Sunday, November 15, 2009

मेरा नाम जोकर

हसत हसत घाव
सहन करत गेलो
जगण्याचे सारे अर्थ
गहन करत गेलो

जगून शेवटी मरायचे
कुणी म्हणते उरायचे
कितीही उरले तरी
कुणाला का ते पुरायचे?

म्हणून मी रडलोच नाही
कधी जीवनात अडलोच नाही
पडलो तसा खुपदा तरी
म्हणत राहिलो, "पडलोच नाही".

एकदाच फ़क्त आकाश
खुप भरून आलं होतं
त्यातलं पावसाचं बळ.
सारं सरून गेलं होतं.

तेव्हाच; फ़क्त तेव्हाच रडलो
कोरडे अश्रु वहात राहिले
पुरात पोहताना मला पाहून
लोक हसत पहात राहिले.

सारंग भणगे. (१५ नोव्हेंबर २००९)

'माये'ची चूल

चुलीत लाकडं घालुन
केवढं बोलत राहिलीस
सा-या शेंगाची
टरफ़लं सोलत राहिलीस

जात्यावर दळताना
गळताना पाहिले पीठ
तुझ्या नशिबी भाजीला
कधीच नव्हते मीठ

लहान उखळीत मुसळ
नुसतं कांडत रहायचं
तुझं कुंकू भाळाशी
नुसतं भांडत रहायचं

तुळशीला घातलं पाणी
तुळस वाढलीच नाही
बाभळीच्या माजानं कळ
कधी काढलीच नाही

सारवून तुझे हात
किती भरून यायचे
वळांचे दुखणे कसे
आपसूक विरून जायचे

गोधडी शिवताना
दाभणाचं लागलं टोक
लपेटुन मायेत घेताना
दिसली होती खोक

आडाचं पाणी शेंदून
पाठ मोडून गेली
तळाशी ओळख तुझी
शेवटी जोडून गेली

एवढ्यातच एक तुळई
अचानकच तुटली
थंड विझलेली
चूल.......अखेर फ़ुटली.

सारंग भणगे. (१५ नोव्हेंबर २००९)

Friday, November 13, 2009

भार

ओढीत नांगराला ओकीत रक्त आहे,
तो फाटका भिकारी शेतात राबताहे.

घामात देव आहे मानून देवभोळा,
फोडीत ढेकळाला काळीज फाडताहे.

ते फाळ नांगराचे गेले झिजून वेडे,
आभाळ दीनवाणे दैन्यास पाहताहे.

गेली पिचून हाडे गेले पडून वाडे,
टाचून कापडाला टोचीत भाग्य आहे.

पोटात भूक वाढे खात्यात कर्ज वाढे,
दु:खास मुक्तहस्ते दुर्दैव वाटताहे.

पाने सुकून गेली फांदीस भार नाही,
त्या वाळक्या कुडीचा थोडाच भार आहे?

सारंग भणगे. (१२ नोव्हेंबर २००९)

Tuesday, November 10, 2009

आठवण...

आठवणींची मला
झाली आठवण
डोळ्यांनी केली
अश्रुंची पाठवण

सखे तुझी आठवण
कि नुसतेच वण
खरे सांगायचे तर
नुसतीच वणवण

कितीही भटकून
मनाशी फटकून
पुन्हा परतायचे
मनातच हटकून

आता आठवणी
अटूनच गेल्या
ओल्या रूमालात
भिजूनच गेल्या

तरीसुद्धा मी
त्यांनाच आठवतो
त्या विसरल्या तरी
मनात साठवतो

एकदाच यावी फक्त
त्यांनाही आठवण
कुणीतरी काढतो
त्यांचीही आठवण...

सारंग भणगे. (१० नोव्हेंबर २००९)

ईंद्रधनुषी मन माझे झनक झनक थरकते.

आकाशातुन घनमेघांचे अभ्र जसे सरकते,
ईंद्रधनुषी मन माझे झनक झनक थरकते.

लाजुनी धरती आनंदाने
कणाकणातुनी उमलते,
लतावेलींचे मंडप आणि
सलील वाहे विमल ते.
सरितेचेही काळीज हळवे घनथेंबांनी थिरकते,
ईंद्रधनुषी मन माझे झनक झनक थरकते.

डोंगर निळे रंग बदलुनी
हिरवे हिरवे आले खुलुनी,
पक्षिदार ती झाडे अवघी
पर्णभराने आली फुलुनी.
सृष्टी सारी वैभवोत्फुल्लीत अभिमानाने गुरकते,
ईंद्रधनुषी मन माझे झनक झनक थरकते.

निबीड अरण्ये गर्द जाहली
नदीनाल्यांची उरे वाहिली,
सागर उसळुन येई बापडा,
वसुधा चिंब चिंब नाहिली.
काम अपुले तडितादेवी निमिषातच उरकते,
ईंद्रधनुषी मन माझे झनक झनक थरकते.

सारंग भणगे. (१० नोव्हेंबर २००९)

Monday, November 9, 2009

शपथविधी

रोज ऊठते दंगल आणि पेटती अवघे रान;
थोबाडावर थुंकले आहे लोकशाहीचे पान.

रयेस लुटती बांडगुळ ते रक्षक जनतेचे;
मिळुनी खाती लाच-लचके दास सधनतेचे.

दारिद्र्याच्या श्रीमंतीने विकास बनतो आहे;
जातपातीचा विखार जहरी जनात भिनतो आहे.

वर्षाचे ते मांस-गोळे भीका मागताती;
खुलण्याआधी कळ्या कोवळ्या देह विकताती.

किडेमकोडे अवघी जनता देश कचराकुंडी;
लोकशाहीच्या थडग्यामध्ये भ्रष्टतेची अंडी.

शपथविधी अता जहाला झाले सारे मंत्री;
स्वातंत्र्याच्या बखरीमध्ये अराजकतेची जंत्री.

सारंग भणगे. (९ नोव्हेंबर २००९)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...