मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
करू सामना कसा बुडविणा-या 'खला'शी?
उगाच केली पुजा तयाची देव मानूनी,
करीन अजुनी; समरस होऊन चांभाराशी.
किती वाजवू घंटा तरीही बहिरा का हा?
किती प्रार्थना करू कळेना या दगडाशी!
भक्त कापती देवाला हो बकरे-बिकरे,
देवच उठला प्राणावरती; पाहू कुणासी?
असे वाटले तारा आहे ध्रूवाचा तो,
फुका धावलो; कसा घावलो मृगजळ'पाशी'.
उंच बनवले इमले त्याने; स्वप्ने दिधली,
अता तोडतो; कसा खेळतो हा पत्यांशी.
हाय करावे दैवा आता आर्जव कोठे?
ज्यास रुजविले तोच माळी खुडे फुलासी.
मधुर मार्दव पीयूष-अर्णव नितनित प्यालो,
पियुष नासूनी वीष जाहले अतिविनाशी.
डुंबत होतो दिली जेव्हा 'नाव' तयाने,
तोच खलाशी अम्हा बुडवितो अता बुडाशी.
लघु-गुरूचा मेळ शिकविला गुरुवर्याने,
'गुरु' जाहला 'लघु', कळेना हि मखलाशी.
सूर्यालाही शाप असा का अंधाराचा!
तमात आहे विरघळलेला 'सूर्य' तामसी.
हातावरच्या रेषांना त्या पुसू कसा मी?
'भूत' सोडूनी संग बांधूया अता उद्याशी.
संत सांगती महिमा विठ्ठल नामाचा हो!
नामाभवती जमले बडवे; मी उपाशी!!!
जुनीच आहे व्यथा माणसा अरे 'मराठी'!
खाली असतो ओढत वरच्या असा अधाशी.
मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
मी रडलो होतो त्याच्यासाठी किती उशाशी,
=========================
सारंग भणगे. (१ ऑक्टोबर २०११)
No comments:
Post a Comment