Saturday, May 15, 2010

शरपंजरी

निशब्द होती रात्र आणि गूढ होता वारा
कोलमडल्या शरीरास या शरांचा सहारा
नुरली आता क्षुधा कशाची कसली ना तृष्णा
प्राण होता थांबलेला पाहण्यास्तव कृष्णा.

जिंकले नाही कुणी रणी ना हरलेही कुणी
हारजीत ती मुळीच नसते; केवळ लढणे रणी
जया असतो उदय; असतो अस्तही निश्चित त्याला
ईच्छामरणाचे हे वीख हा भीष्मची केवळ प्याला

मज असेल अस्त तरी त्याला वराचा आहे शाप
शिवतील पिंडा काक तरीही चुके न जीवनताप
शरसंभारांनी मी निजविले शूर किती संगरी
शरीरभार टाकूनी निजलो हतबल शरपंजरी...
=======================
सारंग भणगे. (१५ मे २०१०)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...