर्य' तामसी.

हातावरच्या रेषांना त्या पुसू कसा मी?
'भूत' सोडूनी संग बांधूया अता उद्याशी.

संत सांगती महिमा विठ्ठल नामाचा हो!
नामाभवती जमले बडवे; मी उपाशी!!!

जुनीच आहे व्यथा माणसा अरे 'मराठी'!
खाली असतो ओढत वरच्या असा अधाशी.

मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
=========================
सारंग भणगे. (१ ऑक्टोबर २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...