Sunday, August 3, 2008

तू.......अन् मी...

ज्या स्वप्नांनी रात्री बहरतील
त्या स्वप्नी तू येशील का?
माझ्या मनीच्या अंबरातील
इंद्रधनू तू होशील का?

जगण्यास ज्या तू अर्थ दिला
जीवनातील त्या तू प्रभात का?
अवकाशी खुले तारांगण ज्या
त्या रात्रीच्या तू नभात का?

ज्या पुष्पाला तू गंध दिला
त्या पुष्पातील तू पराग का?
ज्या दो-यास तू बंध बांधला
त्या दो-याचा तू पतंग का?

ज्या पंखांनी आकाश खुले
त्या पंखातील तू उर्मी का?
ज्या चित्रात रंग भरले
त्या चित्राची तू रंगकर्मी का?

ज्या शब्दांना ध्यास तुझाच
त्या शब्दांची तू कविता का?
जी तृष्णेचे शमन करते
खळखळती तू ती सरिता का?

ज्या तीराला दिशाही नव्हती
त्या तीराचा तू वेध का?
ज्या मुखी तू शब्द फोडला
त्या मुखीचा तू वेद का?

ज्या पुरुषास तू अर्थ दिला
त्या पुरुषाचे तू वीर्य का?
ज्या गगनी तिमिर होतो
त्या गगनातील तू सूर्य का?

ज्या पांथास तू वाट दिली
त्या पांथाचा तू शोध का?
ज्या हुंकाराने ओंकार स्फुरला
तो अनाहत तू निनाद का?

अशा अनाहत स्पंदनांची
तू अमूर्त स्फुर्ती का?
आत्म्याच्या या शिवालयातील
लखलखती तू ज्योती का?

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...