झाला उजाड तो माळ; गेली गुरे परतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)
वीज आसमंती नाचे
दिस असे पावसाचे
वीज वाजे काळजात
जीव पडे काळजीत.
देव उगा ना कोपला; तेल नाही आरतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)
हीर गोल गेली खोल
झाली पाखरे अबोल
खाती पीकालाच शेते
खत माणसांची प्रेते.
डोळा कोरडा कोरडा येई ऊर भरतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)
पान पान ओरबाडी
तुटे जीवनाची नाडी
घेई जगण्याचे सोंग
साला जीवनाचा रोग.
शोधी गिधाडाच्या जाती कधी हाडे मरतीला,
भेग भेग भोगविते दु:ख-भोग धरतीला (२)
====================
सारंग भणगे. (४ मे २०१०)
No comments:
Post a Comment