Tuesday, March 15, 2011

घेतली नाही कधी माघार मी.

पर्वताला रेटुनी बेजार मी,
घेतली नाही कधी माघार मी.

मारल्या त्यांनी किती टपला मला,
स्पर्श होता जाणले; अंगार मी.

कोण होतो कोण आहे ना कळे,
कोण असण्याच्याच गेलो पार मी.

आजचे हे सूर्य त्यांना सूट द्या,
काल त्यांना बोललो अंधार मी.

सत्य नाही मिथ्य नाही भास हे,
सावल्यांचा मांडला बाजार मी.

ओळखीचे आज जाती दूर का?
सोडला नाही तसा संसार मी.

सर्व मुंग्या वारुळाशी गुंतल्या,
या जगाशी गुंफला श्रृंगार मी.

ऐक रंग्या सांगुनी गेला कधी,
एवढे आभाळ त्या आधार मी.
==============
सारंग भणगे. (१५ मार्च २०११)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...