Sunday, February 26, 2012

आकाशाएवढे

तुझे माझे प्रेम आकाशाएवढे,
तरी आपण दूर आकाशाएवढे.

सुखाच्या डोहात डुंबायाचे मला,
कसे माझे दु:ख आकाशाएवढे.

अरेरे! मागीतले थोडेसेच का?
दिले असते मी ग आकाशाएवढे.

तु जे केले ते बरोबर होते तरी,
कसे झाले पाप आकाशाएवढे.

नको सारा देश सारी पृथ्वी नको,
हवे छोटे बेट आकाशाएवढे.

तुझे ते आकाश माझ्यासाठी नसे,
मला माझे सदन आकाशाएवढे.
=====================
सारंग भणगे. (२५ फेब्रुवारी २०१२)

Tuesday, February 21, 2012

फार झाले


गझलेस आसवांचे भार फार झाले,
वाचाळ वेदनांचे वार फार झाले.

ज्वालाग्राही विषाने ओतप्रोत मिसरे,
हे कोळसे सुखाने गार फार झाले.

आभाळ पेलण्याचे शेर फार 'भारी',
उचलावयास यांना चार फार झाले.

विद्रोह मांडणारे धारदार मतले,
ते वार वल्गनांचे फार फार झाले.

घेतात शोषितांच्या यातनांचे मक्ते,
हे कागदी फुलांचे हार फार झाले.
===========================
सारंग भणगे. (नोव्हेंबर २०११)

Sunday, February 19, 2012

'कही दूर जब दिन ढल जाये'

कुठे सविता ती मावळते,
संध्या-कांता आरक्त होते; पुलकित होते.
माझ्या मनीच्या परसामध्ये कुणी आशेचे दीप लावते.

उगा कधी श्वास माझा बोजड होई,
उगाचच पाणी कधी डोळ्यात येई,
उचंबळूनि; कधी प्रेमानी; स्पर्श जी करते, कुठे न दिसते.

कधी कधी मनाचे हे धागे न जुळती,
कधी कधी जुळून येती जन्माची नाती,
जटीलसे प्रश्न वैरी अपुले मन; घाव दुज्यांचे उगा वाहते.
====================================
सारंग भणगे. (जानेवारी २०१२)

पलक


तेरी पलक जो झुक गयी तो शाम हो गयी,
तेरी झलक जो दिख गयी तो भोर हो गयी.

तेरी हसीं हसी से मै हो गया दीवाना,
ऐसे छलक जो तू गयी तो दोपहर हुई.

तेरी जफ़ाओं के साए में जिंदगी,
मेरा फलक जो वो हुई तो रात हो गयी.

तनहाइयों में तो मेरे कुर्बत जो हो तेरी,
सासों तलक जो तू चली तो रूह धुल गयी.
==============================
सारंग भणगे. (१७ फेब्रुवारी २०१२)

Saturday, February 18, 2012

जरा वेगळे वाटते

तुझ्या अंतरी वाहणे जरा वेगळे वाटते,
तुझ्या वाचुनी राहणे जरा वेगळे वाटते.
 
जरी चुंबनाची अवीट गोडी; तरी त्याहुनी,
कटाक्षातळी नाहणे जरा वेगळे वाटते.
 
जरासे कुठे बांधता कसा जीव व्याकूळतो,
मिठीला तुझ्या साहणे जरा वेगळे वाटते.
 
तसे पाहता माणसे जरी पाहती आरसे,
तुला आरसा पाहणे जरा वेगळे वाटते.
 
अशी सुंदरी मोहिनी तुझी चाह साऱ्या जगा,
सखे तू मला चाहणे जरा वेगळे वाटते.
--
सारंग भणगे (१२ फेब्रुवारी २०१२)

दवबिंदुंचा गजरा

केसामध्ये दवबिंदुंचा माळून गजरा,
चुकवून आली शशी-निशेच्या चुकार नजरा,
रंग उषेचे घेऊन आली,
गालावरती गुलाल लाली,
नभ-भाळावर चमचमणारा रवी हासरा.

नेसून गोऱ्या अंगावरती हिरवा शालू,
फुलाफुलांनी बहरून आला नाजूक वेलू,
खांद्यापासून फुटल्या फांद्या,
बुंधा त्यांचा सुडौल बांधा,
वसंतवैभव गात्रांमधुनी लागे खेळू.

पसरून काळे कुंतल झाली श्याम-शर्वरी,
विखुरल्या अन जणू तारका शुभ्र मोगरी.
चमचमणाऱ्या कर्णफुलांची,
रेखीव नक्षी नक्षत्रांची,
भांगामधले कुंकुम भासे शुक्र रुपेरी.
===========================
सारंग भणगे. (३१ जानेवारी २०१२)

Monday, February 13, 2012

अंधार पौर्णिमा


वाळवंटी जीवनाच्या श्रावणाने हासणे,
शांत रानी वादळाची कि उठावी गुंजने,
काळरात्रीला पडावे पौर्णिमेचे चांदणे,
तू अचानक सामोरी येताच हे हो साजणे.

रोमरोमी राखेच्याही पालवी फुटते नवी,
थेंब होती पावसाचे अमृताची शांभवी.
डोळिया सामोरी माझ्या अवतरावी जान्हवी,
क्रंदणा-या वेदनांनी का न गावी भैरवी.

अन अचानक काळजाला जाणवावे हे कसे,
पाहतो मी ज्यात तुजला तेच फुटले आरसे,
तू असोनी सावलीशी क्षितीजाशी का दिसे,
भंगले का स्वप्न ते मी पाहिलेही जे नसे.
=============================
सारंग भणगे. (३ फेब्रुवारी २०१२)

Saturday, February 4, 2012

जाता जाता

उगाच डोळे भरूनी आले जाता जाता,
उरले सुरले वाहून गेले जाता जाता.
 
रीवाज; लागे जाळायाला  पोर पोटचा,
दुसरा तिसरा कोणी न चाले जाता जाता.
 
तिलाच म्हणती जननी कारण तीच ते करते,
बाळा देई श्वास ती उरले जाता जाता.
 
अंधाराला भिऊ नको तू; वचन उद्याचे,
आशा-दीप संध्येने दिधले जाता जाता.
 
कधीच भयाने लढले नाही अन्यायाशी,
गीत क्रांतीचे लिहून गेले जाता जाता.
===========================
सारंग भणगे. (४ फेब्रुवारी २०१२)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...