सुंदर चित्रे सृष्टीमधली काव्य जणू हे भगवंताचे I कविता व्हावे जीवन आणि कवितेमधुनी जिवंत व्हावे II
Wednesday, August 27, 2008
माय मराठी
गोंधळ मांडिला आईचा
गोंधळ मांडिला
आईअंबे जगदंबेचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
ज्ञाना-तुका नामा-एका भली संतांची दाटी
भीमा-कृष्णा गोदा-कोयना नीरेच्या काठी।
पोवाड्यातून शाहिर गातो शिवाबाचा इतिहास
परमार्थाला पुरुषार्थ जोड़ती संत रामदास।
फुटती निर्झर कौतुकाचे सह्याद्रीच्या ओठी
अभिमानाने फुलून आली सातपुड्याची छाती।
पंढरीच्या विठ्ठलाचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
शालीवाहन मर्द गर्जला सुरु शकाची नांदी
मोरोपंत रामजोशी (१)अमर 'अनंत' फंदी।
देवगिरी हे सुराष्ट्र जळतो सुगंध सुवर्ण धूप
खलनाशाय समर्थ आहे चिरंजीव भार्गव रूप।
नंदनवन हे नि'खळ' निरंतर सुंदर कोकणपट्टी
सागरकाठी हापूसगाठी नारळ-पोफ़ळ गट्टी।
पुळ्यावरच्या चिंतामणीचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
प्रताप-पन्हाळा कोंढण-तोरण राय-राजगड
आर्या-ओव्या भारुड-भूपाळ्या पोवाड़याचे फड।
वि।वा. विं.दा. ना.धों. शांता गोविंदाग्रज (२)"सु.भट"
प्र।के. ना.सी. (३)वि.स. बा.सी. व.पु. (४)"(वि)पु.ल." मधुघट.
लोकमान्य स्वातंत्र्यवीर ते उजले सुपुत्र पोटी
गाडगे'बाबा'(५) चक्रधर गोधड; उजळल्या दिव्य ज्योती।
घाटावरच्या महाबळेश्वराचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
'गवतालाही भाले फुटती' असे 'सन्यस्त खड्ग
''नटसम्राटा'ची 'वीज म्हणाली धरतीला' स्वर्ग।
बाल; कुमार; सवाई अवघे अवतरले गंधर्व
मृत्युंजयी मराठीचे "स्वामी" ययाती व्यासपर्व।
'विश्वाशी अखिल जडावे अवघे विश्व मराठी'
या मातीशी जुळता नाती लाभती कैवल्यमुक्ती।
जेजुरीच्या खंडेराया
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला।
===========================================================
काही सुधारणा करून पुन:प्रसारीत.
उदेsss उदेsss उदेsss उदेसस
गोंधळ मांडिला आईचा
गोंधळ मांडिला
आईअंबे जगदंबेचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
ज्ञाना-तुका नामा-एका भली संतांची दाटी
भीमा-गोदा कृष्णा-कोयना नीरेच्या काठी।
पोवाड्यातून शाहिर गातो शिवाबाचा इतिहास
परमार्थाला पुरुषार्थ जोड़ती समर्थ रामदास।
फुटती निर्झर कौतुकाचे सह्याद्रीच्या ओठी
अभिमानाने फुलून आली सातपुड्याची छाती।
पंढरीच्या विठ्ठलाचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
शालीवाहन मर्द गर्जला सुरु शकाची नांदी
आर्या गाती मोरोपंत फटका अनंत फंदी।
देवगिरी हे सुराष्ट्र जळतो सुगंध सुवर्ण धूप
खलनाशाय समर्थ आहे चिरंजीव भार्गव रूप।
नंदनवन हे नि'खळ' निरंतर सुंदर कोकणपट्टी
सागरकाठी हापूसगाठी नारळ-पोफ़ळ गट्टी।
पुळ्यावरच्या चिंतामणीचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
प्रताप-पन्हाळा कोंढण-तोरण राय-राजगड
आर्या-ओव्या भारुड-भूपाळ्या पोवाड़याचे फड।
वि।वा. विं.दा. ना.धों. शांता गोविंदाग्रज (२)"सु.भट"
प्र।के. ना.सी. (३)वि.स. बा.सी. व.पु. (४)"(वि)पु.ल." मधुघट.
स्वातंत्र्यवीर लोकमान्य उजले सुपुत्र पोटी
गाडगे'बाबा'(५) चक्रधर गोधड; उजळल्या दिव्य ज्योती।
घाटावरच्या महाबळेश्वराचा
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला
'गवतालाही भाले फुटती' असे 'सन्यस्त खड्ग
''नटसम्राटा'ची 'वीज म्हणाली धरतीला' स्वर्ग।
बाल; कुमार; सवाई अवघे अवतरले गंधर्व
मृत्युंजयी मराठीचे "स्वामी" ययाती व्यासपर्व।
'विश्वाशी अखिल जडावे अवघे विश्व मराठी'
या मातीशी जुळता नाती कैवल्याची प्राप्ती।
जेजुरीच्या खंडेराया
गोंधळ मांडिला
माय मराठी त्रिखंड ख्याती
गोंधळ मांडिला.
===========================================================
काही स्पष्टीकरणे:
(१) - अमर भूपाळी
(२) - "सु। भट" - सुरेश भट; परंतु 'सुभट' देखिल.
(३) - वि। स. - वि.स. खांडेकर, वि.स. वाळिन्बे आणी वि.स. पागे सुद्धा.
(४) - "(वि) पु।ल." - पु.ल. देशपांडे, पण विपुल सुद्धा.
(५) - गाडगे'बाबा' - अर्थातच गाडगेबाबा; परंतु बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, बाबासाहेब पुरंदरे इ. देखिल.
Sunday, August 24, 2008
बलात्कार
काय तुझे राहिलेच आता आज तुझे तुझ्यात।
तू लुटलेस जरी ते मिळालेच न तुजला
हां हव्यास तुझा शमनाचा केवळ सुजला
विखार केवळ माझ्या तनुवरी जरी थिजला
तू आपुल्या तिलांजलीतच रे भिजला।
जा नाग तुझ्या भुकेचा वाढेल रे तुझ्यात।
मी न च मेले पामर तुझ्या फुत्कारात
ओरबाडले सूख तुझे मी माझ्या चित्कारात
दिलेस फ़क्त कायाक्लेश बलात्कारात
खुपतील तुला धि:ककार तुझे धुत्कारत
वारूळ घृणेचे वाढेल घोर तुझ्यात।
तो घाव घणाचा निर्दय मी सोशिला
निरंकुश नामर्दाचा हव्यास मी तोषिला
व्याघ्राने क्रूर जरी मृगास बळे भक्षिला
नरदैत्यास त्या चिरडूनि मी नाशिला
दुर्गा ती अंबिका; रणचंडिका वसे माझ्यात।
कोसळेन मी न नभातल्या ता-यासम
वाहीन उधाणलेल्या वादळ वा-यासम
उडवून लावीन तुज गवताच्या हा-यासम
आरसा न फ़ुटणारा; मी चिरणा-या ही-यासम
खचणारा बुरुज न मी; उत्तुंग कडा माझ्यात।
हे अन्याय पचवतो विचकट हसता हसता
हा समाज नपुंसक पाहत उभाहे नुसता
ठोठवणार दार ना; मी खाणार ना खस्ता
मी वीज जाळणारी; न च सूर्य विझणारा अस्ता
हे वीष तुला संभोगमंथनाचे; अन् अमृता माझ्यात.
इवल स्वप्न
इवल्याश्या फुलाचे स्वप्न फुलू दे, इवल्याशा घरट्यात झुला झुलू दे।
इवले इवले ओठ त्याचे डोळे गोलगोल, चिमुकल्या डोळ्यांची भाषा किती खोल
आभाळाएवढी माया त्याच्या मुठीत तोलु दे
लाल लाल गाल त्याची दुडकी दुडकी चाल, हवा हवा स्पर्श जशी मऊ मऊ शाल
मातेच्या ममतेशी त्याचे सूर जुळू दे
कोवळ कोवळ जावळ त्याचं इवल इवल कपाळ, भाळावरती भाग्यरेखा आखतो रेखीव गोपाळ
गोपाळाचे नाव त्याच्या कंठी रुळू दे
Wednesday, August 20, 2008
भूताचे भविष्य अन् भविष्याचे भूत.
आलं पहायला भविष्य
ज्योतीष्याच्या दारात
भेटले त्याचे शिष्य
त्यांनी त्याला हटकलं
त्याला ते खटकल
थांब म्हणता म्हणता
ते दारातून सटकल
घरात थोडं भटकल
एवढ्यात उंदराच पिटुकल
होत मोठ धिटुकल
त्याच्या पायाला चिटुकल
म्हणत,
भूता तुझी स्वारी
ज्योतीष्याच्या घरी
आली कशी बरी
सांगशील का खरी?
भूत म्हणाल,
जगण्याशी तुटल नातं
जीवनाच बंद खातं
मग भविष्य पहायला
आपलं काय जातं
हसत हसत फिदीफिदी
उंदीर म्हणाला त्याच्या आधी
गोष्ट सांगतो साधीसुधी
नको लागू उद्याच्या नादी
मी होतो जंगलचा वाघ
जंगलात एकदा लागली आग
प्राण्यांची झाली भागंभाग
मला आला भलताच राग
ज्योतीषाला दाखवून पंजा
म्हटलं, विचारतो जंगलचा राजा
सांग भविष्यात काय माझ्या
सांग नाहीतर करीन फज्जा
सांगितलं त्यान सारं खरं
कानात शिरलं भयाण वारं
कितीही झाडली जरी खुरं
तरीही झालं त्याचच खरं
दिसतो मी उंदीर जरी
आरशात पहा मला खरी
बिंबात दिसते वाघोबाची स्वारी
पाहून वाटते भीती उरी
भीती उराताली जाईना
मला पाहवेना आईना
उंदीरपण काही जाईना
वाघपण पुन्हा येईना
तर सांगतो दोस्ता भूता
तुझी तर विझली चिता
मग कशाला अहो करता
उगा उद्याची भलती चिंता
भविष्य म्हणजे उद्याचं भूत
कशाला त्याशी जमवायच सूत
अन् आजच व्ह्यायचं उद्याचं दूत
वर्तमानाच्या मानगुटी भविष्याचं भूत
Sunday, August 17, 2008
ओळखा पाहू??????
सुरु करण्या जीवन च-हाटे।
निर्वीकार जो रुतुचक्रा;
उन वादळ पाउस वारा।
सा-यांवरती होउन आरूढ़;
येणे त्याचे अनिवार्य रूढ़।
उरला केवळ उपकारास्तव;
शरीर पोसण्या मानवांचे,
जीवनक्षीर नित्य वाहतसे,
दान देतसे गोरसाचे।
अन् मागतसे केवळ;
काही कवड्या प्रतिमाही।
अन्नदान करण्या गोमातेला;
हां मोबदला काय क्षुल्लक नाही?
देतसे अवघे धन केवढे,
गोरस; दही; नवनीत; तूपाचे।
नीर-क्षीर विवेके करुया,
चिंतन या गो-भूपाचे।
= दूधवाला
Friday, August 15, 2008
घोट वादळाचा
कंठात दाटले मेघ
डोळ्यात पावसांच्या सरी
काळजात वीजेची रेघ।
दुभंगलेले शरीर अवघे
अभंग असे परी दु:ख
उसवलेले श्वास आणिक
छातीत पेटली राख।
नियतीची क्रूर मृगया
बाणात अडकले प्राण
झटपटणा-या शरीरात
कोंडले मृत्यूचे प्राण।
भग्न मंदिराचा कळस
फुटका; पाय-या फुटक्या,
विदीर्ण जीवनास खाताना
मारीतात गिधाडे मिटक्या।
अग्निजीव्हा दुपारच्या
भाजतात अवघे अंग
साळिंदर बोचतो नुसता
ह्रदय कोरण्यात दंग।
रक्ताळलेला सूर्य
वेदनांची लाही लाही
क्षितीज लुप्त झाले
"ते" यातानांनाही नाही।
कोसळले निष्पर्ण वृक्ष
घरटी सारी लवंडली
मृत्युच्या कवेत पिल्ले
एकमेकात तंडली।
आता उरले केवळ
निनादहीन आकांत
फाटलेल्या आभाळी
उध्वस्त सृष्टीचे शांत.
शिल्प-रंग
इंद्रधनू अवतरले
शिल्पाच्या कुंचल्यातूनी
स्वप्नात रंग उतरले।
शिल्प असे स्वप्नातले
सत्यात कसे अवतरले?
त्या मोहक शिल्पावरती
रंग कसे पसरले?
निळ्या विभोर आकाशी
जसा उडावा पक्षी
शिल्पाच्या भाळावरती
खुले रंगीत नक्षी।
युगायुगांची नाती जुळवी
जीवनाचा शिल्पकार
जीवनाचे रंग खुलवी
रंगकर्मी कलाकार.
शिल्प जे स्वप्नात पाहिले
अमूर्त ते मूर्त जाहले
मूर्तीवारती रंगात लिहीले
शिल्पा-सारंग सार्थ जाहले.
Sunday, August 10, 2008
अनुप्रास
अनुप्रास हां माझा आवडता अलंकार। त्यात एक मस्त मजा आहे. त्यात रचलेल्या काही रचना इथे पेश करतो. त्यात अर्थ आणी गेयता जपण्याचा यत्न केला आहे. बघा आवडतात का.
प्रसन्न प्रभाती पवन पसरवी परिमळ प्राजक्ताचा
रात्र रुसूनी रंगी रंगला रत्नाकर रवीरश्मिंचा
#२#
कमळकळिसम कपोल कोमल कामलुब्ध करती
कुंतल काळे कमनीय काया कनकप्रभेसम कांती.
सोनसकाळी प्रातःकाळी सुर्यप्रभेची स्वर्णझळाळी
सायंकाळी कातरवेळी संध्याव्याकुळ सांजसावळी
गोप गोकुळी गवळण गाती गिरीधर तुही गा ना! गा ना!
कृष्ण-गोपिका काकुळतीने केकाटती त्या "कान्हा कान्हा"
राहून गेले; जगायाचे
राहून गेले; जगायाचे।
मातीमध्ये बीज पेरूनी
राहून गेले; उगायाचे।
आकाशाचे छप्पर होते; जावे तिकडे;
चहूकडे,
फिरता फिरता आकाशाला
राहून गेले; बघायचे।
जाईजुई प्राजक्ताचे परसात होते
नित्य सडे,
सुगंध बकुळी निशिगंधाचे
राहून गेले; हुंगायचे।
होती झाडे हिरवी; डोंगर निळे;
त्यांचे उभे कड़े,
गर्दीमधूनी माणसांच्या
राहून गेले; निघायचे।
जगता जगता राहून गेले
राहून गेले; जगायाचे.
Friday, August 8, 2008
गणिते
कायद्याने द्यायचे का
वायाद्याची होती बाक़ी
कायद्याची वजाबाकी
काय त्याने मागितले
काय केले मी ही वजा
बेरजांच्या चुका होत्या
की चुकांच्या बेरजा?
भागिले जे गुणायचे
गुण याचे भागिले
भू-गोलासही त्रिज्येने
माणसांनी विभागले
चुकली सारी गणिते
गणती चुकांची न मांडली
व्याज वाढले वायद्याचे
निर्व्याज नाती सांडली.
Monday, August 4, 2008
शोध पूर्णत्वाचा
कवळून घे मज बाहुपाशी
जीवनाचा उपासक जरी मी
ऊगमासाठी ऊपाशी।
जन्मलो शून्यातचि
शून्यातचि परतायचे
अंतात ऊगम पावलो
अनंतात लीन व्हायचे।
शून्यात काही न्यून नाही
पूर्णात त्या ना अन्य काही
पूर्णतेची होय पूर्तता
पूर्णात त्या शून्यही नाही।
ना अनादी ना अनंत
त्यास आदि ना अंत
तो पूर्ण केवळ पूर्ण आहे
ना जन्म ना तो हन्त
पूर्णाकडून पूर्णाकड़े
हां प्रवास त्या अंतरात आहे,
पूर्ण ते अन्य कुठेच नाही
शोध तुझ्या अंतरात आहे।
मृत्यु, मला आलिंगन दे. तुझ्या आलिंगनातुन मी उगामाच्या, अर्थात्, इश्वराच्या जवळ जाइन. मी जरी जीवना वर प्रेम करणारा असलो, तरीही उगमासाठी, अर्थात्, इश्वरासाठी मी सदैव उपाशी आहे.मी जन्मलो ती अवस्था शून्य असावी. अशी अवस्था जी भाव-भावना इ. च्या अतीत आहे. त्याच शून्य अवस्थेत आपण मृत्युनंतर जायचे आहे; परतायचे आहे. जन्म आणी मृत्यु हे एकाच आशा त्या शून्य अवस्थेत होतात. म्हणजे आपण जन्मतो ते त्याच अंत अवस्थेत; अर्थात्, जीवनाचा अंत आणी उगम, म्हणजेच सुरुवात, ही एकाच अवस्थेत होतात. अर्थात् अन्तामधेच उगम होतो. पण तो उगम हां पुन्हा अन्ताकडे जाण्यासाठी नसावा, तर अनंतात, अर्थात्, चिरंतन; शाश्वत अशा अनंततत्वात विलीन होण्यासाठी त्या तत्वापुढे लींन होण्यासाठी असावा.शून्यात कसलेच न्यून नाही, कारण ती अवस्थाच पूर्णावस्था आहे. पूर्णामध्ये न्यून कसे असेल? त्या पूर्णावस्थेमध्ये पूर्णतेवाचून अन्य काही असणेही शक्य नाही. जेव्हा त्या पूर्णतेची पूर्तता होते; म्हणजे आत्मा पूर्णावस्थेला जातो, तेव्हा त्या पूर्णात शून्यही उरत नाही. शून्य हे पूर्ण आहे; पण पूर्ण म्हणजे केवल शून्य नव्हे. शून्य हे पूर्णाचे केवळ दर्शन आहे. पूर्णतेच्या पूर्ततेत शून्यही गळून पड़ते; गळून पडले पाहीजे.तो अनादी अन् अनंत; अर्थात् ज्यास आदि किंवा अंत नाही, असा आहेच, पण तो अनादी अनंत या संकल्पनांच्याही अतीत; अर्थात्, पलिकडे आहे. त्यास आदि आणी अंत नाही ही झाली वस्तुस्थिती, पण पूर्ण अवस्थेमध्ये आदि किंवा अंत यांना स्थानच नाही. त्यामुळे तो अनादी अनंत असूनही तो 'ना अनादी ना अनंत' असा होतो.तो केवळ, निव्वळ शुद्ध पूर्ण आहे, अन्य काहीच नाही. त्यास जन्म नाही, अथवा तो हन्त, म्हणजे ज्याचा अंत करता येइल असा नाही, हे वेगळे सांगणे न लगे.'हां प्रवास'; अर्थात्, जीवन, पूर्णाकडून पूर्णाकडे आहे. जीवन दुसरे काही असूच शकत नाही. 'एकोहं बहुस्याम' या संकल्पातून जीवन नावाचे म्रुगजळ निर्माण झाले. त्यामुळे या जिवानापुर्विचे अस्तित्व हे पूर्णच होते; आणी जीवनाचे अंतीम ध्येयही पूर्णत्व हेच असल्याने, जीवन हां प्रवास पूर्णाकडून पूर्णाकडे या दरम्यानचे अंतर (distance) आहे. आणी हे पूर्णत्व जे जीवनाचे, किंवा समग्र सृष्टीचे, अंतिम ध्येय आहे, ते पूर्णत्व या जीवनाच्या अंतरात शोधण्याची गरज नाही, कारण ते अंतिम ध्येय हे आपल्या अंतरातच आहे.इथे कवितेची सुरुवात कवितेच्या अंताशी मिळते, आणी ही कविता पूर्ण होते.
Sunday, August 3, 2008
तू.......अन् मी...
त्या स्वप्नी तू येशील का?
माझ्या मनीच्या अंबरातील
इंद्रधनू तू होशील का?
जगण्यास ज्या तू अर्थ दिला
जीवनातील त्या तू प्रभात का?
अवकाशी खुले तारांगण ज्या
त्या रात्रीच्या तू नभात का?
ज्या पुष्पाला तू गंध दिला
त्या पुष्पातील तू पराग का?
ज्या दो-यास तू बंध बांधला
त्या दो-याचा तू पतंग का?
ज्या पंखांनी आकाश खुले
त्या पंखातील तू उर्मी का?
ज्या चित्रात रंग भरले
त्या चित्राची तू रंगकर्मी का?
ज्या शब्दांना ध्यास तुझाच
त्या शब्दांची तू कविता का?
जी तृष्णेचे शमन करते
खळखळती तू ती सरिता का?
ज्या तीराला दिशाही नव्हती
त्या तीराचा तू वेध का?
ज्या मुखी तू शब्द फोडला
त्या मुखीचा तू वेद का?
ज्या पुरुषास तू अर्थ दिला
त्या पुरुषाचे तू वीर्य का?
ज्या गगनी तिमिर होतो
त्या गगनातील तू सूर्य का?
ज्या पांथास तू वाट दिली
त्या पांथाचा तू शोध का?
ज्या हुंकाराने ओंकार स्फुरला
तो अनाहत तू निनाद का?
अशा अनाहत स्पंदनांची
तू अमूर्त स्फुर्ती का?
आत्म्याच्या या शिवालयातील
लखलखती तू ज्योती का?
Saturday, August 2, 2008
Friday, August 1, 2008
मूड न्हाई आज
साला हलकट मेला,
मुडद्याला ..........म्हने मूड न्हाई आज
म्हून घातलीन लाथ कुत्र्यान।
म्हनं 'मूड न्हाई आज'।
गेल्ये तर सगली शेवा करून घेताना
वाटली न्हाई लाज।
पाय दाबून घेतले,
खोली आवरून घेतली.....
ग्लासात दारु वोतली,
आन म्हनल मुडद्याला
सायेब, मूड बनवू का?
तर बेण म्हनत कसं
'मूड न्हाई आज'
.......
जाव दे ग,
सोड तुझी किरकिर।
मिळल की दुसरं घिराईक।
नगं आता दुसरं,
'मूड न्हाई आता आज'।
चंपे, गप राहा गुमान,
काकी घाललं लाथ
मूड न्हाई आज म्हनलिस तर
......
चिंगे, आपल्याला बी कधी म्हनता येइल का ग?
काके, आज मी येनार न्हाई धंद्याला
आपला
"मूड न्हाई आज"...........