दे मला आलिंगन मृत्यो
कवळून घे मज बाहुपाशी
जीवनाचा उपासक जरी मी
ऊगमासाठी ऊपाशी।
जन्मलो शून्यातचि
शून्यातचि परतायचे
अंतात ऊगम पावलो
अनंतात लीन व्हायचे।
शून्यात काही न्यून नाही
पूर्णात त्या ना अन्य काही
पूर्णतेची होय पूर्तता
पूर्णात त्या शून्यही नाही।
ना अनादी ना अनंत
त्यास आदि ना अंत
तो पूर्ण केवळ पूर्ण आहे
ना जन्म ना तो हन्त
पूर्णाकडून पूर्णाकड़े
हां प्रवास त्या अंतरात आहे,
पूर्ण ते अन्य कुठेच नाही
शोध तुझ्या अंतरात आहे।
मृत्यु, मला आलिंगन दे. तुझ्या आलिंगनातुन मी उगामाच्या, अर्थात्, इश्वराच्या जवळ जाइन. मी जरी जीवना वर प्रेम करणारा असलो, तरीही उगमासाठी, अर्थात्, इश्वरासाठी मी सदैव उपाशी आहे.मी जन्मलो ती अवस्था शून्य असावी. अशी अवस्था जी भाव-भावना इ. च्या अतीत आहे. त्याच शून्य अवस्थेत आपण मृत्युनंतर जायचे आहे; परतायचे आहे. जन्म आणी मृत्यु हे एकाच आशा त्या शून्य अवस्थेत होतात. म्हणजे आपण जन्मतो ते त्याच अंत अवस्थेत; अर्थात्, जीवनाचा अंत आणी उगम, म्हणजेच सुरुवात, ही एकाच अवस्थेत होतात. अर्थात् अन्तामधेच उगम होतो. पण तो उगम हां पुन्हा अन्ताकडे जाण्यासाठी नसावा, तर अनंतात, अर्थात्, चिरंतन; शाश्वत अशा अनंततत्वात विलीन होण्यासाठी त्या तत्वापुढे लींन होण्यासाठी असावा.शून्यात कसलेच न्यून नाही, कारण ती अवस्थाच पूर्णावस्था आहे. पूर्णामध्ये न्यून कसे असेल? त्या पूर्णावस्थेमध्ये पूर्णतेवाचून अन्य काही असणेही शक्य नाही. जेव्हा त्या पूर्णतेची पूर्तता होते; म्हणजे आत्मा पूर्णावस्थेला जातो, तेव्हा त्या पूर्णात शून्यही उरत नाही. शून्य हे पूर्ण आहे; पण पूर्ण म्हणजे केवल शून्य नव्हे. शून्य हे पूर्णाचे केवळ दर्शन आहे. पूर्णतेच्या पूर्ततेत शून्यही गळून पड़ते; गळून पडले पाहीजे.तो अनादी अन् अनंत; अर्थात् ज्यास आदि किंवा अंत नाही, असा आहेच, पण तो अनादी अनंत या संकल्पनांच्याही अतीत; अर्थात्, पलिकडे आहे. त्यास आदि आणी अंत नाही ही झाली वस्तुस्थिती, पण पूर्ण अवस्थेमध्ये आदि किंवा अंत यांना स्थानच नाही. त्यामुळे तो अनादी अनंत असूनही तो 'ना अनादी ना अनंत' असा होतो.तो केवळ, निव्वळ शुद्ध पूर्ण आहे, अन्य काहीच नाही. त्यास जन्म नाही, अथवा तो हन्त, म्हणजे ज्याचा अंत करता येइल असा नाही, हे वेगळे सांगणे न लगे.'हां प्रवास'; अर्थात्, जीवन, पूर्णाकडून पूर्णाकडे आहे. जीवन दुसरे काही असूच शकत नाही. 'एकोहं बहुस्याम' या संकल्पातून जीवन नावाचे म्रुगजळ निर्माण झाले. त्यामुळे या जिवानापुर्विचे अस्तित्व हे पूर्णच होते; आणी जीवनाचे अंतीम ध्येयही पूर्णत्व हेच असल्याने, जीवन हां प्रवास पूर्णाकडून पूर्णाकडे या दरम्यानचे अंतर (distance) आहे. आणी हे पूर्णत्व जे जीवनाचे, किंवा समग्र सृष्टीचे, अंतिम ध्येय आहे, ते पूर्णत्व या जीवनाच्या अंतरात शोधण्याची गरज नाही, कारण ते अंतिम ध्येय हे आपल्या अंतरातच आहे.इथे कवितेची सुरुवात कवितेच्या अंताशी मिळते, आणी ही कविता पूर्ण होते.
No comments:
Post a Comment