आल्या भरून माझ्या जखमा तुला बघूनी,
गेलो मरून आहे सखये तुला बघूनी.
पाण्यात पाहताना तुझिया स्मृती उठाव्या,
आले भरून डोळे सजणी तुला बघूनी.
शेपूट हालवीतो जणु श्वान मी भुकेला,
दारात थांबलेला तुझिया तुला बघूनी.
तू तारका; तशी तू तितली तरंगणारी,
तारांगणात तारे तुटती तुला बघूनी.
रानावनात मैने फिरते; जरा जपूनी,
पाणी जनावरांच्या वदनी तुला बघूनी.
सारंग-संगतीला सुमने सुखावणारी,
जोगी जरी जहाले; जगती तुला बघूनी.
===========================
सारंग भणगे. (१३ ऑक्टोबर २०११)
No comments:
Post a Comment