Monday, October 10, 2011

चुरगळलेला कागद

एक कागद रस्त्यावरती पडला होता चुरगळलेला,
एक अश्रू डोळ्यामध्ये त्यास फेकूनी विरघळलेला.

मजकूर असावा काय कळेना चिठ्ठीवरती उतरवलेला,
प्रेमपत्र ते असेल का कि हिशेब असावा मरगळलेला.

घड्याघड्यांचा कागद भासे मेंदू जणू सुरकुतलेला,
रेघा रेघांवरती त्याच्या कि कुणाचा ऊर गळलेला.

नवकांतेचा भांग जणु तो निर्दय हाती विस्कटलेला,
लाजेवरती धरलेला; कोमल हात जणु मुरगळलेला.

जखमा होत्या लाही होती शब्द शब्द नि खरचटलेला,
पेनामधुनि झिरपत आला रुमाल ओला पिरगळलेला.

भयाण होते वादळ आणि पारा होता विरघळलेला,
बोळा साऱ्या आयुष्याचा कागद झाला चुरगळलेला.
====================================
सारंग भणगे. (१० ऑक्टोबर २०११)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...