एखाद्या आंधळ्यानं ताजमहालाचं वर्णन केलं किंवा
बहिऱ्यानं एखाद्या अवीट गळ्याच्या गायकाला दाद दिली, तर ते जितकं विसंगत वाटेल
तितकंच क्रांतिताई; अर्थात क्रांति साडेकर ह्यांच्या कवितांवर मी काही लिहिणे
विसंगत आहे, ही माझी भावना मला प्रारंभीच व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. परंतु
कितीही संकोच होत असला तरी भिकाऱ्याला पंचपक्वानांच्या पंगतीला बसायची मिळणारी
संधी दवडणे शक्य होत नाही, तशी क्रांतिताईच्या (मी तिला ह्या लेखात असेच संबोधणार
आहे!) कवितांची ही पंगत झोडण्याची संधी मी दवडणे अशक्यच होते.
सुरुवातीलाच एक छोटे स्पष्टीकरण – मी ह्या
लेखात क्रांतिताईच्या गझला विचारात घेतलेल्या नाहीत. तो प्रांत वेगळा आहे.
“स्वप्नवेड्या पापण्यांना
आसवांचा शाप का?
पुण्यवंतांच्या जगी या
पुण्य ठरते पाप का?
कोणते हे जीवघेणे दु:ख
गासी कोकिळे?
भासती भेसूर रडणे हे तुझे
आलाप का?”
वयाच्या कुमार वयात हे प्रश्न आपल्यापैकी
प्रत्येक संवेदनशील मनाला पडले असतील खचित, परंतु मनात उठलेला भावनेचा प्रत्येक
तरंग अचूक शब्दात अभिव्यक्त कितीजणांना आला आहे! पण प्रतिभेला वयाच्या मर्यादा
किंवा अटी नसतात; हे जणू काही सिद्ध करण्यासाठी क्रांतिताईने वयाच्या केवळ १४
वर्षी मनातील कोवळ्या भावनांचा अर्क शब्दात विलक्षण ताकदीन उतरवला कि कविवर्य कै.
सुरेश भट देखील आश्चर्यचकित झाले होते. ह्या ओळी क्रांतिताईच्या प्रतिभेची केवळ एक
चुणूक आहे हे त्यांनी जाणलं आणि तिला सतत लिहित राहण्याचा शुभाशीर्वाद; तसेच काव्यसाहित्याची
दीक्षा देखील तिला दिली.
सामान्यत: ‘पापण्यांना आसवांचा शाप का?’ असा
प्रश्न पडतो, परंतु क्रांतिताईने पापण्यांना ‘स्वप्नवेड्या’ अशी रास्त पुस्ती
जोडली आहे. ज्या वयात ह्या ओळींचा अविष्कार तिने घडविला आहे त्या वयात सहसा अनेक
उदात्त स्वप्नांच्या चमचमणाऱ्या ताऱ्यांनी मनाच तरूण आणि कोवळं नभांगण भरून (आणि
भारूनही) गेललं असतं, त्याचं दर्शन ह्या ‘स्वप्नवेड्या’ शब्दाच्या योजनेत दिसतंच,
पण त्याचबरोबर एखादी स्वप्नवेडी पापणी जेव्हा आसवांनी डबडबते तेव्हा त्यातून
वैफल्य आणि नैराश्याची भावना अधिक गहिरी होते. क्रांतिताईच्या कविता वाचत असताना
ओळीओळीत शब्दांची अर्थावर / आशयावर अशी अद्भुत पकड दिसून येते; जाणवत राहते आणि आपण
तिच्या प्रतिभाविष्काराने दिपून जात राहतो.
कवींना काव्यस्फुरण देणारी सर्वात विलोभनीय
घटना म्हणजे पाऊस. म्हणतात ना ‘जिथे हिरवळ आणि पाणी, तिथे सुचती गाणी’. पण ‘वर ढग
डवरले’ ह्या कवितेतून क्रांतिताई कवींना रमणीय वाटणाऱ्या त्याच पावसाचे
हृदयस्पर्शी वर्णन करताना कवितेच्या अखेरीस लिहिते –
“वर ढग डवरले
अन् फाटक्या झग्यातली
झिपरी पोर
ताडकन उठली,
वाऱ्यावर उडणारे कागद
गोळा करत
धावत सुटली
पोलिओनं लुळ्या झालेल्या
धाकल्या भावाला
पावसाच्या पाण्यात
सोडायला
छान छान होड्या करून
देण्यासाठी!”
ह्या शब्दातून मन:चक्षूंसमोर कवितेतलं ते दृश्य
जिवंत होतं आणि मन पोळतं. क्रांतिताईची कविता अशी सहज चटका लावून जाणारी आहे आणि
ह्याचा प्रत्यय पदोपदी येत राहतो.
“चरे काळजाला असे यातनांचे, जसा आरशातील पारा
उडे”
ही ओळ असो किंवा त्याच कवितेतली
“किती सोसण्याची आरास मांडू, किती भोग माळू फुलासारखे?”
असा हृदयाला हात घालणारा खडा सवाल असो, क्रांतिताईची
कविता वाचत असताना आपल्या नकळतच डोळ्यांच्या पात्रात अश्रूंचं पाणी तरारू लागतं. माणसाचं मानव्य हे कुणाचा एखादा अश्रू पुसण्यात आहे, पण कवीचं कवित्व हे कुणाच्या
डोळ्यात टचकन अश्रू आणण्यात आहे, ह्या कसोटीवर
क्रांतिताईची कविता शंभर टक्के खरी उतरते. एकेक ओळ देखील कविता होण्याचे सामर्थ्य
घेऊन येते ह्याची ही वर दिलेली काही उदाहरणे.
क्रांतिताईच्या कवितेचा स्वभाव; प्रकृती ही
प्रामुख्याने गंभीर आहे; अंतर्मुख आहे असे जाणवते. तिची प्रतिभाशक्ती ही ‘बाह्य
जगातील आघातांनी उद्दीपित होऊन’ त्यातून कवितेला जन्म घालणारी नाही, तर
अंत:प्रेरणेतून जन्म घेणारी आहे. माणसाच्या
मनाच्या तळाशी भाव-भावनांचे अनेक अनाहत निनाद घुमत असतात. त्या अंत:गर्भातील
निनादांचा अनुभव घेणे हे सामान्यांना शक्य देखील नसते, मग त्यांना शब्दरूप देणे हे
तर निश्चितच लोकविलक्षण आहे. क्रांतिताई त्या निर्गुण अनुभवांतून एक सगुण भावप्रधान
कविता निर्माण करते. हे भाव हेच तिच्या कवितेचे विभाव आहेत, आणि हे भाव हाच तिच्या
कवितेचा स्थायीभाव आहे असे मला वाटते. तिच्या ‘अर्पण’ नावाच्या कवितेतील ह्या काही
ओळी मी म्हणतो त्याचा पुरावा आहेत कि नाही बघा –
“हृदयाच्या अंतर्हृदयी
जपले प्रत्येक क्षणाला
चल, बहाल जन्मभराचे संचित
त्या खुळेपणाला”
‘स्व’ कुणाशी समर्पित असणे ह्याची ही पराकाष्ठा
नव्हे काय! ‘हृदयाच्या ही अंतर्हृदयी’ म्हणताना पराकोटीच्या अंत:स्थ गहनतेची जाणीव
होते, कारण क्रांतिताई हृदयाच्या हृदयी असे नव्हे तर हृदयाच्या अंतर्हृदयी म्हणते.
म्हणजे कदाचित जाणिवांच्या सीमा ओलांडून नेणीवांच्या प्रदेशाची अपेक्षा ती ह्या
ओळीत करते आहे असे वाटते. अशा खोल खोल अंतरंगात कुणाच्या स्मरणांचे ‘जपलेले’
(साचलेले नव्हे!) क्षण त्यालाच अर्पण करताना कदाचित हा एक खुळेपणा वाटावा कुणास,
तर त्या खुळेपणाला जन्माचे संचित, म्हणजे ह्या जन्मात कमावलेले सर्व काही बहाल
करते, त्या भावनांशी केवढी ही सचोटी! मला जे गद्यात देखील स्पष्ट करणे कठीण जाते
आहे, ते ती कवितेच्या त्या दोन ओळीत सामावते. मग संपूर्ण कविता वाचली तर त्यावर
किती लिहू नि किती नको असे होऊन जाईल. पण अत्तराचे दोन थेंबच त्याच्या परिमळाचा
दरवळ वातावरणात प्रसृत करायला पुरेसे असतात.
गायकीप्रमाणे जर कवींची ‘घराणी’ असती तर
क्रांतिताईचे स्वत:चे एक घराणे असते इतकी तिची शैली ‘स्व-तंत्र’ आणि स्वयंभू आहे. तिच्या
कवितेत जवळपास सर्वच काव्यगुणांचे संतुलन आहे. तिची कविता भाव-प्रधान (भावना-प्रधान
नव्हे!) आहे हे मी आधीच म्हटले, आणि त्याचे काही दाखले आपण पाहिलेच, पण तरीही तिची
कविता आशय(घ)निष्ठ आहे. भावात्म कविता अनेकदा शोकात्म होतात, परंतु क्रांतिताई जे
काव्य लिहिते त्यात बहुतांशवेळा माणसाच्या अंतरातील अंतराळाचा; अर्थात
अंतर्विश्वाचा वेध घेतलेला जाणवतो. आपले अंतर्विश्व हे व्यक्तिगत असले तरीही
वैयक्तिक नसते; तर ते वैश्विक असते. त्यामुळे तिच्या अंतरंगातील शब्दबद्ध केलेल्या
रंगछटा आपल्याला आपल्याशा वाटतात. सोप्या शब्दात, क्रांतिताई जे लिहिते ते तिचे
जरी खासच असले, तरीही ते आपलेही तितकेच आहे असे जाणवल्यावाचून राहवत नाही. आशयाशी
प्रतारणा न करता, भावनांचा अवास्तव पसारा न मांडता, भावोत्कट विश्वाच्या उंची;
खोली; रुंदी; आणि लांबीचा प्रवास घडवून आणणारी अशी तिची कविता मला वाटते.
“आत्म्याच्या आत झिरपत्या
उत्कट दु:खाच्या धारा
आवेग असा कि जावा
थेंबात बुडून किनारा”
एखादा भाव इतका उत्कट असावा कि त्याच्या
आवेगाचा केवळ थेंबमात्र मुख्य पात्रालाच नव्हे तर किनाऱ्याला देखील बुडवून
टाकण्याची अफाट, अचाट क्षमता ठेवतो हे अचंबित करून टाकणारे लिखाण क्रांतिताईच करू
जाणे!
क्रांतिताईच्या कवितेत रोजच्या जीवनातले विषय
सहसा नसतात. जे बाहेर दिसते त्या विश्वाचे, सृष्टीचे शब्दात काव्य-रूपांतर अशी
तिची कविता क्वचितच असेल. अर्थात, तिच्या कवितेत कुठे क्लिष्ट तत्वज्ञान किंवा
विचारही अभावानेच सापडतील. कल्पकता जरूर आहे, परंतु अनावश्यक कल्पनाविलास नाही.
परंतु ओतप्रोत भाव आणि त्याला भावनांची आवश्यक जोड देऊन तिची कविता प्रकट होते. तिच्या
कवितेत तांबडा, पांढरा, लाल, केशरी, हिरवा, निळा ई. असे रंग फारसे नसतात, तर ह्या
रंगांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या गर्द पोत असलेल्या रंगछटा जाणवतात, पण
कविता बटबटीत केलेली कधीच जाणवत नाही. ही देखील तिच्या शैलीची एक खासियत आहे,
तिच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
मोजके, पण नेमके शब्द आणि त्यातून मांडलेला सघन
अन सशक्त आशय हे विरळ काव्यवैशिष्ट्य क्रांतिताईच्या कवितांत आहे. एक उदाहरण इथे
देतो तिच्या ‘ग्रहण’ नावाच्या कवितेतलं –
“जाळ नाही, धूर नाही, तरी
काही जळतंय
एकूण एक हिरवं पान
पिकल्यासारखं गळतंय”
कुठेही पाल्हाळ लावलेले, किंवा एखादा विषय
अवास्तव फुलवत नेल्याचे तिच्या कवितेत आढळत नाही. कविता प्रवाही तर असतेच, पण तिचा
शेवट हा सुसंगत असतो. त्याचेही एक उत्कृष्ट उदाहरण इथे देतो तिच्या ‘नाटक’ ह्या
कवितेतून. ह्या तिच्या कवितेत ती जीवननाट्यात कसे अनेकविध कटू-गोड प्रसंग घडतात
ह्याचे दाखले देते आणि शेवटी म्हणते –
“नेपथ्य, कथा, अन् पात्रे,
निवडी त्याने केलेल्या
मंचावर येण्याआधी भूमिका
सिद्ध झालेल्या
मी अलिप्त होउन माझ्या
जन्माचे नाटक बघते”
शक्यतो प्रचलित, पण काव्यभाव असलेले आणि
साहित्यिक मूल्य असलेले शब्द क्रांतिताई निवडताना दिसते. काही ठिकाणी सामासिक शब्द
ती निर्माण करतानाही दिसते उदा. पाणओघ, तर काही कमी प्रचलित शब्द, जसे कि वाकळ,
ह्यांचा प्रयोग देखील ती करते. तिची कविता प्रामुख्याने छंदबद्ध आहे; किंबहुना तो
तिच्या कवितेचा पिंडच आहे. वृत्तशरणता न येता; अभिव्यक्तीशी तडजोड केलेली न
जाणवता; सर्व प्रकारच्या वृत्तात तिने कविता रचल्या आहेत. काहीही झाले तरी तिच्या
कवितेतील लय मात्र बिघडतच नाही. आणि हे सर्व काव्य’तंत्र’ सांभाळताना त्याचा
प्रभाव कवितेच्या ‘मंत्रा’वर जाणवत नाही. आरसा कितीही सुशोभित असला तरीही त्यातील
प्रतिबिंब हेच सर्वोच्च आहे हे ती विसरत नाही.
कवितेच्या फॉर्ममध्ये आश्चर्य वाटावे इतकी
मुग्ध विविधता तिच्या कवितेत दिसते. कवितेचा फॉर्म हे तिच्यासाठी कुंपण म्हणून काम
करत नाही, तर ते वेलबुटीसारखे तिच्या कवितेला सुशोभित करते आहे असेच वाटते.
एखाद्या विशिष्ट वृत्तात किंवा छंदात कविता रचताना त्या वृत्ताचे किंवा छंदाचे
नियम ठरलेले असतात. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य करण्यासारखे नाही. परंतु इतके
अकृत्रिम काव्य प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सजीवपणे सादर करणे हे
निश्चितच सर्वसामान्य नाही. हा फॉर्म ती कसा ठरवते, कि तिची कविता उत्स्फूर्तपणे
त्या फॉर्ममध्येच जन्म घेते हे समजून घेण्याचे मला देखील औत्सुक्य आहे. कदाचित
ह्याचे उत्तर तिने तिच्या खालील ओळीत दिले आहे –
“कविता कविता उरतच नाही
ती आत्म्याची भाषा होते
जेव्हा ती आतून उमलते”
भुईचा कठीण पुष्ठभाग फोडून तिच्या नकळतपणे एक
कोवळा हिरवा कोंभ सस्मित वर येतो तशी तिची कविता तिच्या नकळत तिच्या आतून उमलत येत
असावी ह्याची ही साक्ष आहे.
गंभीर असली तरी तिची कविता सुरस आहे. जरी
क्रांतिताईने विविध पारंपारिक रसांमध्ये कविता लिहिल्या असल्या तरी तिची कविता
कुठल्या एका विशिष्ट रसाच्या साच्यात घालता येणे कठीण आहे. रसपूर्ण असली तरी तिची
कविता ही बहुदा करुण आणि शांत रसाचे मिश्रण करून स्वत:चा एक स्वतंत्र रस निर्माण
करणारी कविता आहे, असे मला वाटते. तिच्या कवितेतील रसाचे नामाभिधान करण्याचा
आग्रहच धरला तर त्याला ‘क्रांतिरस’ असे नाव देण्याचे धारिष्ट्य मी करू शकतो.
मला क्रांतिताईच्या कवितेत प्रतीत झालेल्या गंभीरतेचा
आरोप लावण्याचे धारिष्ट्य जरी मी वारंवार करत असलो तरी लावणीपासून अभंगापर्यंत;
अर्थात श्रुंगारापासून भक्ती पर्यंत सर्वविध काव्यप्रकार क्रांतिताईने सहज आणि
सक्षमपणे हाताळले आहेत.
क्रांतिताईच्या कवितेत एक आत्मविश्वासाचे बीज
जाणवते. खालील ओळी बघा –
“हरून रणात कोसळलेली
विकल, अगतिक, असफल,
गलितगात्र मी
शरपंजरी पडलेल्या
भीष्मासारखी
उत्तरायणाची वाट पहात....
किंवा
अश्वत्थाम्यासारखी शापित,
भळभळत्या चिरंजीव जखमा
घेऊन
नव्या दिवसाच्या
युद्धघोषणेची वाट पहात....”
शेवटच्या ओळीत कलाटणी देण्याचं असं काव्यकौशल्य
हे पुष्कळदा पाहिले असेल, परंतु त्यातून जे प्रकट झाले ते तिच्यामधील एक
आत्मविश्वासाच अधिष्ठान. ‘महायुद्ध’ नावाची तिची ही कविता अदम्य साहसाचा परिचय देते.
कवितेत अशी कलाटणी म्हणजे काय ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर क्रांतिताईची ‘रान’ ही
कविता वाचलीच पाहिजे. तिच्या कैक रूपकात्मक कविता आहेत त्यातलीच ही.
उत्प्रेक्षा आणि रूपक हे क्रांतिताईच्या शैलीचा
आणखी एक विशेष नमूद करावा असा पैलू. तिच्या कित्येक कवितांतून ती आपले विचार आणि
भावना ह्या इतर वस्तू-पदार्थांचा आधार घेऊन प्रकट करते. एखादी भावना विविध
वस्तूंच्या उदाहरणाने जेव्हा व्यक्त केली जाते, त्यावेळी ती भावना अलंकृत होतेच,
पण ती अधिक रसाळ; स्पष्ट आणि प्रभावी देखील होते. मी ह्या लेखात क्रांतिताईच्या
कवितेविषयी लिहिलेल्या अनेक गोष्टींचा प्रत्यय देणारी, आणि क्रांतिताई ह्या व्यक्तित्वाचा
परिचय देणारी ‘सांज स्वीकारली’ असे काहीसे वेगळेच शीर्षक असलेल्या कवितेच्या काही
ओळी इथे देतो –
“उषा भैरव वहाते, निशा
मालकौंस गाते
माझे माराव्याशी नाते,
मीच सांज स्वीकारली
नको किरण कोवळे, नको
चांदणसोहळे
माझे आभाळ वेगळे, मीच
सांज स्वीकारली”
तिच्या एकाहून एक सरस आणि सकस कविता एकामागोमाग
एक वाचत जाणं हा एक असा प्रवास असतो कि ज्यात रस्ता पुनवेच्या पिठुर चांदण्याचा असतो,
दुतर्फा तिचे शब्द ताऱ्यांप्रमाणे लखलखत पथदर्शन करत असतात; तिच्या कवितेची एखादी ओळ
दूरवर दीपस्तंभासारखी आयुष्याला प्रेरणा देत मार्गदर्शन करत असते; आणि क्रांतिताईची
कविता सविता (सूर्य) बनून आपले मानस-विश्व उजळत जाते.
चिमणीच्या पंखांना आकाशाचा वेध घेता येणे शक्य नसते पण
तिच्या चिमुकल्या चक्षुंना आकाशाचे वेध असतातच ना! तसेच मी क्रांतिताई सारख्या
व्युत्पन्न आणि व्यासंगी कवयित्रीच्या काव्यसृष्टीविषयी लिहिणे आहे. माझ्या
इवल्याशा चोचीतून मी क्रांतिताईच्या काव्य-तळ्यातले केवळ काही थेंबच ह्या लेखात
टिपू शकलो आहे,
पण त्या चवदार
तळ्याचा रसास्वाद रसिकांनी अखंड घेत राहावा अशी अपेक्षा आहे,
हे तळं अनेकांची
काव्यतृषा शमविण्यास सक्षम आहेच,
पण त्याचा स्वाद
उत्तरोत्तर द्विगुणित,
नव्हे बहु-गुणित
होत जातो ह्याची मला स्वानुभवावरून खात्री आहे.
अंताला तिच्या ‘अग्निसखा’ ह्या काव्यसंग्रहातील
सर्वात पहिल्या ‘अंत’ नावाच्या कवितेचे शेवटचे चरण इथे उद्धृत करणे क्रमप्राप्त
आहे. ह्या ओळीतून कदाचित क्रांतिताईची जीवनदृष्टी दिसते, आणि क्रांतिताई नावचं
काव्य-रसायन समजायला निश्चित मदत होईल.
“अद्भुत काही घडून जावे
असणे – नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवुन गेलो
इतका साधा अंत नको”
----------------------------
सारंग भणगे
(२० ऑगस्ट २०१६)