न्यून तुझ्या षंढत्वाचे ओतलेस आज माझ्यात
काय तुझे राहिलेच आता आज तुझे तुझ्यात।
तू लुटलेस जरी ते मिळालेच न तुजला
हां हव्यास तुझा शमनाचा केवळ सुजला
विखार केवळ माझ्या तनुवरी जरी थिजला
तू आपुल्या तिलांजलीतच रे भिजला।
जा नाग तुझ्या भुकेचा वाढेल रे तुझ्यात।
मी न च मेले पामर तुझ्या फुत्कारात
ओरबाडले सूख तुझे मी माझ्या चित्कारात
दिलेस फ़क्त कायाक्लेश बलात्कारात
खुपतील तुला धि:ककार तुझे धुत्कारत
वारूळ घृणेचे वाढेल घोर तुझ्यात।
तो घाव घणाचा निर्दय मी सोशिला
निरंकुश नामर्दाचा हव्यास मी तोषिला
व्याघ्राने क्रूर जरी मृगास बळे भक्षिला
नरदैत्यास त्या चिरडूनि मी नाशिला
दुर्गा ती अंबिका; रणचंडिका वसे माझ्यात।
कोसळेन मी न नभातल्या ता-यासम
वाहीन उधाणलेल्या वादळ वा-यासम
उडवून लावीन तुज गवताच्या हा-यासम
आरसा न फ़ुटणारा; मी चिरणा-या ही-यासम
खचणारा बुरुज न मी; उत्तुंग कडा माझ्यात।
हे अन्याय पचवतो विचकट हसता हसता
हा समाज नपुंसक पाहत उभाहे नुसता
ठोठवणार दार ना; मी खाणार ना खस्ता
मी वीज जाळणारी; न च सूर्य विझणारा अस्ता
हे वीष तुला संभोगमंथनाचे; अन् अमृता माझ्यात.
No comments:
Post a Comment