(चाल पारंपारिक "शुभमंगल बोला" गाण्याची)
परसामध्ये पारिजात तो 'पल्लवीत' झाला,
फुले वेचती भाग्य'शलाका' मोहवीत त्याला,
१सुख-'दु:खा'च्या संसाराचा शुभारंभ झाला I
'आनंदा'च्या संसाराचा शुभारंभ झाला IIध्रुII
बोला शुभमंगल बोला (४)
ओंजळीतली फुले अर्पुनी शुभचिंतन केले,
हाती उरले सुवास २माझ्या शुभमंगल झाले...
हाती उरले सुवास आता शुभमंगल झाले,
आनंदाने दोघे मिळुनी सुखवेली डोला II१II
बोला शुभमंगल बोला (४)
सुखस्वप्नांचे उंच मनोरे बांधा हर्षभरे,
विसरूनी 'आम्हा' आनंदाने नांदा सौख्यभरे,
'हसता हसता' येतो भरूनी 'आप्तांचा' डोळा II२II
बोला शुभमंगल बोला (४)
हाती देते हात सखीचा घेऊनी माझे हाती,
पाणिग्रहणासमयी माझे कर दोघांचे हाती,
प्रीतीच्या स्वर्गाची दारे दोघे मिळुनी खोला II३II
बोला शुभमंगल बोला (४)
एक चंद्रमा किती तारका आळविती त्याला,
किती गोपीका तळमळणा-या एक मुरलीवाला,
मीरेशी का 'चाफा' धरतो अखंड अबोला II४II
बोला शुभमंगल बोला (४)
=====================
सारंग भणगे. (७ मार्च २०११)
टीपा:-
पल्लवी साहजिकच हे गीत गात असताना भांबावलेली आहे; भारावलेली आहे. त्यामुळे तीच्याकडून ज्याला आपण इंग्रजीमध्ये 'sleep of tongue' म्हणतो तसे एक दोन जागी होते. त्यामधुन तीची मानसिक स्थिती दाखवायचा प्रयत्न आहे. त्या जागा खालीलप्रमाणे:
१. इथे पल्लवी सुख-दु:खाच्या असे म्हणुन जाते. इथे दु:ख म्हणजे पल्लवीच्या मनातील दु:ख असे अभिप्रेत आहे. तसे तर संसार हा सुख-दु:खाचाच असतो; परंतु कुणाच्य लग्नात त्याच्या संसारात दु:ख देखिल असेल असे म्हणणे शिष्टाचाराला धरून नाही असे तीच्या लक्षात येते, म्हणुन ती ही ओळ दुस-यांदा म्हणते आणि 'आनंदा'चा (अर्थात आनंद हे पात्र ही यात अभिप्रेत धरून श्लेष आहे) संसार असे म्हणते.
२. हाती उरले सुवास माझ्या - असे ती पहिल्या कडव्यात म्हणुन जाते. फुलांची ओंजळ दोघांवर वाहिल्यानंतर पल्लवीकडे खरेतर गतस्मृतींचे सुवासच केवळ बाकि असतात आणि त्यामुळेच ती 'माझ्या' असे म्हणुन जाते. परंतु चूक लक्षात आल्यानंतर वास्तविक गीतात बसत नसतानाही ती ही ओळ परत दुरूस्त करून 'माझ्या' च्या जागी 'आता' असा शब्द योजुन म्हणते.
No comments:
Post a Comment