Sunday, March 20, 2011

माळून काजव्यांना...

माळून काजव्यांना आल्या सजून राती,
स्पर्शात चांदण्याच्या गेल्या भिजून राती.

चोरून धीट मोठा शिरतो गवाक्ष वाटे,
प्रेमी युगुल गाती, "याव्या अजून राती.

गज-यास मोग-याच्या चुरगाळले कितीदा,
गंधाळला बिछाना गेल्या कुजून राती.

पाण्यावरी तरंगे प्रतिबिंब तारकांचे,
चुंबावया जळाला आल्या धजून राती.

आल्हाद चांदण्याचा अल्लाद पांघरूनी,
थंडीत शारदाच्या गेल्या थिजून राती.

प्राजक्त रातराणी; गातात गंधगाणी,
'सारंग' ऐकताना गेल्या निजून राती.
===================
सारंग भणगे. (२० मार्च २०११)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...