Friday, August 15, 2008

घोट वादळाचा

वादळाचा घोट घेता
कंठात दाटले मेघ
डोळ्यात पावसांच्या सरी
काळजात वीजेची रेघ।


दुभंगलेले शरीर अवघे
अभंग असे परी दु:ख
उसवलेले श्वास आणिक
छातीत पेटली राख।

नियतीची क्रूर मृगया
बाणात अडकले प्राण
झटपटणा-या शरीरात
कोंडले मृत्यूचे प्राण।

भग्न मंदिराचा कळस
फुटका; पाय-या फुटक्या,
विदीर्ण जीवनास खाताना
मारीतात गिधाडे मिटक्या।

अग्निजीव्हा दुपारच्या
भाजतात अवघे अंग
साळिंदर बोचतो नुसता
ह्रदय कोरण्यात दंग।


रक्ताळलेला सूर्य
वेदनांची लाही लाही
क्षितीज लुप्त झाले
"ते" यातानांनाही नाही।

कोसळले निष्पर्ण वृक्ष
घरटी सारी लवंडली
मृत्युच्या कवेत पिल्ले
एकमेकात तंडली।

आता उरले केवळ
निनादहीन आकांत
फाटलेल्या आभाळी
उध्वस्त सृष्टीचे शांत.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...